राजाने काही शिपायांस बोलावले. ‘जा, ताबडतोब त्या समुद्रकाठच्या तुरूंगातील त्या राजकीय कैद्यास घेऊन या. चांगले घोडे गाडीला जुंपा. सायंकाळपर्यत येथे आले पाहिजे.’ शिपाई ‘आज्ञा’ असे म्हणून गेले. वेगवान घोडयांची गाडी घेऊन ते गेले. तुरूंगासमोर गाडी थांबली. राजाचा निरोप ढब्बूसाहेबांस सांगण्यात आला. शृंखला घातलेला फुला कैदी घोडयांच्या गाडीत बसविण्यात आला. त्याच्या बाजूस सशस्त्र शिपाई बसले आणि गाडी वेगाने निघाली. आपल्याला तोफेच्या तोंडी देण्यासाठी नेण्यात येत असावे असे फुलाला वाटले.

‘कोठे नेता मला?’’ त्याने विचारले.

‘चूप. बोलना नहीं, पूछना नही.’ शिपाई म्हणाला.

तिकडे समारंभ सुरू झाला. प्रार्थनागीत झाले. राजा बोलायला उभा राहिला. टाळयांचा कडकडाट झाला. जणू आकाश पडते की काय असे वाटले. राजाने हात वर करताच सारे शांत झाले.

‘जमलेल्या नाना देशांतील थोर शास्त्रज्ञांना व सर्व स्त्री-पुरुषांना आजचा दिवस आनंदाचा आहे. शास्त्रांचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे. शास्त्राने संहारही करता येतो व जीवनात आनंद व सौदर्य हयांचीही निर्मिती करता येते. शास्त्रांचा उपयोग संसार आनंदमय करण्यासाठी करणे ही खरी शास्त्रपूजा. शास्त्राने मारक शस्त्रे निर्मू नयेत. शास्त्राने मनुष्याला माकड बनवू नये. मनुष्याला वृक-व्याघ्राहून क्रूर करु नये. शास्त्राने माणुसकी वाढो. आनंद वाढो. आज आपण बक्षीस देणार आहो; परंतु कोणाला? बाँबचा शोध लावणार्‍याला नाही. तोफेचा गोळा शंभर मैल जाण्याचा प्रयोग करण्यार्‍याला नाही, तर सृष्टीतील सौदंर्य व आनंद वाढविणार्‍याला. शास्त्राने सुबत्तता निर्मिता येईल. फुले - फळे वाढविता येतील. फुलांचा प्रयोग करणार्‍यांला आज बक्षीस द्यावयाचे आहे. कृष्णकमळावर, निळया-सावळया कृष्णकमळावर सोनेरी छटा उमटविणार्‍याला हे बक्षीस द्यावयाचे होते. अनेक देशांतील फुलवेडया शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आपल्या प्रयोगांची फुले त्यांनी येथे आणली आहेत. सर्वानाच सारख्या प्रमाणात सिध्दी मिळाली नाही, परंतू एक प्रयोग यशस्वी झाला. तो प्रयोग येथे ठेवण्यात आला आहे. पाहा हे फूल. किती सुंदर दिसते आहे! पाहा हया सोनेरी छटा कृष्णरंगावर सोनेरी वेलबुट्टी. अभिनव प्रयोग.....’

राजाचे भाषण असे चालू होते इतक्यात ती गाडी आली. सर्व लोकांचे लक्ष तिकडे गेले. राजाने दूतांना तिकडे पाठविले. ‘शृंखला काढून कैद्याला येथे आणा.’ अशी त्याने सूचना दिली. दूत वेगाने गेले. फुलाच्या पायांतील शृंखला काढण्यात आल्या. त्याला पाय हलके वाटू लागले. नीट चालवेना. शिपाई हात धरुन त्याला नेत होते. किती तरी दिवसांनी बाहेरची मोकळी हवा अंगाला लागली. विशाल क्षितिज दिसले. अनंत आकाश दिसले. हजारो स्त्रि-पुरूषांची सृष्टी दिसली.

त्या कैद्याला राजाजवळ नेण्यात आले. कैदी फिका पडला होता, परंतु त्याच्या डोळयांत ध्येयनिष्ठेचे पाणी होते. राजाने त्याला सन्मानपूर्वक जवळच्या आसनावर बसविले. त्या कैद्याला पाहाताच तो पाहुणा काळवंडला. गब्रू घाबरला. त्याची मान खाली झाली. त्याला आपण पडणार असे वाटले. राजा बोलू लागला. लोक ऐकू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel