‘ये, बेबी, ये.’

प्रेमाने सरोजाला जवळ ओढले. तिच्या केसांवरून हात फिरवला.

‘सरोजा, त्या दिवशी पळून का ग गेलीस?’

‘मला नाही कळत.’

‘पुन्हा नाही ना जाणार?’

‘परंतु आता आजोबा नि आपण सारीं एके ठिकाणीच राह्यचे. आई, बाबा ग कसे आहेत? ते कसे दिसतात? गोरे गोरे आहेत. हो ना?’

‘कशावरून ग?’

‘मी गोरी आहे म्हणून.’

‘बाबा, तुम्ही जाऊन श्रीधरलाही भेटा. तोही आता लवकरच सुटेल. मीही सुटेन. सारा आनंद होईल.’

‘आई, आम्ही गावोगाव हिंडत होतो. मी गाणी म्हणत असे. बाबा, नाही आजोबा प्रवचन करीत. गंमत.’

‘म्हणूनच देव प्रसन्न झाला. लहान मुलांना देव लवकर भेटतो.’

‘ध्रुवाला भेटला. नाही का हो आजोबा?’

अशा गोष्टी चालल्या. शेवटी रामराव व सरोजा गेली. श्रीधरलाही भेटायला दोघे गेली. सरोजाकडे श्रीधर पाहात राहिला. ‘मरो तुझी सरोजा’ हे स्वत:चे शब्द त्याला आठवले. त्याचे डोळे भरून आले.

‘तुम्ही ना माझे बाबा? गोरे गोरे बाबा. रडू नका. तुम्ही सुटाल आता. आई सुटेल.’

‘होय हो. सुटू. आता मला ओळखशील ना?’

‘हो मी पाहिलेच नव्हते कधी तुम्हाला.’

रामराव व सरोजा मुंबईस आली. श्रीधरला मित्रांनी विचारले, ‘ती कुणाची मुलगी?’

‘माझी. ती माझी बेबी सरोजा.’ तो प्रेमाने म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel