महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.