ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये . हे साधले की मग , खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा , म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते . तोच नियम प्रेमाला लागू असतो . प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुध्दीला मूठमाती देणे जरुर आहे . नंतर , प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे . चुकूनसुध्दा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरुर आहे . एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तर्‍हेने देहाला दुखापत केली , तर ती थोड्याफार वेळाने भरुन निघेल , आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील ; पण मन दुखविण्याइतकी वाईट गोष्ट दुसरी नाही . मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे ; कारण , भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यांत ‘ मी मन आहे ’ असे सांगितले आहे .

सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे , पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो . एखादा मनुष्य जर असे म्हणाला की , मी एक सत्य तेवढेच जाणतो , आणि सत्य बोलताना आई , बाप , माणसे , देव , गुरु , वगैरे कुणालाच ओळखत नाही , तर त्याला काय म्हणावे ? एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील , तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे ? चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला , त्याला चोरी करु दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करु देणे हे योग्य म्हणता येईल का ? सारांश , प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे . समजा , एका बापाला चार मुलगे आहेत ; त्या चारांपैकी एकाला गोड आवडते , दुसर्‍याला आंबट आवडते , तिसर्‍याला तिखट आवडते , आणि चौथ्याला तेलकट आवडते . आता प्रत्येकाच्या या रुचिवैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले , तर भांडण कधीच मिटणार नाही . म्हणून भांडण मिटवायचे असेल , तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम ; आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता , ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत , त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम ; म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून , आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल . कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे , या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले , तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel