लंडन येथून त-हेत-हेचासुबक व उपयुक्त माल खरेदी करून हे दोघे होतकरू व्यापारी अमेरिकेस येऊन दाखल झाले. पूर्वीच्या आपल्या जुन्या छापखानेवाल्या मालकास बेंजामिन जाऊन भेटला व मला व्यापार करावयाचा आहे तर मी दुसरी सोय पाहतों असें सांगून मोकळा झाला. बेंजामिनची वर्तणुक अशी चांगुलपणाची होती. नंतर पूर्वीच्या बि-हाडी तो राहात असे तेथें गेला. त्या घराचा मालक आतां मरून गेला होता. घरवाल्याची मुलगी व बेंजामिन सारख्याच वयाचीं होती. या उभयतांचे पूर्वीपासूनच एकमेकांवर प्रेम होतें. बेंजामिन हा ज्या वेळेस इंग्लंडमध्यें गेला त्या वेळेस जाण्याच्या आधीं त्यानें आपल्या प्रेमाचा त्या मुलीच्या बापाशीं परिस्फोट केला होता. इंग्लंडमधून आल्यावर उभयतांचा विवाह करावयाचा असें त्या वेळीं ठरलेंही होतें. परंतु विलायतेंत गेल्यावर अनेग भानगडीमुळें बेंजामिनचा पत्रव्यवहार या घराशीं राहिला नाहीं. तेव्हां त्या मुलीच्या आईनें विवाह अन्य एका पुरूषाशीं सक्तीने घडवून आणिला. परंतु घाईनें व अविचारानें केलेल्या गोष्टी मूर्खपणाच्या ठरतात व करणारा पस्तावतो, तसेंच या मुलीच्या आईचें झालें. ज्या गृहस्थाशीं या अभागी मुलीचें लग्न त्याला आधींची पहिली एक बायको आहे असें उघडकीस आलें. आईस आपली चूक कळून आली. शिवाय हें लग्न नीट विधिपुरस्सर झालें नव्हतें आणि मुलीनें आपलें नांवही अद्याप बदललें नव्हतें. या सर्व गोष्टी बेंजामिन यास त्या घरीं गेल्यावर समजल्या. आपल्या निष्काळजीपणामुळें, पत्र वगैरे न पाठविल्यामुळें या मंडळीचा आपल्यावरील विश्वास उडाला - आणि हा सर्व शोककार वृतान्त आपल्या चुकीचापरिणाम आहे असें त्यास वाटून त्यानें त्या मुलीची व तिच्या आईची मन:पूर्वक क्षमा मागितली. पुढें योग्यकाळीं या उभयतां वधूवरांचा योगय विवाह घडवून आणावयाचा असें ठरलें.

बेंजामिन व त्याचा व्यापारी मित्र- दोघांनीं दुकान तर नीट थाटले. नवीन आणलेला माल सुंदर व सुबक रीतीनें मांडून ठेविला. कोणतेंही काम बेंजामिन मनापासून करावयाचा. दुकान नीट चालेल अशीं चिन्हें दिसूं लागलीं. परंतु नशिबाचे खेळ कांहीं निराळेंच असतात. बेंजामिन ज्या मित्राच्या मदतीमुळें व प्रोत्साहनानें या धंद्यात सामील झाला, तो तरूण व्यापारी मित्र अकस्मात मरणाधीन झाला. परंतु त्या व्यापा-याचें बेंजामिनवर भावाप्रमाणे प्रेम बसलें होतें. आपल्या मृत्युपत्रांत त्यानें बेंजामिन यास कांहीं पैसे ठेविले होते. हें मित्रप्रेम ! नाहीं तर बोलाचे मित्र खंडोगणती मिळतात.

आतां पुढें काय हा प्रश्र पुनरपि प्रामुख्यानें बेंजामिनसमोर उभा राहिला. बेंजामिनचा मेव्हणा या सुमारास फिलाडेल्फिया येथं आला होता. बेंजामिन यानें त्याला सल्ला विचारला. तो म्हणाला ''तुझ्या जुन्या छापखानेवाल्याकडे जा व तो नोकरी देतो का पहा. ''बेंजामिन यास तत्परिस्थितींत हेंच करणें श्रेयस्कर वाटलें, हितकर वाटलें. तो जुन्या मालकाकडे गेला व आपली पुनरपि नोकर म्हणून राहण्याची इच्छा दर्शविली. त्या मालकास बेंजामिनसारख्या हुशार माणसाची जरूरी होती. बेंजामिन हा कुशल कर्मकर होता व इंग्लंडमधून आणखी नवीन गोष्टी तो शिकून आला होता. बेंजामिनच्या देखरेखींखालीं छापखान्यांतील इतर सर्व नोकर नीट काम करावयास शिकले. म्हणजे मग बेंजामिन यास थोडया पगारावर राहावयास सांगावें किंवा काहीं तरी खुसपट काढून त्यास घालवून द्यावें असा मालकानें मनांत दुष्ट विचार - स्वार्थी आपमतलबी विचार योजून ठेविला.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel