मार्गरेट इ नोबल या इंग्रजीबाई विवेकानंदांना लंडनमध्ये भेटल्या. ''मी तुमच्या देशासाठी काय करू शकेन.'' असे त्या ब्रह्मचारी विदुषीने विचारले. विवेकानंद म्हणाले, ''माझ्या देशातील मायभगिनीस शिकवायला या. कलकत्त्यात एखादी स्त्रियांची शाळा काढा.'' आणि निवेदितादेवींनी कलकत्त्यात येऊन शाळा काढली. विवेकानंदांनी १८९९ मध्ये रामकृष्ण मिशन संस्था काढली. ''आत्मनो मोक्षार्थ जगद्धितायच'' स्वतःसाठी, मोक्षासाठी व जगाच्या हितासाठी ही संस्था होती. किंबहुना जगाच्या हितातच स्वतःचा मोक्ष असे ही संस्था सांगत असते. विवेकानंद एकदा बेलूर मठात संन्यास धर्मावर बोलताना म्हणाले. ''संन्यास म्हणजे मरणावर प्रेम. रोज परसेवेत झिजायचे, तिळतिळ मरायचे. अशा मरणात मोक्ष असतो. देहाची आसक्ति नष्ट करणे, बारीक-सारीक कामात सुध्दा त्याचाची भावना जागृत ठेवणे म्हणजे संन्यास. एखाद्या क्षणी अत्युच्य विचारात रममाण होऊन सारे वैभव तृणवत् दूर फेकाल तर दुसर्‍या क्षणी कचर्‍याची टोपली उचलून सारे स्वच्छ कराल.''

सेवेच्या द्वारा त्यांना मोक्ष हवा होता. निरपेक्ष, निहंकारी सेवा. एकदा एक मुमूक्षु त्यांच्याकडे येऊन म्हणाला, ''मी दारे, खिडक्या बंद करतो. जप करतो. तरी देव भेटत नाही.'' तेव्हा म्हणाले. ''खिडक्या सताड उघडी टाक. तुझ्या खिडकी खालून रोज शेकडो प्रेते जात आहेत बघ. शहरात साथी आहेत त्यांची सेवा करायला जा. औषध दे. रस्तें, गटारे स्वच्छ कर.'' स्वतः स्वामी प्लेगच्या नि कॉलर्‍याच्या दिवसांत कलकत्त्यात मित्रांसह सेवा करीत होते.

कोणी विचारले, ''पसै खुंटले तर?'' स्वामी म्हणाले, ''बेलूरचा मठ विकीन, तेथील जमीन विकीन.'' त्यांना आसक्ति कसलीच नसे. महात्माजींनी हरिजन आश्रम नाही देऊन टाकला? महापुरुष वृत्तीने मुक्त असतात, अनासक्त असतात.

दरिद्र नारायण हा महाशब्द प्रथम विनेकानंदांनीच उच्चारला. ''नारायण हवा असेल तर दरिद्री बांधवांची सेवा कर. आज नारायण दरिद्री आहे. जा त्याला सुखी कर.'' महात्माजींनी हा शब्द सर्वत्र नेला. ते जेव्हा दानार्थ हात पसरीत तेव्हा ''दरिद्री नारायण के वास्ते'' असे म्हणतात.
विवेकानंदांना रडगाणे माहीत नव्हते. ज्ञानवैराग्याचा, अगाध ब्रह्मचार्यांचा तो अदभूत पुतळा! सामर्थ्याचे ते सिंधू होते. ते सिंहाच्या छातीचे होते. ते नेहमी म्हणत, ''मला एक हजार माणसे द्या., ती सिंहाच्या छातीची मात्र असू द्यात, मग भारताचा मी कायापालट करीन. वेदान्त तुम्हाला सांगतो की तुमच्यात परमात्मा आहे. त्याची चित्कळा, त्याचा अंश तुमच्यात आहे, मग तुम्ही खाली माना घालून का बसता? उठा नि पराक्रम करा. हिंदु धर्मात नाना भ्रष्ट गोष्टी शिरल्या. आपण पापी पापी म्हणत बसलो. हिंदुधर्माने हे दुबळेपणाचे तुणतुणे कोटून आणले? ते मोडूनतोडून फेका. 'चिदानंदरूपः शिवोऽहम्' ही तुमची घोषणा असू दे. 'नायमात्मा बलहीनेन लभ्य्ब'-दुबळयाला कोठला आत्मा?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel