''माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारटयास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावयास आले. चल, ऊठ घे त्या शांतीला व खेळव झोपाळयावर तिला. उठतोस की नाही; का घालू कमरेत लाथ-''

संतापलेल्या आईचे वाग्बाण विश्वनाथाच्या हृदयास घरे पाडीत गेले. विश्वनाथ दिसायला हूड होता. परंतु बाहेरून कठोर दिसणारे त्याचे हृदय मृदू व प्रेमळ होते. त्याचा खरा स्वभाव कोणालाच कळला नव्हता. प्रेमाच्या व सहानुभूतीच्या अभावी त्याचे हृदयपुष्प कोमेजून जात होते.

विश्वनाथ पुण्यास आपल्या मामांकडे शिकावयास राहिला होता. परंतु तेथे त्याचे पटेना व तो तीनदा घरी पळून आला. या वेळेस तो घरी पळून आला त्या वेळेस त्याची एकुलती एक बहीण आजारी होती. या बहिणीवर सर्वांचा जीव. ती खरोखर फार गुणांची होती. सासरी तिचे किती हाल होत, परंतु ते माहेरी तिने कधी सांगू नये. फक्त या दुखण्यात मात्र वातात ती ते सर्व बोलली. तिला एक मुलगी होती. तिचे नाव शांती. शांती लहान आठ-दहा महिन्यांची होती. परंतु तापात आईजवळ कशी द्यावयाची? तिला सांभाळण्यास कोणी तरी लागे. विश्वनाथ तिला घेऊन घेऊन कंटाळला व त्याने शांतीस खाली ठेवून दिले आणि शांतीने रडण्यास आरंभ केला. आणि मग वर सांगितल्याप्रमाणे विश्वनाथास त्याच्या आईने वाग्बाणांनी घायाळ केले.

आयुष्यात असे काही क्षण येतात की, त्या वेळेस सर्व आयुष्यास निराळेच वळण मिळते. उनाड उद्योगशील होतात, चोर साव होतात, गर्विष्ठ नम्र होतात. विश्वनाथाचे तसेच झाले. त्या क्षणापासून विश्वनाथ निराळा झाला. तो शांतीस जराही रडू देत नसे. रात्रीच्या वेळी आपल्या बहिणीच्या तप्त कपाळावर ताम्हणात गार पाणी घालून तो ते धरून बसे. त्या खेडेगावात बर्फ व बर्फाच्या पिशव्या कोठून मिळणार? विश्वनाथ बहिणीच्या शुश्रूषेत तहान, भूक, झोप सर्व विसरून जाऊ लागला.

गावातील सर्व वैद्य थकले, पण बहिणीच्या दुखण्यास उतार पडेना. एक दिवस विश्वनाथ आपल्या आजोबांस म्हणाला, ''आजोबा, त्या आयुर्वेद ग्रंथात आपण आक्काच्या दुखण्याची लक्षणे पाहून एक काढा ठरवू या.'' नातवाचा पोक्त विचार आजोबांस पटला. ते मराठी पुस्तक दोघेजण पाहू लागले. त्यांनी एक काढा ठरविला. आजोबा म्हणाले, ''आता देवावर विश्वास, हा काढा द्यावा झाले.''

विश्वनाथ आक्कास काढा करून देई. काढयाजवळ तोच चुलीजवळ बसत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel