सांगलीत कृष्णेच्या पाण्यास भयंकर ओढ आहे. गुडघाभर पाण्यातून सुध्दा प्रवाहाच्या विरूध्द दिशेला जाणे जड जाते. आम्ही स्नाने केली. नंतरकाही प्रसिध्द मंदिरे पाहिली. येथील प्रसिध्द गणपती मंदीर पहिले. काळे काळे दगड फारच सुंदर वाटले. आरशासारखे ते दगड आहेत, त्यात प्रतिबिंब दिसे. एकेक दगड किती तरी लांब- रुंद आहे. आम्ही बारा वाजेपर्यंत भटकलो. खंदक वगैरे पाहिल. नंतर आम्ही स्टेशनवर आलो. आमच्यात आता ताटातुटी व्हायच्या होत्या. जो तो आपापल्या धरी दिवाळीला जाणार होता; परंतु मी कोठे जाणार?

'' श्याम, तू माझ्याबरोबर चल. उद्या दिवाळी आहे. आमच्याकडे तुझी तुझी दिवाळी होऊ दे.'' नावडी गावचा मित्र म्हणाला.
मी 'बरे' म्हटले. आम्ही क-हाड स्टेशनवर उतरलो. तेथून तो व मी नावडीस गेलो. त्या मित्राची तेथे पेरुची बाग होती. आम्ही त्या बागेत हिंडलो. पोपटांनी पोखरलेले गुलाबी पेरु झाडांवर दिसत होते. पेरुचा वाससुटला होता. ताजे ताजे पेरु त्या दिवशी मी पोटभर खाल्ले.

दिवाळी झाल्यावर दुस-या दिवशी मी तेथून परत निघालो. मीपायी निघालो. मी एकाटाच होतो. अनेक विचार करीत निघालो. मल्हारपेठ नावडीच्या जवळच आहे. एखादा रामोशी येऊन मला लुटणार तर नाही, अशी मला भीती वाटली. मला लुटून काय मिळाले असते? फार तर माझे दोन कपडे, दुसरे काय? रस्त्यावर एके ठिकाणी मल्हारपेठेकडे अशी पाटी वाचली. मी  भरभर चालू लागलो, 'मल्हारपेठेपासून दूर जाऊ दे लवकर'असे मी मनात म्हणत होतो. शेवटी मी क-हाड स्टेशन गाठले. गाडीला अर्धा- पाऊण ता अवकाश होता. गाडी आली. मी बसलो. रहिमतपूर सटेशनवर साधारण साडेतीन-चारच्या सुमारास मी उतरलो. औंध तेथून सात-आठ कोस होते. मी मनात ठरवले, की पायी निघायचे. आठच्या सुमारास मी औंधला पोचेन,असे वाटले. मी निघालो. रहिमतपूरच्या नदीच्या फरशीवरुन पाणीवाहात होते. नुकताच मोठा पूर येऊन गेला होता. तसे फरशीवर फार पाणी नव्हते; परंतु ओढ मनस्वी होती. मी कसाबसा बाहेर आलो. प्रत्येक क्षणाला मी वाहून जातो ती काय,असे वाटत होते! मी मरणाच्या प्रसंगातूनच वाचलो म्हणायचा!

पावसाची चिन्हे दिसू लागली. मी झपझप जात होतो. मध्येच धावपळ करीत होतो. शेवटी पाऊस आलाच. वादळ सुरु झाले. खरोखरचा तो मुसळधार पाऊस होता. माझ्यावर महान अभिषेक होत होता. वाटेतील नाले खळखळ वाहू लागले होते. आता वाटेत नदी वगैरे नव्हती, हे माझे नशीब. अंधार पडू लागला. संध्याकाळ होत आली आणि त्यात पावसाची अंधेर. आमावस्येची ती रात्र होती. काळीकुट्ट रात्र. कडकड वीज चमके. माझ्या कानठळया बसत.आपल्यावर वीज तर नाही ना पडणार, असे वाटे. रस्त्यावरचे खडे पायांना सुयांसारखे बोचत होते. आता तो पीर आला. मला भीती वाटू लागली त्या पिराजवळ म्हणे भुते असतात! मी सारा भिजून गेलो होतो. माझ्या डोक्यावर जटा वाढलेल्या होत्या. औंधची टेकडीवरीची देवी केव्हा एकदा दृष्टीस पडते, असे वाटत होते. पाऊस बिलकूल थांबेना. पाण्यातून जाणा-या मगराप्रमाणे मी चपळाईने जात होतो. केव्हा एकदा रस्ता संपतो, असे झाले. रहिमतपूरजवळ एकनाथचे गाव होते. तेथे का बरे मी थांबलो नाही? एकनाथ, वामन हयांना किती     आनंद झाला असता! त्याच्याकडे भाऊबीज झाली असती. त्यांच्या बहिणीने ओवाळले असते, पण माझा संकोच आड आला! क्शाला कोणाकडे जा! आपला कशाला कोणाला त्रास! मी म्हणजे विचित्र प्राणी आहे. आजूबाजूला अनेक प्रकारचे आधार असतानाही मी निराधच राहायचा. आजूबाजूला उदंड पाणी असूनही मी तहानलेच राहायचा उतरायला अनेक आप्तमित्रांची प्रेमळ घरे असूनही मी स्टेशनात पडून राहायचा देव देतो, पण कर्म नेते' म्हणतात, ते माझ्या जीवनात अक्षरश: खरे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel