भारतीय संस्कृतीत ज्ञानाला कधी विरोध नव्हता. अगदी क्रांतिकारक मत मांडणा-यांचाही तेथे गौरव होई. ते मत ऐकिले जाई. त्या मताच्या पाठीमागे किती तळमळ, किती व्यापकता, केवढा अनुभव, किती चिन्तन आहे हे पाहण्यात येई. त्या त्या मतासाठी मतस्थापक किती त्याग करावयास तयार आहे हे पाहण्यात येई. भारतीय संस्कृती प्रत्येक नवीन मत पटकन उचली असे नाही. असत्य असेल तर अदृश्य होईल.

परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान, असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. परमेश्वराची, ब्रह्माची व्याख्या काय? ‘ज्ञानम् ब्रह्म’ – ज्ञान म्हणजे ब्रह्म. ज्ञान म्हणजेच परमेश्वर, ईश्वराची याच्याहून थोर व्याख्या जगाला कोणीही दिली नाही. ईश्वराची उपासना करणे. ज्ञानाची उपासना अनंत रूपांनी करणे. समाजशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, भूगोल असो, इतिहास असो, आयुर्वेद असो, तत्तवज्ञान असो, योग असो, कर्मयोग असो, गणित असो, संगीत असो, ती ती ज्ञानस्वरूप परमेश्वराचीच पूजा होय. एकाच ज्ञानसूर्याचे हे अनंत किरण आहेत. महाभारतातील श्लोकांइतकीच गणितातील प्रमेयेही पूज्य आहेत. श्रुति-स्मृतींच्या अभ्यासाइतकेच सृष्टिशास्त्राचे अध्ययन पवित्र आहे. सनातन धर्मातील ही थोर दृष्टी आपण पुन्हा उचलली पाहिजे. परमोच्च बौद्धिक विकासाची ज्वाळा पुन्हा पेटविली पाहिजे. भारतीय संस्कृती तरच पुन्हा नवतेजाने नटेल. आज संस्कृतीरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतीरक्षक नसून संस्कृतीभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहात आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ-सनातनी आहेत.

सनातन या शब्दाचा अर्थच काय? “सनातनो नित्य नूतन:।” जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प३कट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात:

“हें नित्यनूतन देखिजे। गीतातत्त्व।।”

गीतेतील शब्दांचे अर्थ निरनिराळे दिसू लागतील. कारण त्या शब्दांकडे आज विसाव्या शतकातील परिस्थितीतून आपण पाहणार. अर्थाचा विकास होत असतो. शब्द लहान असतो, परंतु त्यातील अर्थ अनन्त आहे. विचारांची उत्क्रांती सदैव होत असते.

भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वा-याने पडेल, अशी का या संस्कृतीरक्षकांना भीती वाटते? या नवीन विचारांच्या वा-यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय? जर आलेली वा-याची झुळूक ज्याला सहन होत नाही, तो क्षयी लवकरच मरणार, असाच नाही का ध्वनी निघत? भारतीय संस्कृती का अशी लेचीपेची आहे? आमच्या दृष्टीने ती तशी नाही. ज्ञानावर, अनुभवावर ज्या संस्कृतीचा पाया रचला आहे, त्या संस्कृतीला कधीही भय नाही. किल्लेकोट बांधून, भिंत बांधून ती बुरखा घेऊन बसणार नाही. हे बुरख्यातील बावळट पावित्र्य भारतीय संस्कृतीस नको आहे. नवीन विचारांचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. जगातील कोणतीही अनुभवाच्या कसोटीस उतरलेली, ज्ञानावर उभारलेली संस्कृती आणा; भारतीय संस्कृतीचा तिच्याशी निरोध नाही.

जगातील प्रयोगाचा भारत उपयोग करून घेईल. भारतीय संस्कृतीचे दरवाजे मोकळे आहेत. साम्यवादाचे विचार आले, तर त्यांत श्रीकृष्णाचे बालचरित्र भारतीय संस्कृतीस दिसेल. गोकुळातील लोणी चोरणार श्रीकृष्ण, सर्व पददलितांची बाजू घेणारा श्रीकृष्ण, सर्व साम्राज्य धुळीस मिळविणारा श्रीकृष्ण, त्याचेच दर्शन सम्यवादात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखणा-यास होईल. “सत्याअसत्यासी मन केले ग्वाही” असे म्हणणा-या तुकारामाचेच दर्शन, “स्वत:च्या बुद्धीला पटेल ते करा’ असे सांगणा-या ध्येयवादी नवविचारवंतांत ख-या संस्कृतीच्या उपासकाला घडेल! भारतीय संस्कृतीस भीती, नाश व मरण हे शब्द माहीत नाहीत. कारण ज्ञानाला नाश नाही; आणि ज्ञानावर ही संस्कृती उभी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel