'मी खोटं कशाला सांगू? तुमच्यावर संकट येऊ नये म्हणून सांगतो. तुमचा नवीन जोडा सुखाचा नांदो. मी जातो.'
तो नवखा गृहस्थ गेला. थोडया वेळाने वालजी आला. रोजच्याप्रमाणे आला. तो वर गेला. दिलीप व लिली काही बोलत होती. लिलीच्या डोळयांत पाणी आले होते.

'लिल्ये, काय झालं? प्रेमाचंच भांडण ना?'

कोणी बोलेना. तेथली ती स्तब्धता मारक होती.

'वालजी, आजपासून तुम्ही इथं येऊ नका. लिलीही तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही खुनी व दरोडेखोर आहात. आज मला कळलं. अशांशी संबंध ठेवणं पाप आहे. तो कमीपणा आहे,' दिलीप म्हणाला.

'क्रांतीत हेच शिकलास वाटतं?'

'ते काही असो. तुम्ही आहात की नाही खुनी व दरोडेखोर?'

'मी जातो. मी कुणीही असेन. मी कोण आहे ते देवाला माहीत. जातो लिल्ये. तुम्ही सुखानं राहा.'
वालजी उठला. तो निघाला. लिली पाठोपाठ जाऊ लागली.

'लिल्ये, मी पाहिजे असेन तर इथं बस. मी नको असेन तर त्यांच्या पाठोपाठ जा.'

लिली थबकली. तिला अश्रू आवरत ना. ती खोलीत जाऊन रडत बसली. ज्याने तिला लहानाचे मोठे केले, मध्ये तिच्यासाठी हालअपेष्टांशी, मृत्यूशी, गोळीबाराशी झुंज दिली, त्याच्यापासून ती दूर ओढली जात होती. वालजीच्या उपकारांच्या राशी, प्रेमाचे पर्वत लिलीसमोर उभे राहिले. ती दु:खाने गुदमरली. ती कावरीबावरी झाली.

वालजी खोलीत गेला. त्याच्या जीवनाचा तंतू जणू तुटला. हृदयात काही तरी तटकन् तुटल्यासारखे झाले. त्याने अंथरूण धरले. एक मोलकरीण काम करायला येई. ती खोली स्वच्छ करी, अंथरूण झाडी, पाणी भरी. काही खायला करून देई, वालजीच्या डोळयांत कृतज्ञता भरे.

लिलीचे कपडे, तिची लहानपणची खेळणी, तिची पुस्तके, सारे वालजीने आपल्या अंथरुणाभोवती गोळा करून  ठेवले. तो लिलीची खेळणी हातात घेई व ती हृदयाशी धरी. माझी खेळकर लिली, पोरकी लिली, सुखात नांदो, असे म्हणे. तिची पुस्तके तो उघडी. आपण लिलीबरोबर एखादे वेळेस कसे वाचीत असून. ती चित्रे कशी पाही, त्याला आठवे   व त्याचे डोळे भरून येत. एखादे वेळेस लिली पाठीमागून येऊन डोळे कसे झाकी ते त्याच्या डोळयांसमोर येई. दिलीपची व तिची प्रेमवेल वाढत असता आपण दुसर्‍या देशात जाऊन राहू, इथं नको, असं म्हणताच ती कशी गळयात गळा घालून रडली व आपण इथंच राहू, नको दुसरीकडे, वगैरे कसं म्हणाली व मी 'बरं हो, इथंच राहूं' कसं म्हटलं व ती कशी हसली ते त्याला सारं आठवलं. मी एकटा होतो. माझ्या जीवनात लिलीने प्रेम ओतले. मला कृतार्थ केले तिने. वालजीच्या मनात शेकडो स्मृती, शेकडो प्रसंग, शेकडो भावना!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel