कवी गोविंददास

आणि तेथलीच कवी गोविंददास यांची ती गोष्ट आहे. गोविंददास हे अत्यंत गरीब होते. ते त्या साहित्यसंमेलनास आले होते. परंतु त्यांना आत प्रवेश मिळेना. त्यांना कोण ओळखणार? स्वागत सभासद व्हावयास त्यांच्याजवळ पैसे कोठे होते? गोविंददासांची राष्ट्रीय गीते बंगालभर पसरली होती. परंतु हेच ते गोविंददास असे कोणाला माहीत नव्हते. त्यांच्या एका गाण्यात पुढील भाव होता.

'तू स्वदेश स्वदेश म्हणून म्हणतोस. परंतु हा देश तुझा नाही. हा देश तुझा नाही. हा देश तुझा असता, ही गंगा व ही यमुना जर तुझी असती, तर परक्यांच्या मालाने भरलेली, परकी सैन्याने भरलेली गलबते या नद्यांतून वावरली असती का? कशाला म्हणतोस हा स्वदेश माझा? हा देश तुझा नाही राहिला.' असा हा जनतेचा कवी होता. चित्तरंजनांच्या कानांवर ही गोष्ट गेली. ते धावत आले. दरिद्री कविरायाला त्यांनी हृदयाशी धरिले. त्याना सन्मान्य स्थानी नेऊन बसविले. कवी गोविंददास यांचे हृदय या प्रेमाने भरून आले. त्यांनी चित्तरंजनदासांना पुढे एक अत्यंत प्रेमळ, करुणगंभीर व भावनोत्कट पत्र लिहिले. या गोविंददासांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे,

'आज तुम्ही मला ओळखीत नाही. परंतु उद्या माझ्या समाधीवर तुम्ही फुले उधळाल.'

परंतु मरणाच्या आधीच चित्तरंजनांनी त्यांना ओळखले, त्यांचा सन्मान केला.

वृंदावनात जाऊ


चित्तरंजनांचा आत्मा दैवी प्रेमाकडे जायला आतून अधीर होत होता. ते बाह्म वैभव, ते विलास यात त्यांचा आत्मा नव्हता. ते सर्वांना देत होतेच. वंगभंगानंतर जे प्रचंड आंदोलन झाले, जे क्रांतिवीर झाले, त्यात अनेकांवर आपत्ती आल्या. किती फीशी गेले. किती काळयापाण्यावर गेले. कित्येकांच्या घरी अडचणी होत्या. जे पुढे तुरुंगातून सुटून आले, त्यांना कोठे आधार नव्हता. परंतु या सर्वांना चित्तरंजनांचा एक मात्र आधार होता. सहस्त्र हातांनी हा उदारात्म सर्वांना देत होता. विद्यार्थ्यांना देत होता. अनाथ व अगतिक देशभत्तचंना देत होता. बिपिनचंद्र पाल यांचा सर्व खर्च चित्तरंजनच चालवित. असा हा शतमुखी त्याग सुरूच होता. परंतु त्यांचा आत्मा सर्वस्वत्यागाची हाक ऐकत होता. ते वासंतीदेवीस म्हणायचे, ''आता सर्व सोडून वृंदावनात जाऊ. तेथे कृष्णाचे दर्शन घेऊ. गोपींनी प्रेमाचे पूर जेथे वाहवले, त्या यमुनेच्या तीरी लोळू. तेथे गीते आळवू, अश्रू ढाळू.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel