तुरुंगातील सारी शक्ती तेथे जमा झाली. दिगंबर रायांना त्यांच्या कोठडीत फेकून देण्यात आले. पोलीस व वॉर्डर यांना औषधपाणी मलमपट्टी वगैरे करण्यात आली. त्या इतर पाच कैद्यांना प्रत्येकी तीस तीस फटक्यांची शिक्षा देण्यात आली ! ती ताबडतोब अंमलात आणण्यात आली व त्यांनाही कोठडीत फेकून देण्यात आले. “मर जाव सब !” कोणी म्हणाले.

“पाणी-पाणी !” दिगंबर राय कण्हत म्हणाले. अंगात अपरंपार ताप होता. ते तळमळत होते. कोण पाणी देणार ? तेथे कोण होते ? कोणी नव्हते. “हाय-पाणी- मा गो मा ! मा !” दिगंबर रायांनी शेतकर्‍यांच्या मुलांना दुधे द्यावी, त्यांना पाण्याचा थेंब- अंगाची लाही लाही होत असता मिळू शकला नाही. दिगंबर राय, लौकरच ताप शांत होईल बरे तुमचा ! लौकरच सारे अंग कसे थंडगार होईल ! मग पुन्हा मुळीच ताप येणार नाही ! ! हा शेवटचा ताप, थोडा आणखी सहन करा ! ! “ओ रे दीनबंधू ! पार कर कृपासिंधू” कृपासिंधूने तहानलेल्या वासराची हाक ऐकली. दिगंबर राय त्या अंधारमय कोठडीत शांत झाले- व ज्योतिर्मय परमेश्वरात मिळून गेले ! त्यांच्या पाठोपाठ पाच फटके खाऊन विव्हळणारे ते त्यांचे मित्र-  तेही एकापाठोपाठ लगबग करीत आले. सरकारने यमराजाकडे कारागीर लोकांच्या दिव्य जीवनदुग्धाचा रतीब लावला होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel