आळा कशाने घालता येईल? परस्परांची भाषा अभ्यासून. विनोबाजी आज सांगत असतात की, एखादी तरी द्रविडी भाषा आपल्याला आलीच पाहिजे, मातृभाषा नि हिंदुस्थानी याशिवाय. जयप्रकाश मद्रासमध्ये हिंडताना आधी चार वाक्यें तामिळीमध्ये बोलत. लोकांना आनंद होई. भाषा अहंकरासाठी नसून हृदयाला पोचविण्यासाठीच आहे. सेनापती नि मी अस्पृश्यता निवारणार्थ हिंडत असता गडहिंग्लजला गेलो. मला चिठ्ठी आली ''गुरुजी कानडीत बोला.'' मी म्हटले, ''तुरुंगात वाचायला शिकलो, परंतु बोलायला नाही.'' सेनापतींना वाईट वाटले, आमची मोटरलॉरी सारखी जात होती. बरोबरच्या सेवादल पथकांत कुतूब होता. त्याला कानडी येई.

सेनापती म्हणाले, ''बंधू-भगिनींनो वगैरे मला कानडीत शिकव.'' सेनापतींनी चार वाक्ये पाठ केली. पुढच्याच सभेत ''बांधव रे मत्तु भगिनी रे'' त्यांनी म्हटले; - टाळयांचा कडकडाट झाला! हृदयाला ते शब्द भेटले. विवेकानंद शिकागोला सर्वधर्म परिषदेला गेले. सारे प्रतिनिधी ''सभ्य नर-नारींनो'' असा आरंभ करीत. विवेकांनद ''बंधू-भगिनींनो!'' म्हणाले आणि टाळया थांबता ना. त्या एका शब्दाने त्यांनी सारी हृदये जिंकली. अशी ही मौज आहे. कानडी भाषा बोलत असले म्हणजे 'काय यंडु-गुंडु चालवले आहे?' असे म्हणू नये. गुजराथीला 'सामळो' असे हिणवू नये. ती ती भाषा कानावर पडली तर भावाची भाषा भेटली म्हणून नाचावे. थोडे थोडे शब्द येत असावेत, गाणी येत असावीत. आनंद वाटावा.

या मुंबईस माटुंग्याच्या उडपीवाल्याच्या खानावळीत जातो. तेथे कानडी, मद्रासी सारे येतात. मला अपार आनंद होतो. बंधूंचे दर्शन होते. मी देशभर कधी हिंडू फिरू? मला मित्र म्हणतात, ''इतक्या लांब कशाला जाता?'' तेथे मला माझा प्यारा भारत भेटतो. हा आनंद त्यांना काय कळे? विनोबाजी एकदा म्हणाले, ''आकाशातील सप्तर्षी पाहून मला नकाशातील काश्मीर नि युक्त  प्रांत आठवतात.'' जेथे जातो तेथे भारताचे भव्य दर्शन. असे भारतमय आपण होऊ. हिमालय माझे डोके, विंध्याद्री माझा कंबरपट्टा, पूर्व-पश्चिम तीर माझे पाय, सर्व भारताच्या रूपाने मला नटू दे. सार्‍या माझ्या भाषा, सारे माझे भाऊ, माझे मोठे कुटुंब आहे. १०-१२ लाखांचे हे तुटपुंजे राज्य नाही. ३० कोटींचे. मग मोठया कुटुंबावर जबाबदारी अधिक. शिका दोनचार भाषा. प्रांताच्या सीमेवरचे भाग तर संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे माना. ते इकडे का तिकडे भांडू नका. सीमा समितीचा निकाल मान्य करून प्रेम-स्नेहाने नांदा.

प्रांतांनी भारती व्हावे आणि भारताने अति भारती व्हावे. महात्माजी उर्दू लिपी शिका म्हणत. अरे त्या महापुरुषाची दूरद्दष्टी कोठे आहे तुमच्याजवळ? एकीकडे आशियाचा संघ करा म्हणावे. इजिप्तपासून तमाम मुस्लीम राष्ट्रांची उर्दू. फक्त तुर्कांनी रोमन लिपी घेतली. या सर्व देशांचे विचार करायला त्यांची लिपी नको का कळायला? या सर्व मुस्लिम देशांचे राजकारण वा अर्थकारण अमेरिकेच्या वृत्तपत्रांवरून का आपण वाचणार, समजून घेणार? हिंदी, मुस्लीम राष्ट्रांचे हृग्दत कळावे म्हणून उर्दू लिपी शिकणे अवश्यक आहे. युरोपातील लोक अनेक भाषा शिकतात. झेक राष्ट्रात हिंदीचे वर्ग चालतात. काय त्यांना जरूर ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel