परंतु ती झालेली गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आपल्या दु:खी व दुर्दैवी देशाची ती खरी वस्तुस्थिती आहे. आपणांत सहकार्याचा पूर्ण अभाव आहे, याची ती निशाणी आहे. कोणताही संघ काढा, कोणतेही मंडळ काढा, ती अल्पायुषी व्हावयाचीच ! परस्परांचा उत्कर्ष परस्परांस पहावत नाही. दुस-याचे यश आपणांस पहावत नाही. मंडळातील कोणीही कीर्ती मिळविली, तरी ती सर्व मंडळाच्या मालकीची आहे, त्यात आपण सारे भागीदार आहोत, असे वास्तविक वाटले पाहिजे. एकाचे यश ते सा-यांचे यश. एकाचे अपयश ते सा-यांचे अपयश, परंतु ही सामुदायिक भावना आपल्यांत नाही. यामुळे हिंदुस्थानचे हसे होत आहे. व्यक्तीला आपण क्षणभरही विसरत नाही. क्रिकेटचे खेळ खेळतात. चेंडू फेकणाराचा उत्कर्ष एखाद्याला सहन होत नाही व त्याच्या फेकीवर उडालेला झेल मुद्दाम सोडून देण्यात येतो ! परंतु सा-या संघाला पराभूत व्हावे लागते; मान खाली घालावी लागते. फुटबॉलच्या खेळात एखादा खेळाडू स्वत:ला सारे श्रेय मिळावे म्हणून आपणच एकटा चेंडू घेऊन जाऊ पाहतो. सहकार्याशिवाय काय होणार ? परंतु सहकार्य तेव्हाच होईल की जेव्हा भेदभाव व मत्सर नसेल. परंतु आपल्या देशात द्वेष व मत्सर यांना तर जसा ऊत आला आहे ! एका प्रांताने दुस-या प्रांतास तुच्छ मानावे, एका जातीने दुस-या जातीस हीन मानावे, महाराष्ट्राने गुजराती पुढा-यांचे का ऐकायचे ? गुजरातने गंगातटाकी जन्मास आलेल्यांचे का ऐकावयाचे ? आणि गंगातीरावरच्याने कावेरीतीरवाल्यांचे का ऐकावयाचे ? परंतु लोकमान्यांसारखा, महात्मा गांधींसारखा, पंडित जवाहरलाल नेहरुंसारखा पुढारी का सारखा लाभत असतो ? लोकमान्य का सारखे महाराष्ट्रात जन्मास येतील व महात्मा गांधी का गुजरातेत वरच्यावर होतील ? त्या त्या प्रांतात महान पुढारी जिवंत असतो त्यावेळेस सारे राष्ट्र त्याच्या मागे जाते. महाराष्ट्रात लोकमान्य होते; तर महाराष्ट्राकडे राष्ट्राचे आशेचे डोळे असत. आज गुजरातमध्ये महापुरुष असेल तर राष्ट्र आशेने तिकडे डोळे लावील. यात द्वेषमत्सरास वाव कोठे आहे ? सदोदित माझाच प्रांत राजकारणात हिंदुस्थानचा गुरु झाला पाहिजे, याचा अर्थ पदोपदी लोकमान्य जन्मले पाहिजेत. परंतु परमेश्वर अशा विभूती वरच्यावर पाठवीत नसतो. कोणालाही अहंकार बाधा होऊ नये म्हणून तो महान विभूती एकाच प्रांतात न पाठविता निरनिराळया प्रांतांत, भिन्नभिन्न देशांत उत्पन्न करतो. महान विभूती कोठेही असो, ती आपलीच आहे, ही भावना असली पाहिजे.

परंतु ही थोर दृष्टी आहे कोठे ? प्रत्येकाला वाटते मी म्हणजे गांधी-टिळकच आहे. गांधींच्या मागे जातील त्यांना बुध्दी नसते. ते आंधळे. त्या मेंढया ! टिळकांचे राजकारण, टिळकांचे राजकारण असे घोकणारा मात्र काय तो बुध्दिमान ! अशी जर बुध्दीची वाटणी व्हायला लागली तर त्या बुध्दीची कीवच केली पाहिजे. मी तेवढा विचार करतो, बाकीचे सारे माझ्याप्रमाणे बोलत नाहीत व वागत नाहीत. यावरुन ते आंधळे आहेत. त्यांना बुध्दी नाही. ते विचार करीत नाहीत असे म्हणणे याहून धाष्टर्याची दुसरी कोणती गोष्ट असू शकेल ? ईश्वराने मला बुध्दीचा दिवाळा दिला आहे तसा सर्वांना दिला आहे. दिलेल्या प्रकाशात ज्याला जसे जितके दिसेल तसा तो जातच आहे. परंतु अहंकाराची समजूत कोण घालणार ?

गवंडी जर दगडाची नाके थोडथोडी छिन्नीने छाटणार नाही तर इमारत कशी उभी राहील ? त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनाची सुंदर इमारत उभी राहावी यासाठी सर्वांनी आपापली नाके थोडी छाटून घेतली पाहिजेत. प्रत्येकाने थोडथोडी मुरड घातली पाहिजे. परंतु दुस-याने मात्र मुरड घालावी, मी रेसभरही पुढे येणार नाही, असे जर कोणी म्हणू लागले तर ऐक्य कसे व्हावयाचे ?

जगात संयम ही सार्वभौम वस्तू आहे. खाण्यापिण्यात संयम, भोगविलासात संयम आम्हांला शिकविण्यात येत असतो. सार्वजनिक जीवनातील संयम मात्र आम्ही कधीच पाळीत नसतो. ज्या समाजात सार्वत्रिक संयम नाही, त्या समाजाची शकलेच व्हावयाची. सारे एकांडे शिलेदारच राहावयाचे. 'करंटे मिळाले सर्व,' असेच समर्थ आजही अवतरले तरी त्यांना म्हणावे लागेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel