प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ खाजगी हितगुज, एक प्रकारची देवघेव, सौदा असे होते. जगातील ऐहिक वस्तू मिळाव्या म्हणून आपण प्रार्थना करु लागतो. स्वार्थाची ज्वाळा अधिकच भडकू लागते. याच्या उलट बुद्धांचे ध्यान आहे. ध्यान म्हणजे स्वत:त बदल करणे. आत्म्याला नवीन बनविणे. जीवनात क्रांती करणे; पाशवी वृत्ती नष्ट करुन, परंपरागत आलेल्या सामाजिक वृत्ती, वंशपरंपरागत आलेल्या केवळ अनुकरणात्मक वृत्ती नष्ट करुन स्वत:चा नवीन विकास करुन घेणे. पाचवी गोष्ट म्हणजे त्या परम सत्याचे स्वरुप तर्कातीत आहे. त्या सत्याविषयी तर्काच्या परिभाषेत बोलण्याचा आग्रह धरणे वेडेपणा आहे. या सर्व गोष्टी सोडून जे निर्वाण उरते ते केवळ शून्यमय नाही. ते निर्वाण अस्तिरुप आहे; ते निर्वाण म्हणजे अंतिम सत्यस्वरुप. या अंतिम सत्यालाच धर्म म्हणणे बुद्ध पसंत करीत. परब्रह्माच्या या अंतिम सत्याविषयी बुद्ध नितांत मौन स्वीकारतात. या त्यांच्या मौनाला उपनिषदांत आधार आहे. उपनिषदे उदघोषितात, ‘तेथे दृष्टी जात नाही, वाणी जात नाही, मन जात नाही. ते ब्रह्म कसे शिकवावे? हे आम्हाला समजत नाही.’

बुद्धांच्या विचारातील काही अपूर्णता मी जाता जाता सूचित करतो. बुद्धधर्माच्या पुढील इतिहासात बुद्धधर्माचा हिंदू धर्माशी संबंध आला तेव्हा या उणिवा दिसून आल्या : १) तत्त्वज्ञान ही मानवी मनाची एक भूक आहे, आवश्यक अशी गरज आहे आणि जीवनाचे जे अंतिम प्रश्न त्या विषयींचे मत स्पष्ट न सांगणे ही गोष्टबुद्धांसारख्या थोर विभूतीने जरी उपदेशिले, तरी ती यशस्वी झाली नाही. बुद्धांचे श्रोते ही वृत्ती स्वीकारायला सिद्ध झाले नाहीत. निश्चित मार्गदर्शनाच्या अभावी पुढे बुद्धांवर नाना प्रकारच्या आध्यात्मिक विचारप्रक्रिया लादण्यात आल्या. बुद्धधर्माच्या आरंभीच्या वाढीत या गोष्टी दिसून येतात.  २) धर्म म्हणजेच अंतिम सत्यता असे बुद्ध मानीत. परंतु व्यावहारिकदृष्ट्या ही गोष्टी तितकीशी जवळची, प्रत्यक्ष, इंद्रियगम्य अशी वाटेना. धर्म म्हणजेच परमेश्वर ही कल्पना अमूर्त वाटे. व्यवहारात थोडी मूर्त कल्पना हवी. आपण चक्रादी साह्याने प्रार्थना करु शकणार नाही. अनुयायांनी पुढे बुद्धांनाच देवत्व दिले.  ३) ब्राह्मणधर्मात ज्यांनी जगातील नानाविध अनुभव घेतले, अशांसाठी संन्यास राखून ठेवण्यात आला होता. तिन्ही आश्रमांतून गेल्यावर संन्यासाचा अधिकार. परंतु बुद्धांनी ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रम यातून गेलेच पाहिजे असे नाही, असे सांगितले. वाटेल तेव्हा जगाच्या बंधनापासून, या उपाधींपासून मुक्त होण्यासाठी संसाराचा त्याग करावा.

बुद्धांच्या विचारांत या अशा तीन अतिशयोक्ती राहिल्या. ज्या लोकांजवळ बुद्धांना झगडायचे होते, त्या काळातील आध्यात्मिक जीवनाला कोणत्या लोकांशी झगडावे लागत होते, तिकडे लक्ष दिले म्हणजे बुद्धांच्या विचारांतील या अतिशयोक्ती आपण समजू शकतो. परमेश्वराला साकार करुन त्याला केवळ संसारातील एक वस्तू बनवू पाहणारे सगुणधर्मवादी, विधिनिषेधांचे अवास्तव स्तोम माजविणारे कर्मकांडी; आणि केवळ ऐहिकावरच भर देणारे जडवादी, असे त्या काळात पारमार्थिक जीवनाचे तीन शत्रू होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel