राम :- जे विचार स्वत:ला हितकर वाटले ते दुस-याला सांगणे, हे कर्तव्य आहे. मग तसे करण्यामुळे कुचेष्टा होवो व दगड डोक्यात मारले जावोत.

श्याम :- होय, आपले विचार सांगत असताना असा एखादा दगड डोक्यात बसून मरण यावे, असे कितीदा मला वाटत असे. आपले विचार ओठांवर खेळत असता आलेले मरण, हे परमथोर मरण होय. परंतु माझे भाग्य तेवढे नाही. असे मरण म्हणजे देवाच्या लाडक्या लेकराची ती मिळकत असते. हौतात्म्य म्हणजे ईश्वराची परमकृपा.

नामदेव
:- परंतु प्रत्येक व्यक्ती थोडीफार तर हुतात्म्याच असते. प्रत्येकाला या संसारात कष्ट आहेतच.

राम :- ते कष्ट निराळे. गाढवाला गोणी वाहण्याचे कष्ट का नाहीत ? ध्येयासाठी कष्ट आनंदाने भोगणे यात हौतात्म्यच असते.

शंकर :- परंतु हे वादविवाद कशाला ? आपण साधी माणसे आहोत.

श्याम :- अरे, चित्कळा तुमच्यातही आहे. ईश्वराचे तेज तुमच्यांतूनही प्रकट होईल. 'आपण साधी माणसे. आपण साधी माणसे' असा हा बावळट नम्रपणा काय कामाचा ?

नामदेव
:- फुगा असतो किती लहान, सुरकतलेला, बोटभर ! परंतु त्यात फुंक मारा. कसा तेजस्वी दिसतो, सुंदर दिसतो, मोठा होतो.

गोविंदा
:- ध्येयाचा वारा आपल्या जीवनात भरपूर शिरु दे. आपली जीवनेही मग सतेज दिसतील.

शंकर :- परंतु फार वारा घातला तर फुगे फुटतात.

राम :- फुटू दे. तसेच पडून राहण्यापेक्षा ध्येयाला जीवनात ओतप्रोत भरताना हे जीवन फुटू दे. फूटू दे मडके. हे मृण्मय मडके फुटण्यासाठीच आहे.

राजा :- प्रमाणात सारी मौज आहे. शक्तीप्रमाणे वागावे.

राम
:- शक्तीही वाढत वाढत जात असते.

शंकर :- परंतु एकदम वाढत नाही.

प्रल्हाद
:- तुमच्या वादविवादाने श्यामला त्रास होईल. तुम्ही उठा सारे. तुमचे वादविवादच फार.

नामदेव
:- वादविवादाला भिऊन थोडेच चालणार आहे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel