‘तुम्ही शिरीषचे मित्र. तुम्ही मला प्रतिज्ञेतून मोकळे करता का ? तुम्ही त्या दिवशी साक्षी होतेत. अतःपर जगावे असे मला वाटत नाही. सासूसास-यांची मी सेवा करीत होते. पतीची आज्ञा होती; परंतु सासूबाई वाटेल ते बोलतात. माझ्या निर्मळ, निर्दोष शीलावरही शिंतोडे उडवतात. प्रेमानंद, मी इतर सारे अपमान गिळीत होते. मारहाण सहन करीत होते; परंतु प्राणाहून प्रिय असे पातिव्रत्य, त्याच्यावरच प्रहार झाला तर मी कशी जगू ? तुम्ही त्यांचे मित्र. तुम्ही सासूबाई व मामांजी ह्याची काळजी घ्या. मला जाऊ दे जगातून. दळभद्री, कपाळकरंटी मी. कशाला जगू ?’ पतीला दिलेल्या शब्दासाठी, प्रतिज्ञापूर्तीसाठी, घेतलेल्या शपथेसाठी जगत आहे. सांगा, कृपा करा. मला मुक्त करा.’

‘करुणे, जग काही म्हणो, आपले मन शुद्ध असले म्हणजे झाले. आपलेच मन जर आपणास खात असेल तर गोष्ट निराळी. तू आपली शपथ पाळ. सूर्य़नारायणाला डोळे आहेत. तो तुझ्या चारित्र्याकडे पाहात आहे. मानवांना घेऊ दे शंका, प्रभू घेणार नाही. समजलीस ? जा. सेवाचाकरी करीत आहेत तशीच कर. देव तुझ्यावर प्रसन्न होईल. तुझी तपश्चर्या फळेल. तू सुखी होशील. जा, नको रडू. मी सुखदेव व सावित्रीबाई यांना सांगेन हो.’

करुणा रानात गेली. मोळी तोडून दमली. एका ठिकाणी रडत बसली. तेथे तिला झोप लागली. मोळीवरच डोके ठेवून ती निजली. तिला एक सुंदर स्वप्न पडले. शिरीष आपले अश्रू पुशीत आहे, केसात फूल खोवीत आहे. ‘उगी, रडू नको, आता हस,’ असे सांगत आहे असे तिने पाहिले, ऐकले. गोड मधुर स्वप्नात हसत होती ती. इतक्यात पाखरांचा एकदम किलकिलाट झाला. करुणा जागी झाली. पाखरांचा किलकिलाट सुरु होता. काय झाले ? का घाबरली ती पाखरे ? कोणी पारधी तर नाही ना आला ? कोणी शिकारी तर नाही ना आला? का त्या पाखरांना सर्प दिसला ? काय झाले ?

तिला काही समजेना. तिने इकडे तिकडे पाहिले. नव्हता शिकारी, नव्हता साप. ती उठली. मोळी डोक्यावर घेऊन निघाली. ऊन मी म्हणत होते. तिचे पाय चट चट भाजत होते. तिने पळसाची पाने पायांना बांधली. मोळी घेऊन ती गावात आली. परंतु तिची मोळी कोणी विकत घेईना.

‘करुणे, ये, तुझी मोळी मी विकत घेतो.’ प्रेमचंदाचे ते शब्द होते. त्याने तिला दोन शेर दाणे दिले. मोळी टाकून करुणा घरी गेली.

‘करुणे, आम्हाला का उपाशी मारणार आहेस तू ?’ सासू म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel