निशाचं लग्न झालं तर सगळ्याना तिची फार काळजी लागून राहीली होती कारण तिचा नवरा जादूचे प्रयोग करायचा त्याचं तेच प्रोफेशन होतं
जादुगाराला जवळून बघायला मिळेल म्हणून बघायचा कार्यक्रम हिच्याच हट्टापायी ठरला आणि लग्न सुद्धा हिने ठाम होकार दिल्यामुळे झालं
तो निशाला बघायला आला तेंव्हाही त्याने असेच त्याच्या दृष्टीने मामुली असे दोन चार हातचलाखिचे प्रकार दाखवले होते सगळे चकीत वगैरे झाले होते पण सगळे अचंबीत झाले जेंव्हा निशाने त्याच्याशीच लग्न करायचा ठाम निर्णय घेतला, तो खरच किमयागार आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसला
जरा नाराजीनेच निशाचं त्याच्याशी लग्न लाऊन देण्यात आलं ,
गणपती नवरात्रात त्याला खूप मागणी असायची ठीकठीकाणी त्याचे प्रयोग व्हायचे मग तसा तो रिकामा असायचा,टिकीट लाऊन जादूचे प्रयोग करण्याचे दिवस केंव्हाच सरले होते, कधीतरी लागेल म्हणून जमवलेली प्राँपर्टी मात्र कायम अप टू देट ठेवावी लागायची, म्हणायला प्राँपर्टी नाहीतर बाहेरच्या बाजारात त्याला दमडीची किम्मत नव्हती
कबुतरं ऊंदीर, पोपट असे प्राणी पाळावे लागायचे , त्यांची नीगा राखावी लागायची मधे काही दिवस माकड सुद्धा पाळलं होतं
प्रयोगाचं सामान ठेवायला एक खोली भाड्यानं घेतली होती त्याचही भाडं भरावं लागायचं, हिची नोकरी चांगली होती म्हणून सगळं निभावलं जातं असं हिच्या घरचे म्हणायचे, तिला भेटायला मुद्दाम असं कोणी जायचं नाही,जादुगाराशी लग्न करून बिचारी वेगळीच पडली होती
पण बघावं तेंव्हा दोघे खुश असायचे, आणि अनुभवाने सांगतो कितीही प्रयत्न केला तरी सुखी असल्याचा अभिनय करता येत नाही आणि सुखी असल्याशिवाय खुश राहता येत नाही, पण हे कोणी लक्षातच घेत नव्हतं
काय त्याने तासाभरात निशाला भूरळ घातली डोळ्यादेखत मुलगी घेऊन गेला जस्ट गम्मत म्हणून बघायचा कार्यक्रम ठरला होता, ती गम्मत अशी अंगाशी आली असा गळा तिची आई काढायची आणि त्याला दुजोरा देत तिचे बाबा उसासा सोडायचे
इथे निशा सुद्धा फावल्या वेळात पत्त्यांची जादू दाखवण्यात तरबेज झाली होती, आँफीस मधे मोठया हुद्द्यावर असूनही ती हे हातचलाखीचे प्रकार अगदी दिलखुलास पणे दाखवायची..बंद मुठीतलं नाणं समोरच्याच्या खिशातून काढण्यात तर ती इतकी तरबेज झाली होती की तिची कुठलीही काँनफरंस हा खेळ दाखवल्याशिवाय पूर्ण होत नव्हती हे सगळं कळल्यावर तर तिच्या घरचे अजूनच ढासळ्ले पोरगी दिवस रात्र एक करून शिकली काय आणि आता या कुडमुड्याच्या नादी लागून करते काय असा एकूण त्यांच्याविषयी बोलायचा नूर असायचा
आम्ही फक्त हे ऐकून होतो,ऐकून घेत होतो
मग परवा अचानक तिच्या घरी जाणं झालं तर तिचा जादुगार नवरा तिच्या कपड्य़ाना मस्त मजेत शीळ वाजवत इस्त्री करत होता, घर छोटसं पण छान सजवलं होतं ही म्हणाली अशा कामात जादू चालत नाही का?
तो हासत म्हणाला हिच तर खरी जादू आहे प्रेमाची, ज्यात हातचलाखी चालत नाही,ज्यात फसवता येत नाही, आम्हाला तो अगदीच वेगळा भासला
नाहीतर कितीतरी जण बाहेर मोठ मोठे हुद्दे भुषवत असताना घरी हातचलाखीचे प्रयोग करत असतात, हा जादूच्या प्रयोगाला वापरत असलेलं तंत्र हे लोक राजरोसपणे संसारात वापरत असतात आणि जोडीदाराची फसगत करत असतात, मी या विचारात असतानाच निशा आली आम्हाला बघून झालेला आनंद तिला लपवता आला नाही
ती आली तो त्याचा प्रयोगाच्या वेळी घालायचा महागडा पोषाख घेऊन
कित्येक हजार खर्च करून तो शिवला होता बघताना भपकेबाज पण त्याला किती चोरखिसे आणि चोरकप्पे होते, कुठल्या कप्प्यात ऊंदीर कंफर्टेबल राहतो आणि कुठून दडवलेल्या कबुतराला उडायला जागा मिळते, कुठे लपवलेला बल्ब प्रेक्षकांच्या दृष्टीने अचानक पेटतो तर कुठली नाडी ओढली तर बावन्न पत्ते पी टी ला निघालेल्या विद्यार्थ्यांसारखे शिस्तबद्ध टेबलावर अवतरतात हे त्यानी आम्हाला दाखवलं , खरच कौतूक वाटलं
निशा म्हणाली मामा त्याला आशीर्वाद दे आज त्याचा महत्वाचा इंटर्व्ह्यु आहे
जर हे काम झालं तर आम्ही पूर्ण सेटल होऊ
लकिली आम्ही वझिर्याच्या गणपतीला जाऊनच आलो होतो लगेच आशीर्वादाबरोबर गणपतीचा मिळालेला प्रसादाचा नारळही त्यांच्या हातावर ठेवला
आणि आज निशाचे बाबा घरी आले, भलतेच खुश दिसत होते, म्ह्णाले आमचा जावई भलताच टँलेंटेड ... पोरीने नशीब काढलं, परवा आमच्या जावयाचा एका परदेशी पंचतारांकीत हाँटेलात इंटर्व्ह्यु झाला आणि लागलीच तो सिलेक्टही झाला आता निशाला घेऊन तो स्पेनला उड्डाण करणार, बारा वर्षाचंं काँट्रँक्ट आहे निशालाही तिथे सहज जाँब मिळू शकतो, मला खात्रीच होती या मुला बद्दल, उगीच नाही मी बघायचा कार्यक्रम होऊ दिला, आपल्याकडे या प्रोफेशनला प्रतिष्ठा नाही त्याचे खरे कदरदान तिथेच.. वगैरे वगैरे ... तेंव्हाच निशाचा फोन आला मामा आम्ही पटकन येऊन जातो तिला म्हंटलं सावकाश ये
जादूचे प्रयोग बघतोय... प्रयोग आगदी रंगात आलेत...
By: Chandrasekhar Gokhale
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.