“आणि तुम्हीही मधूनमधून मदत करता. सोनीची चौकशी करता. मी तिच्यासाठी घेतलं आहे पांघरूण. तुम्ही किती उदार. खरोखरच तुमची श्रीमंती तुम्हांला शोभते. तुमची श्रीमंती म्हणजे जगाला शाप नसून जगाला आशीर्वाद आहे. वास्तविक सोनी कुठची कोण. एका अनाथ स्त्रीची अनाथ मुलगी. लोक तर अशांचा तिरस्कार करतात. परंतु तुम्ही त्या दिवशी स्वत: सोनीला आपल्या घरी बाळगण्यास तयार झाले होतेत. मला ती गोष्ट आठवते आहे. पंधरा-सोळा वर्षे झाली. त्या वेळेस मी सोनीला घट्ट धरून म्हटलं, ‘नाही. मी ती कोणाला देणार नाही. ती माझ्याकडे आली. माझी झाली.’ तुम्ही ‘बरं’ म्हटलंत. तत्काळ दहा रुपये मदत म्हणून दिलेत आणि नेहमी चौकशी करता. थोर आहात तुम्ही. सोनी तुम्ही नेली असतीत तर माझी काय दशा झाली असती? सोनीमुळे माझ्या जीवनात आनंद आला. माझा पुनर्जन्म झाला. ही पंधरा वर्षे किती सुखात गेली! ती पहिली पंधरा वर्षं व ही नंतरची पंधरा वर्षं; दोघांत किती फरक? सोनीनं मला कृतार्थ केलं.” मनूबाबा प्रेमाने सोनीच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले.

“सोनीनं तुम्हांला कृतार्थ केलं. आता आम्हांला कृतार्थ करू दे.” संपतराय म्हणाले.

“म्हणजे काय?” म्हतार्‍याने भीतभीत विचारले.

“मनूबाबा, आज इतक्या रात्री आम्ही दोघं तुमच्याकडे का आलो माहीत आहे? आहे काही कल्पना?”

“थंडी पडली आहे. सोनीला पांघरूण वगैरे आहे की नाही पाह्यला आले असाल. किंवा देण्यासाठी बरोबर एखादं लोकरीचं पांघरूण घेऊन आले असाल किंवा दुसरी काही मदत घेऊन आले असाल.” मनूबाबा म्हणाला.

“सोनीला माझं सारंच देण्यासाठी मी आलो आहे. पाच-दहा रुपयांची मदत किती दिवस पुरणार? एखादं पांघरूण किती पुरं पडणार! सोनीला नेण्यासाठी मी आलो आहे. सोनी आमच्याकडे येऊ दे. आमच्याकडे कायमची राहू दे. सुंदर कोवळी मुलगी. तिला गरिबीचा गारठा नको. रानांत फूल फुलतेच. परंतु बागेत अधिक चांगले फुलते. बागेतील फुलांच्या पाकळ्या मोठ्या टपोर्‍या दिसतात. त्याला सुवास अधिक येतो. तिला शिकू दे. मी पंतोजी ठेवीन. तो तिला शिकवील. तसंच भरतकाम वगैरे शिकवायला एक बाई ठेवीन. सोनी कुशल होऊ दे. हुशार होऊ दे. तिचा नीट विकास होऊ दे. मनूबाबा, तुम्ही नाही म्हणू नका. इतके दिवस सोनीचं तुम्ही केलंत, आता आम्हांला करू दे. इतके दिवस तुम्ही घरात मूल असल्याचा आनंद उपभोगलात. सोनीचे आईबाप झालात. आता आम्हांला होऊ दे तिचे आईबाप. आमच्याही घरात मूलबाळ नाही. सोनी आमची मुलगी होऊ दे. सुखात वाढू दे. पुढे तिचं लग्न करू. मोठ्या घराण्यात देऊ. अंगावर हिर्‍यामोत्यांचे दागिने पडतील. घरात गडीमाणसं कामाला असतील. फिरायला जायला घोड्याची गाडी असेल. फुलांच्या बागा असतील. फळांच्या बागा असतील. सोनी जशी राजाची राणी होईल. मनूबाबा, असे का खिन्न दिसता? मी सांगतो याचा तुम्हाला नाही आनंद होत? सोनी एखाद्या गरिबाच्या घरी पडावी असं का तुम्हाला वाटतं? तिचे हात काबाडकष्ट करून दमावेत असं का तुम्हांस वाटतं? सोनी सुखात नांदावी असं तुम्हांला नाही वाटत?” संपतराय थांबला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel