त्या ब्रह्माचे आवश्यक असे नैतिक स्वरुप या संसारात अधिक मोलाचे आहे असे समजून, त्या नैतिक स्वरुपावर दृष्टी खिळविण्यासाठी त्या ब्रह्मालाच बुद्धांनी धर्म या नावाने संबोधिले. धर्माचा पंथ हाच ब्रह्माचा पंथ; धर्मात राहणे म्हणजेच परब्रह्मात राहणे. तथागत म्हणाले, ‘धर्म माझे शरीर, ब्रह्म माझे शरीर, मी धर्माशी एकरुप आहे, ब्रह्माशी एकरुप आहे.’ अष्टविध मार्गाला ब्रह्मयान किंवा धर्मयान अशा दोन्ही नावांनी बुद्धधर्मात संबोधिले आहे.

अनात्मवादी प्रतिपादितात, की आत्मा हा अहं म्हणजे सतत बदलत जाणारे एक तत्त्व. अलगद्दूपम सूत्तांत सत्यवस्तूच्या विनाशाचेच तत्त्वज्ञान बुद्धांनी शिकविले आहे, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. परंतु बुद्ध तो अरोप तेथे संपूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात, “मी पाच प्रकारच्या अहंचा त्याग करा असे सांगत असतो. शरीररुपाने असणारा, मनोमय असणारा, भावनामय असणारा, प्रवृत्तिमय असणारा, विज्ञानमय असणारा, असे हे अहं सोडा असे मी सांगतो.” एकदा दुर्बळ अशा तीस लोकांचा एक जथा बुद्धांना भेटला. हे लोक आपल्या स्त्रियांसह एका वनात कालक्रमणा करीत असत. त्याच्यापैकी एकाची बायको नव्हती. त्याने एक वैश्या ठेवली होती. परंतु एके दिवशी त्याचे लक्ष चुकवून त्याची सारी चीजवस्तू घेऊन ती पळून गेली. ते सारे तिचा शोध करीत हिंडत होते. त्यांनी बुद्धांनाही तिच्याविषयी विचारले. बुद्ध म्हणाले, “हे तरुणांनो, एका स्त्रीच्या शोधात फिरणे चांगले की स्वत:च्या शोधात, आत्म्याच्या शोधात फिरणे चांगले?”

“भगवन, आत्म्याच्या शोधात फिरणे चांगले” ते म्हणाले. धम्मपदात म्हटले आहे. ‘आत्म्याचा प्रभू आत्मा. दुसरा कोण प्रभू असू शकणार? ज्याने आत्मसंयमन केले आहे त्याला असा प्रभू मिळतो, की क्वचितच कधी कोणाला तसा मिळत असेल.’ एका सुप्रसिद्ध उता-यात बुद्ध म्हणतात, ‘शिष्यांनो, जे तुमचे नाही, त्याचे ओझे का घेता? त्यापासून मुक्त व्हा. आकार, भावना, विचार, इत्यादी गोष्टी म्हणजे तुम्ही नाही. या तुमच्या वस्तू नाहीत. एखादा मनुष्य या जंगलात गवत, फांद्या, शाखा, पाने सारे घेऊन जात असेल, त्यांचा स्वत:साठी उपयोग करीत असेल, ते सारे जाळून टाकीत असेल, तर तुम्हाला असे वाटेल का, की तो तुम्हाला नेत आहे, तुमचा उपयोग करीत आहे, तुम्हाला जाळीत आहे?”

“नाही महाराज, असे नाही वाटणार” शिष्य म्हणाला.

“का बरे?” बुद्धांनी प्रश्न केला.

“कारण, हे प्रभो, त्या वस्तू म्हणजे आमचा आत्मा नव्हेत, त्या आत्म्याच्या वस्तू नव्हेत.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel