याचा परिणाम असा की, आपला चांगला जम बसवून साम्राज्यवादी बनलेल्या राष्ट्रांचा इतर राष्ट्रांशी संबंध आला म्हणजे पुर्वेतिहासामुळे दोघांनाही जो एकमेकांचा संशय येत असतो तो अमेरिका व रशिया यांच्याविषयी उद्‍भवत नसल्यामुळे त्यांनी आपण होऊन कोणा राष्ट्राशी काही संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामागे ही संशयाची पार्श्वभूमी उभी नसते.  पण याचा अर्थ असा नव्हे की, या दोन राष्ट्रांचा जो काही आतापर्यंतचा इतिहास आहे तो अगदी सोज्वळ आहे, व त्याच्यात कसलेही डाग, शिंतोडे, संशयास्पद असे काही नाही.  लोकशाही व समता या तत्त्वावरची आपली अढळ निष्ठा अमेरिकन लोक कितीही बोलून दाखवीत असले तरी तेथे सतत चालू असलेला नीग्रोवाद ही अद्यापही अमेरिकेला लाज आणवणारी गोष्ट आहेच.  रशियाने पूर्वयुरोपातील देशांत जे काही अत्याचार केले त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या देशातील लोकांत जी वैराची भावना आहे ती अद्यापही रशियाला सर्वस्वी निर्मूल करता आलेली नाही.  हे सारे असे असले तरी एकंदरीत हे खरे की, अमेरिकन लोकांना इतर देशांतून मित्र जोडणे सोपे जाते, आणि रशियन लोकांत इतर लोकांविषयी वंशद्वेषाची भावना जवळ जवळ नाहीच म्हटले तरी चालेल.

बहुतेक युरोपियन राष्ट्रांचा इतिहास त्यांनी एकमेकांशी चालविलेल्या भांडणांनी व युध्दांनी व त्यांनी एकमेकांवर केलेल्या अन्यायी कृत्यांनी भरलेला आहे, व त्यांना एकमेकांचा फार द्वेष वाटतो.  जी साम्राज्यसत्ताधारी राष्ट्रे आहेत त्यांची आपसात ही सारी भांडणे, युध्दे, अन्याय, परस्पर द्वेष आहेतच.  शिवाय त्यांच्या भरतीला त्यांनी ज्या लोकांवर साम्राज्यसत्ता चालविली आहे त्या लोकांना या साम्राज्यसत्ताधारी राष्ट्रांविषयी वाटणारा तिटकारा आला आहे.  इंग्लंडने फार विस्तृत साम्राज्यसत्ता गाजविली असल्यामुळे त्यांच्या नावाच्या पानावरची ह्या भांडणांची, अन्यायाची, द्वेषाची, युध्दाची, तिटकार्‍याची जी लांब यादी भरते तिच्यामुळे त्यांच्यावरचे हे ओझे सर्वांत अधिक आहे.  त्याच्यामुळे म्हणा, किंवा इंग्लिश लोकांचा गुणविशेष तो आहे म्हणून म्हणा, ते लोक मोठे संकोची असतात, इतर लोकांत मिसळत नाहीत आणि त्यांना इतर लोकांशी सहजपणे मैत्री जोडणे जमत नाही.  इंग्रजांचे दुर्दैव असे की, बाहेर देशांत त्यांची पारख त्यांच्या राजमान्य प्रतिनिधींच्यावरून केली जाते आणि ह्या प्रतिनिधींच्या अंगी उदारमतवादित्वाची किंवा इंग्रजांच्या सुसंस्कृत वृत्तीची चिन्हे क्वचितच आढळतात, बहुधा वरून दिसायला सात्त्विक पण आतून अहंमन्य शिष्ट अशा ढोंगी लोकांचाच भरणा ह्या प्रतिनिधींत अधिक.  ह्या राजमान्य अधिकार्‍याशी संबंध येणार्‍या लोकांत इंग्रजीविषयी वैरभाव निर्माण करण्याची काही विशेषच हातोटी या अधिकार्‍यांना साधली आहे.  हिंदुस्थान सरकारच्या एका चिटणिसाने काही महिन्यांपूर्वी मिस्टर गांधी (ते तेव्हा स्थानबध्द होते) यांना एक पत्र लिहिले, ते पत्र म्हणजे जाणूनबुजून उद्दामपणे कसे लिहावे याचा एक नमुनाच होते, ते पत्र ज्यांच्या पाहण्यात आले त्यांच्या मते ते पत्र म्हणजे सार्‍या हिंदी लोकांचा सरकारने मुद्दाम केलेला अपमान होता,  कारण योगायोगाने गांधी हेच हिंदुस्थानचे प्रतीक गणले गेले आहेत.

जगात यापुढे पुन्हा साम्राज्यशाहीच्या एखाद्या नव्याच प्रकाराचे युग, की आंतरराष्ट्रीय सहकार्याचे युग, की एखादी जागतिक राष्ट्रसंघटना येणार ?  एकंदर तानमान पाहता साम्राज्यशाहीचाच संभव अधिक दिसतो, पुन्हा तेच ते जुने युक्तिवाद योजले जात आहेत, मात्र त्यांत जुन्याचा मनमोकळेपणाही नाही.  मानवी नैतिक प्रेरणा व त्यागवृत्ती यांचा नीच हेतूने उपयोग करून घेतला जात आहे, आणि मानवाच्या अंगी वसत असलेल्या भलेपणाचा व उदार वृत्तीचा दुरुपयोग सत्ताधारी करून घेत आहेत, लोकांना वाटत असलेली नाना प्रकारची भये, त्यांचे आपसातले हेवेदावे, त्यांच्या भलत्यासलत्या खोट्या महत्त्वाकांक्षा, यांचा अवास्तव फायदा घेऊन सत्ताधारी अन्यायाने आपला स्वत:चा लाभ करून घेत आहेत.  साम्राज्यासंबंधीचे विचार जुन्या काळी लोक निदान स्पष्टपणे मनमोकळे बोलून टाकीत तरी खरे.  अथेन्सच्या साम्राज्यासंबंधी आपले विचार सांगताना थ्युसिडायडिस् याने लिहिले आहे, ''आम्ही कोणाचेही साहाय्य न घेता स्वत:च्या बळाने बर्बरप्रभूचा नि:पात केला, आमच्या पराक्रमावर विसंबून राहिलेल्या लोकांच्या कल्याणाकरिता, मानवी संस्कृतीच्या रक्षणाकरिता आम्ही आमचे सारसर्वस्व पणाला लावले, आमच्या अस्तित्वाचाच नाश होण्याचा धोका पत्करला, अशी खोटी उदात्त भाषा वापरून आम्ही आपल्या साम्राज्याधिकाराचे समर्थन करीत नाही.  मनुष्य काय किंवा राज्य काय, प्रत्येकाने स्वसंरक्षणाकरिता दक्षता ठेवली तर त्याला दोष देता येत नाही.  आम्ही सिसिलीमध्ये ठाण मांडून बसलो आहो ते आमच्या अथेन्सच्या राज्याला स्वास्थ्य लाभावे म्हणूनच.  आम्हाला भय आहे म्हणूनच आम्हाला ग्रीसमधील आमच्या साम्राज्याला कसेबसे कवटाळून बसणे भाग आहे, आणि भयामुळेच आम्हाला आमच्या मित्रांचे साहाय्य घेऊन सिसिलीमध्ये सुव्यवस्था राखण्याचा खटाटोप करण्याकरिता आमची इच्छा नसताही येथवर यावे लागले आहे.''  आणि अथेन्सच्या वसाहती होत्या त्यांच्याकडून अथेन्सला मिळणार्‍या खंडणीविषयी त्यानंतर एके ठिकाणी चर्चा झाली आहे तेथे तो म्हणतो, ''आम्ही त्यांना जिंकून ही खंडणी त्यांच्यावर लादली हा अन्याय वाटतो खरा, पण आता येते आहे ती खंडणी सोडून देणे म्हणजे शुध्द मूर्खपणा आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel