या सार्‍या चित्रात आशिया व आफ्रिका खंडातल्या कोट्यवधी लोकांचे स्थान कोणते? त्यांना आपल्या स्वत्वाची, आपल्या भवितव्याची अधिकाधिक जाणीव होत गेली आणि त्याबरोबरच त्यांना बाहेरच्या जगाचीही जाणीव झाली.  त्यांच्यातले पुष्कळच लोक जगात घडणार्‍या जगतिक घटना आस्थापूर्वक समजून घेतात व लक्षात ठेवतात.  कोणी काही केले किंवा कोठे काही घडले तर त्याचे मूल्य ठरविण्याची त्यांचे कसोटी अर्थातच एकच आहे.  ती ही की, यामुळे आमचे स्वातंत्र्य मिळविण्याला आम्हाला साहाय्य होत आहे काय? एका देशाने दुसर्‍या देशावर चालविलेली सत्ता यामुळे संपुष्टात येते का ?  आम्हाला वाटेल त्याबरोबर सहकार्य करून स्वेच्छेने आमचे जीवन आम्हाला पाहिजे तसे जगण्याचे सामर्थ्य या घटनेने आम्हाला येईल का ?  राष्ट्राराष्ट्रामध्ये व राष्ट्रांतर्गत गटामध्ये, सर्वांना समान हक्क व समान संधी, यामुळे लाभण्यासारखी आहे काय ?  आपले दारिद्र्य व निरक्षरता जाऊन आपली राहणी थोडीशी बरी लवकर होण्याची आशा या घटेनमुळे उद्भवते काय? त्यांना आपल्या स्वत:च्या राष्ट्राबद्दल प्रेम वाटते, पण त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीत इतर राष्ट्रांवर सत्ता चालवावी, दुसर्‍यांच्या कारभारातही हात घालावा अशी वृत्ती नाही.  जगातील सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी सहकार्य करावे, आणि जगात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता काही आंतरराष्ट्रीय योजना स्थापावी, या उद्देशाने जे काही प्रयत्न होतात त्यांचे या आशिया व आफ्रिका खंडातील जनतेकडून स्वागतच केले जाते, पण त्यांना या प्रयत्नांच्या सध्देतूविषयी खात्री वाटत नाही.  आतापर्यत आपल्यावर चालविलेली सत्ता पुढेही चालवावी एवढ्यापुरतीच योजलेली ही एक युक्ती तर नसेल अशी शंका त्यांना येते.  आशिया व आफ्रिका खंडांचा फार मोठा भाग स्वत्वाची जाणीव आलेल्या असंतुष्ट झालेल्या व खवळून धामधूम करीत असलेल्या जनतेने भरला आहे, आजपर्यंत चालले तसेच पुढेही मुकाट्याने ते चालू देणार नाहीत.  आशियामधील वेगवेगळ्या देशांतून परिस्थिती वेगवेगळी आहे, प्रत्येक देशाच्या अडचणीही भिन्न आहेत खर्‍या, पण या सार्‍या विस्तीर्ण प्रदेशात जिकडे तिकडे, हिंदुस्थान, चीन, आग्नेय आशियाच्या पश्चिम भागातील राष्ट्रे, सारी अरब राष्ट्रे या सार्‍या देशांतून सगळीकडेच त्याच विशिष्ट प्रकारच्या त्याच भावनांचे धागे पसरलेले आहेत, ही सारी राष्ट्रे कसल्यातरी अदृश्य बंधनाच्या दुव्यांनी एकमेकाला जोडलेली आहेत.

युरोप खंड सुमारे एक हजार वर्षे रानटी अवस्थेत मागासलेले राहिले होते, 'तिमिर युग' म्हणून ओळखल्या जाणार्‍या काही मधल्या शतकात तेथे ज्ञानाचा गंध नव्हता सारे युरोप आज्ञानांधकारात बुडलेले होते, त्या हजार वर्षाच्या किंवा त्याहूनही अधिकच कालात उत्तरोत्तर उत्कर्ष पावत चाललेल्या मानववंशाच्या सारसर्वस्वाचे, मानवी तेजाचे प्रतीक आशिया हेच होते.  तेथे अव्याहत चाललेल्या एका देदीप्यमान संस्कृतीत प्रत्येकाचे आपापल्यापरीने काही वेगळेच महत्त्व असलेले असे एकापुढे एक, स्वतंत्र कालखंड, रांगेने त्या काळात चमकले आणि संस्कृतीची अनेक पीठे, सामर्थ्याची कितीतरी केंद्रे त्या काळात आशिया खंडात उदयाला आली, उत्कर्ष पावली.  सुमारे पाचशे वर्षापूर्वी युरोपमध्ये नव्याने प्राण संचरला, आणि त्याने हळूहळू आपले हातपाय पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे पसरता पसरता काही शतकांत पृथ्वीच्या पाठीवरची सारी सत्ता, सामर्थ्य व संस्कृती आटोपून जगातले सर्वात श्रेष्ठ खंड युरोप झाले.  ह्या स्थित्यंतरात काही चक्राची गती होती की काय आणि आता ते चक्र उलटे फिरू लागले आहे की काय ? पश्चिमेला अमेरिकेकडे, व पूर्वेला युरोपातील विशिष्ट परंपरेशी कधीच एकजीव न झालेल्या पूर्वयुरोपातील देशाकडे, हल्लीच्या काळी सत्ता व सामर्थ्य यांचा काटा झुकतो आहे हे निश्चित आणि पूर्वेला रशियाच्या पूर्वेला असलेल्या सायबेरिया देशात प्रचंड सुधारणा झाली आहे.  पूर्वेकडच्या इतर देशांतून ही स्थित्यंतर व त्वरेने प्रगती करण्याची सिध्दता झालेली दिसते.  आता यापुढे भविष्यकाळी पौर्वात्य व पाश्चात्य यांच्यात संघर्ष उद्‍भवणार की त्यांची परस्परसापेक्ष स्थिती काही वेगळीच होऊन तेथे स्थिर राहणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel