विज्ञानशास्त्रज्ञांचे शिरोमणी म्हणून मान्य असलेले आईन्स्टीन म्हणतात, ''पूर्वीच्या कोणत्याही काळी नव्हते तितके आज, मानववंशाचे भवितव्य मानवांच्या नीतीनिष्ठेवर अवलंबून आहे.  मानवता आनंदमय सुखपूर्ण करावयाची असली तर त्यागवृत्ती व आत्मसंयम सर्वत्र अंगी बाणण्यानेच ते साधणार आहे.'' विज्ञानाचा मद चढलेल्या या
युगातून प्राचीन तत्त्वज्ञान्यांच्या युगात, सत्ताभिलाष व व्यापारातील लाभैक हेतूच्या या प्रचलित स्वार्थी वृत्तीतून भारताला चिरपरिचित असलेल्या त्यागी वृत्तीत जगाला ते नेऊ पाहतात एकूण असे वाटते हे वाचून.  त्यांचे हे मत किंवा पुढे दिलेले त्यांचे मत आजकाळच्या बहुतेक विज्ञानशास्त्रज्ञांना बहुधा मान्य होणार नाहीच.  ते म्हणतात, ''माझी अगदी पूर्ण खात्री झाली आहे की, जगातील कितीही अपरंपार धनसंपत्ती घेतली तरी ती मानवतेच्या अत्यंत कळकळ वाटणार्‍या कार्यकर्त्यांच्या हाती देऊनसुध्दा तिचे मानवाच्या उन्नतीला साहाय्य होणार नाही.  द्रव्यामुळे स्वार्थपरायणता काय ती चेतवली जाते आणि धन आपल्या धन्याला आपला दुरुपयोग करण्याचा अनिवार मोहमात्र सततच पाडीत असते.''

मानवी संस्कृतीइतकीच जुनी असलेली ही समस्या सोडविण्याच्या कामी प्राचीन तत्त्वज्ञान्यांना होती त्यापेक्षा अधिक अनुकूल परिस्थिती आधुनिक विज्ञानशास्त्रज्ञांना लाभली आहे.  अनेक क्षेत्रांतून मिळवून एकत्र साठवून ठेवलेली ज्ञानभांडारे आधुनिक विज्ञानशास्त्राला लाभली आहेत, व अनुभवाअंती उपयुक्त ठरलेली एक विशिष्ट पध्दतीही त्या शास्त्राला अवगत झाली आहे. प्राचीन विचारवंतांना अज्ञात असलेल्या अनेक क्षेत्रांची आकडेवारी व संपूर्ण आलेख हल्लीच्या विज्ञानशास्त्राने तयार केले आहेत. पूर्वी मानवाला गहनगूढ वाटत असलेल्या अनेक गोष्टींविषयीच्या त्या लोकांच्या अज्ञानाचा अवास्तव उपयोग धर्माच्या नावावर भगत उपाध्ये वगैरे धर्माधिकारी करून घेत असत, पण त्या गोष्टींच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान व त्यांच्यावर सत्ता चालविण्याचे सामर्थ्य वाढत गेल्यामुळे लोकांना आता त्या गहनगूढ राहिलेल्या नाहीत.  पण परिस्थितीत विज्ञानशास्त्राला काही अनुकूल आहे तसे काही प्रतिकूलही आहे.  त्या शास्त्राला उपलब्ध असलेली ज्ञानाची भांडारे इतकी विपुल भरलेली आहेत की, त्यामुळेच ती सर्व एकत्रित दृष्टीसमोर आणणे मानवाला अशक्यप्राय होऊन तो त्यातील एखाद्या भागातच गुंतून पडतो, व मग त्या भागाचीच चिकित्सा व त्याचाच सूक्ष्म अभ्यास करता करता त्याचा संपूर्ण ज्ञानाशी संबंध काय हे त्याला कळेनासे होते.  विज्ञानशास्त्राने बंधमुक्त झालेल्या ज्ञानसागराच्या प्रचंड ओघात सापडलेला हा प्राणी त्याच्या डोक्यावरून चाललेल्या त्या लाटांत गुदमरून जाऊन, कैक वेळा त्याची अशी इच्छा नसताही त्या ओघाबरोबर वाहात जाऊन भलत्याच अज्ञात प्रदेशाच्या किनार्‍याला लागतो.  आधुनिक जीवनाची वेगवान गती व त्या जीवनाला क्षणाची उसंत न देता एकामागून एक सारखे येत चाललेले आणीबाणीचे प्रसंग यांच्यामुळे शांत स्थिर चित्ताने सत्याचा शोध घेण्याला अवसरच मिळत नाही.  मानवी बुध्दीचीसुध्दा अशीच ओढाताण चालली आहे.  नाना मतांचा गलबता झाला आहे.  सत्यज्ञान व्हावयाला अवश्य तो शांत निरपेक्ष विचार त्या बृध्दीला सुचत नाही.  ''प्रज्ञेच्या वाटा निवांत असतात, प्रज्ञेची वृत्ती निर्भय, अविचल असते.''

कदाचित असेही असण्याचा संभव आहे की, मानवजातीच्या जीवनातील ज्या कालखंडात आपण वावरतो आहोत तो एक महत्त्वपूर्ण कालखंड असेल, आणि ह्या विशेष हक्काचे मोल आपल्याला अशा रीतीने द्यावे लागत असेल.  कारण आतापावेतो होऊन गेलेल्या अशा महत्त्वाच्या कालखंडातून परस्परविरोध व खळबळ, जुने सोडून काहीतरी नवेनवे निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले आढळतात.  मानवी जीवनात निरंतरचे स्थैर्य, निश्चिंतपणा, सतत तीच स्थिती कधीच नसते, तसे झाले तर जीवनातला जिवंतपणाच नाहीसा होईल.  फार फार म्हणजे त्यातल्या त्यात काही सापेक्ष स्थैर्य आपल्याला साधता येईल, चालता तोल सांभाळता येईल.  जीवनकलहात जडभौतिक, वैचारिक, नैतिक विषयात, अनेक प्रकारे, एकाची दुसर्‍याशी, मानवाचा परिस्थितीशी; सततच युध्दाचे प्रसंग चाललेले असतात, विरोध होतच असतो, आणि त्यातूनच नवेनवे साकार होत असते, नव्या कल्पनांचा उदय होत असतो आणि हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.  संहार आणि निर्मिती एकमेकाशेजारीच चाललेली असतात आणि ही अशी दोन्ही प्रकारची रूपे निसर्गाची व मानवाचीही स्पष्ट आढळतात.  जीवनातील तत्त्व विकास हे आहे, स्थितीसातत्य हे नव्हे, जीवन सतत नवेनवे होत जाताना त्याची तीच ती स्थिती सतत राहणे शक्य नाही.

राजकारण व अर्थसंपादनाच्या जगात आज जिकडे तिकडे सत्ता मिळविण्याकरिता शोध चाललेला आहे, पण सत्ता हाती सापडली की इतर पुष्कळच बहुमोल असे तोपर्यंत हातातून निसटून गेलेले आढळते.  ध्येयनिष्ठेच्या जागी राजकारणातले डावपेच व खलबते करण्याची वृत्ती, आणि स्वार्थनिरपेक्ष शौर्याच्या जागी स्वार्थपरायण भेकडवृत्ती आलेली असते.  तत्त्वाच्या अंतरीच्या खर्‍या अर्थापेक्षा त्या तत्त्वाच्या बाह्यरूपाचेच प्राबल्य झालेले असते.  आणि ज्या ध्येयाकरिता सत्तेचा एवढा खटाटोप केला ते ध्येय सत्ता मिळाल्यावर काहीना काही कारणे निघून अचानक बाजूला पडते.  कारण सत्तेतही काही वैगुण्य येतेच, शक्ती अखेर स्वत:वरच उलटते.  परंतु हाती आलेल्या या सत्तेचा व शक्तीचा अंकुश अंतरीच्या मनोवृत्तीवर चालत नाही, त्याने फारतर वृत्ती निर्घृण व निर्लज्ज बनण्याचाच संभव अधिक.  कान्फ्युशिअसने म्हटले आहे, ''सेनेपासून सेनापती हिरावून नेणे शक्य आहे, परंतु अत्यंत क्षुद्र मनुष्यापासून देखील त्याचे इच्छास्वातंत्र्य हिरावून घेणे शक्य नाही.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel