बोरीच्या झाडावर चढणे कठीण असे. तरीही कोणी कोणी चढून वर जाऊन झाडे हालवी. खालचे लोक टिपीत. एखादे वेळेस खालचे कृतघ्न वर चढणा-यास एकही बोर ठेवीत नसत. एखादे वेळेस बोरीवर चढावे तोच घंटा कानावर येऊन आदळे. भराभरा बोरेवाले बोरे खिशांत भरीत. चिंचावाले चिंचा खिशांत कोंबीत; परंतु वर्गात घेऊन जाणेची कठीण. काही काही शिक्षक आमच्या आरोग्याचीही फार चिंता वहात असत. ते आमचे खिसे तपासावयास येत व खिशातील आमचे मौल्यवान खजिने खिडकीतून बाहेर फेकून देत. त्यांना आमचा हेवा वाटत असावा. एखादे वेळेस ते शिकवीत असत तर कोणी पटकन चिंचेचे बोटूक तोंडात टाकीत. दुसरा त्याच्याजवळ मागू लागे. चिंच पाहाताच आम्हा मुलांच्या तोंडास पाणी सुटे आणि फळयावरच्या सिध्दान्तावरचे किंवा वाक्यावरचे आमचे लक्ष उडे. शिक्षकांना हे कसे सहन होणार ? त्यांनीही आमच्या जवळची थोडी मागितली असती तर आम्ही नाही का म्हटले असते ? आमच्या जवळच्या चिंचा पाहून खात्रीने त्यांच्याही तोंडास पाणी सुटत असेल. परंतु आम्ही मुले त्यांना परकी होतो. आमच्याजवळ काय म्हणून ते मागतील व आमच्याबरोबर काय म्हणून खातील ? त्यामुळे आमच्या त्या चिंचा, आमची बोरे-सारे भिरकावून देण्यात येई. आम्ही उन्हातून एवढे गेलो, झाडावर चढलो, कोणी खालून नेम धरुन दगड मारले, काटे पायात बोचले तेव्हा कोठे तो वन्य मेवा आम्हास मिळाला; परंतु एका क्षणात तो जप्त होई, व खिडकीबाहेर फेकला जाई. अशाने का फळयाकडे आमचे लक्ष लागले असते ? आमचे लक्ष बाहेर फेकलेल्या त्या प्राणमोल वस्तूंकडे असे.

आमचे लक्ष चिंचा-बोरांकडे काय म्हणून जाई ? शिक्षकांचा पाठ ऐकताना त्या चिंचाबोरांचा विसर आम्हांला पडत नसे. चिंचा-बोरांपेक्षाही मधुरता व गोडी जर शिक्षकांत व त्यांच्या शिकविण्यात आम्हाला वाटती तर खिशांतील खजिन्याची आम्हाला आठवण तरी कशाला झाली असती ? विद्यार्थी आपण शिकवीत असता चिंचा-बोरे खातात याचा ख-या शिक्षकावर निराळा परिणाम झाला असता. तो अंतर्मुख    झाला असता. शिवाय चिंचा, बोरे फेकण्या ऐवजी वर्गातील सर्वांना गोपाळकृष्णाप्रमाणे जर त्यांनी वाटून दिली असती तर कोणाला फारशी बाधलीही नसती व त्यांना गंमत वाटून अभ्यासाकडे लक्षही लागले असते.

परंतु या असल्या फेकून देण्यामुळे मुले चिडत. ती युक्ती शोधून काढीत. चिंचा खिशात ठेवण्याऐवजी मुले टोपीत ठेवून देत. शिक्षक खिसे तपाशीत; परंतु शंकराच्या जटेत गंगा सामावली, त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या जटेत चिंचा सामावलेल्या असतील याची कल्पना शिक्षकास नसे. लबाडी करावयास आपणच शिकवीत असतो. तुरुंगात गेलेल्या चोरांना अधिक कौशल्याने चोरी कशी करावी, याचे शिक्षण तेथे मिळते. मानवी मनाचा अभ्यास जोपर्यंत होणार नाही व अहंकार जोपर्यंत थैमान घालीत आहे तोपर्यंत हे असेच चालावयाचे.

मधल्या सुट्टीत आंब्यांच्या कै-या पाडून खाण्यात पुरुषार्थ असे उंच आंब्यावर चढणे सोपे नसे. त्यांच्या बुंध्याचा घेरच एवढा असे की, आमच्या कवेत तो घेर मावत नसे. आंब्यांना नेम मारुन कै-या पाडाव्या लागत. शंकर जोशी व केशव जोशी हे आमचे मित्र उंच दगड मारण्यात कुशल होते. नेमका दगड मारण्यातही त्यांचा हातखंडा असे. एका आंब्याचे नाव आम्ही खोबरांबा ठेवले होते. कच्चे कितीही खाल्ले तरी दाब आंबत नसत. तो कच्चा आंबाही गोड लागत असे. त्या आंब्याच्या झावर पिकण्यासाठी म्हणून एकही कैरी आम्ही शिल्लक ठेवीत नसू. त्या आंब्याच्या झाडाला वाईट का वाटत असेल ? का    माझ्या कै-याही लोकांना किती आवडतात, असे मनात येऊन त्या आम्रवृक्षाला कृतार्थता वाटत असेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel