या शनिमाहात्म्याचा दुबळा व नेभळा धर्म राष्ट्रातून जितक्या लवकर जाईल तितक्या लवकर गेला पाहिजे. ज्या शनिमाहात्म्याला लहानपणी मी विकत घेतले ते समाजातून केव्हा एकदा नाहीसे होईल, असे मला आज झाले आहे. माझ्या मित्रांजवळ मी अनेकवेळा ही गोष्ट बोललो आहे; परंतु शनिमाहात्म्ये नाहीशी करण्यापूर्वी लोकांना समजेल असा जीवनधर्म लहान लहान पुस्तकांतून त्यांच्या घरी नेला पाहिजे. गीताईसारखे सुटसुटीत सोपे धर्मग्रंथ होणे इष्ट व आवश्यक आहे. गीताई जर सर्वत्र गेली तर आपोआप ही शनिमाहात्म्ये व गुरुचरित्रे बंद पडतील. कर्तव्याचा दिव्य पंथ दाखविणारी गीता मुखात हवी, हृदयात हवी, हातात हवी. पावित्र्य, प्रेम, उत्साह व कर्तव्यपरायणता यामुळेच संसाराला खरे सौंदर्य लाभते व गीतेच्या शिकवणीने हे साध्य होईल. गीता म्हणजे आलस्याचा निरास, मोहाचा निरास, विलासाचा निरास. गीता म्हणजे नैराश्याचा, स्वार्थाचा दंभ-मत्सरांचा निरास. गीता सांगते कर्म करा. कर्म ज्ञानपूर्वक करा, हृदयाचा जिव्हाळा ओतून करा. कर्म करण्यातच इतके तन्मय व्हा की, फळाचा विचार करावयास तुम्हाला वेळ उरणार नाही. झाडाला पाणी घालण्यात रमा, त्याच्यावरची कीडामुंगी पहा. बकरीला येऊ देऊ नका. खत घाला. झाडांचे संवर्धन करण्यात अहर्निश वर्षानुवर्षे रमलेत तर फळांचे घड आज ना उद्या वर लटकल्याशिवाय कसे राहतील ?

त्या दिवशी मी शनिमाहात्म्य वाचून त्याला कव्हर घालून ठेवून दिले व रामाचे चित्र जाता येता पहात बसलो, परंतु आमच्या वाडयात शांभवी तयार करण्यात येत होती. शांभवीला घोटा हे नाव आहे. शिवरात्रीला तर त्या घोटयाचे फारच महत्त्व. देवाचे स्मरण करुनच जर संसाराची विस्मृती पडत नसेल, देवाचे सुंदर ध्यान पाहूनच जर वेड लागत नसेल तर घोटा पिऊन तरी संसाराची विस्मृती पडावी अशी मानवाची खटपट असते.

मला रात्री आठनऊच्या सुमारास शांभवी पिण्यासाठी बोलविण्यात आले. घरच्या मालकांनी ती तयार केली होती. मला शांभवी म्हणजे काय ते माहीत नव्हते. मी विचारले, 'हे काय आहे ?' एक जण म्हणाला, 'श्याम ! बघतोस काय ? पी. अरे दोन-तीन कप प्यालास तर सारे इंग्रजी शब्द भराभर बोलू लागशील. सारे भाषांतर डोळयांसमोर दिसू लागेल.' मला शंका आली. ते घेण्यास मी कुरकुर करु लागलो. दुस-या एका माणसाने मला सांगितले,
'श्याम ! जारे. तू न पिणेच बरे.' 'घेऊ द्या हो थोडा प्रसाद. थोडयाने काय होणार आहे ?' असे इतर म्हणत. शेवटी एकाने माझ्या तोंडाला कप लावतास, 'थोडी चव तर घे. अरे श्याम ! सारे प्रकार माहीत हवेत. तुमच्या भिकारडया कोकणात तू कोठे पिशील ? घे थोडी लज्जत.'

मी भीत भीत तो कप पिऊन टाकला. थंडगार पेय होते. त्यात बर्फ घातला होता. वेलचीचा वास होता. चव तर बरी लागली. परंतु मी आणखी तेथे थांबलो नाही. मी खाली पळून गेलो. ज्या ज्या इसमांनी भरपूर प्राशन केले ते देहभान विसरुन गेले. त्यांना नेसूंचेही सावरेना. दुस-या दिवशी तिसरे प्रहरी ते शुध्दीवर आले. तो इतिहास जेव्हा मला कळला तेव्हा मी पळून आलो, याचे मला बरे वाटले. मी पुन्हा कधी घोटा प्यालो नाही; परंतु उत्तर-हिंदुस्थानात तर ते आतिथ्यदर्शक पेय मानतात. मी एकदा इंदूरच्या बाजूला एका खेडयात गेलो होतो. तिस-या प्रहरची वेळ होती. घोटा तयार होत होता. मला तेथे दोन चमचे ते पेय घ्यावे लागले. घोटयाला ते लोक थंडाई म्हणतात. उन्हाळयाच्या दिवसांत हे पेय माफक प्रमाणात घेणे बरे, असे ते लोक मला सांगू लागले. मी म्हटले, 'व्यसनी मनुष्य प्रत्येक व्यसनाचे समर्थन करु शकतो.'

ती कार्तिकी एकादशी गेली. ते रामाचे चित्र मात्र माझ्या स्मृतीत आहे. त्याला मी कसा जपत असे, किती दिवस ते मी पूजिले, हे सारे मला आठवते आहे. शेवटी ज्यात राम आहे ते जवळ ठेवा. बाकी सारे व्यर्थ होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel