तिला आम्ही "ती" च म्हणायचो. तसे तिला नाव होते. पण आठवत नाही. अश्यासाठी आठवत नाही की आठवण्यासारखे काहीही नाही. मी ज्या शाळेंत ३ वर्षे घालवली त्या तिन्ही वर्षांत ती सर्वांत मागच्या बेंचवर बसायची. ती कायम घाबरलेली असायची. तिला बोलताना कुणी म्हणजे कुणीच पहिलं नाही. प्रेमाने कुणी बोलल्यास शुद्ध ती फारतर डोके हलवायची. ३ वर्षांत तिने तोंडातून शब्द काढला आहे अशी फक्त वंदता होती, कुणीही मी तिला बोलताना ऐकलंय असे आत्मविश्वासाने म्हटले नव्हते.

तिच्या संपूर्ण अस्तित्वांत काहीही विशेष नव्हते. ती गांवाच्या बाहेर एका जंगलातील घरांत राहायची. पाटील साहेबांचा मोठा मळा होता त्याचे रखवालदार म्हणून तिचे वडील राहत. ते तिला सायकलवरून शाळेंत सोडत. अगदी मिलिटरीतल्या प्रमाणे तिची वागणूक आणि पेहेराव होता. कधीही ती वेंधळटा प्रमाणे कपडे घालून अली किंवा केस कधी विस्कटलेले किंवा नखे कधी वाढलेली कधीच नाही. पण तोंडातून शब्द नाही. हजेरी घेताना सुद्धा ती फक्त डोके हलवायची. काही प्रश्न विचारल्यास फक्त मान हलवायची.

कधी कधी अश्या मुलांची विटंबना होते, काही वात्रट मुलें तर कधी मुलीच विनाकारण अश्या मुलांना बुली करतात. म्हणजे थट्टा करणे, मारहाण करणे, शिव्या देणे मानसिक त्रास देणे इत्यादी. पण तिच्या वाटेला जायची कुणाचीच हिम्मत नव्हती कारण वयाच्या मानाने आणि शारीरिक दृष्या ती थोडी जास्त वाढलेली होती आणि तिच्या अंगांत प्रचंड बळ होते. हो थोडे आश्चर्यकारक होते आणि भीती दायक सुद्धा त्यामुळे तिच्या वाटेल कुणीच जात नसे. आमच्या शाळेची घंटा एका देवळाच्या घंटे प्रमाणे होती. एक दिवस तिची दोरी तुटून ती खाली पडली आणि शाळेचे प्युन शंकर दादा एकटे घंटेला उचलू शकत नव्हते. हि तिकडेच होती, हिने जाऊन हातभार लावला आणि हा हा म्हणता घंटा उचलून धरली. अक्ख्या शाळेंत एक सुद्धा पोरगी नसावी जिला हे जमले असते, पोरांत सुद्धा फार तर दहावीच्या एका दोघांना असली ताकत असावी. त्या घटने नंतर सर्वानाच तिच्या विषयी भीती युक्त आदर वाटू लागला.

आमच्या घरांतील लोकांच्या मते ती मतिमंद असावी नाहीतर घरी तिला मारहाण वगैरे होते असावी त्यामुळे मानसिक दृष्ट्या ती खचली असावी. असेल कदाचित खरे.

शाळेंत अनेक शिक्षक होते, बहुतेक शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कथा सांगण्याचा नाद. आम्हाला सुद्धा त्यांत जास्त रस. पण हीचा चेहेरा अगदीच मक्ख. आमचे एक शिक्षक होते, फारच जुने. आम्ही मुले मूर्ख आहोत, टीव्ही ने आम्हाला बिघडवले आहे, आम्हाला उच्च प्रतीचे विनोद कळत नाहीत वगैरे ह्यांचे नेहमीचे तुणतुणे असायायचे. मग ते कधी कधी आम्हा मुलांची नक्कल म्हणून "तुमचे विनोद कसले तर 'ते श्वान पहा, नागडेच जात आहे'. असली तुमच्या विनोदांची लायकी'' आणि त्यांचा हा वात्रट विनोद सिद्ध करण्यासाठीच जणू सर्व क्लास "नागडा" ह्या शब्दावर खो खो खो करून पॉट धरून हसायची. मग त्यांना आणखीन चेव. पण ती मात्र मक्ख.

तिच्या प्रश्नपत्रिकेत विशेष काहीही नसायचे. बहुतेक करून ब्लॅन्क. मोकळ्या जागा भरा, जोड्या लावा असले प्रश्नच ती लिहायची. १०० पैकी कसे बसे १० मार्क मिळत असत.

शारीरक कवायतीत सुद्धा ती प्रचंड स्लो. काही उचलायचे वगैरे असल्यास तिला बोलवायचे पण पळणे वगैरे तिला जमत नसे. मुलांचा प्रमुख खेळ क्रिकेट तर मुलींचा टेबलटेनिस आणि रिंग. हिने रिंग फेकले तर तर झेपावे उत्तरेकडे प्रमाणे जायचे. एकदा मुलांचा बॉल आमच्या बाजूने आला, हिच्या कडे आला आणि हिने तो उचलून त्यांच्या दिशेने इतक्या जोराने फेकला कि तो मैदानाच्या दुसऱ्या बाजूंच्या जंगलांत जाऊन गायब. मग मुलांच्या शिव्या. पण हीच चेहरा निर्विकार.

मला कधी कधी विचार यायचा. दया यायची असे मी म्हणणार नाही कारण दयाभावांत आपण स्वतःला इतरांच्या वर ठेवतो. गाडीतून जाताना सिग्नल वरच्या भिकाऱ्यांची दया येते. उलट पक्षी होत नाही. (अपवाद कदाचित राहुल गांधी असावेत, त्यांच्या कडे आमच्या पेक्षा जास्त सत्ता आणि संपत्ती असली तरी त्यांची दया वाटते). तर विचार यायचा कि हिचे होईल तरी कसे ? हिच्याशी कोण लग्न करणार ? दहावी फेल म्हणून हि कुठे जाणार ? खरंच हि मतिमंद आहे कि तिची आणखीन काही समस्या आहे ? घरी खूप प्रॉब्लेम्स असतील का ? हिला आनंद कधी वाटत असेल ? काय ऐकून हि हसली असेल ? हि जेंव्हा घरी एकटी असेल तेंव्हा हिच्या मनात काय विचार येत असेल ? स्टाफरूम मध्ये शिक्षक हिच्या विषयी काय बोलत असतील ? इतर काहीं मुलींच्या मते (आणि ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यांत बहुतेक करून पोरांनी घातल्या असाव्यात) हि मुलगी नव्हतीच. तृतीयपंथी होती आणि ह्याला आधार म्हणून तिची अजब शारीरिक क्षमता पुरावा होता. त्याशिवाय जे स्त्रीसुलभ बोलणे मुलींच्या घोळक्यांत होते त्यांत हि भाग घेत नव्हती पण तिची जमेची बाजू म्हणजे ती कुठल्याच बोलण्यांत भाग घेत नव्हती.

मग पाटलांचा मळा कुणी तरी विकत घेतला. त्या निमित्ताने नवीन पार्टीने गांवातील काही प्रतिष्ठित मंडळींना मळ्यावर बोलावले होते. कोंबडी आणि कोल्ड ड्रिंक वगैरे ठेवले होते. म्हणून मी वडिलांसोबत तिथे गेले एक ऍडव्हेंचर म्हणून. मुख्य रस्त्यापासून एक कच्चा रास्ता जंगलांत जात होता. तिथे कुणाचा तरी भला मोठा म्हशींचा गोठा. त्यानंतर शेत. शेतातून चालत जावे लागते (आम्ही जीप ने गेलो). मग बांबूचे मोठे बन. त्यानंतर काजूची झाडे मग साधारण एक किलोमीटर नंतर एक छोटी नदी आणि तलाव त्याच्या बाजूला एक पडके घर आणि त्याच्या मागे मळा. हा मळा नक्की कशाचा होता आठवत नाही. पण ठाऊक असलेली झाडे नव्हती. ह्या घरांत मग मी तिला पाहिले. आणि सर्वप्रथम, अगदी पहिल्यांदा तिचे ओंठ थोडे अलग होऊन एक स्मित देताना मी पाहिले, किंवा भास सुद्धा असेल. मग तिच्या वडिलांना पहिले. ते भयंकर धिप्पाड होते. पण तेथे ते जी धावपळ करत होते आणि ज्या पद्धतीने लोकांशी बोलत होते त्यावरून ते काही उद्धट किंवा रागिष्ट अजिबात वाटत नव्हते. मी वडिलांना मग मुद्दाम सांगितले कि हीच ती, जी कधीही बोलत नाही. मग वडिलांनी सुद्धा तिच्या वडिलांची थोडी ओळख काढली, इथे काम कसे असते वगैरे. हिचे वडील गावचेच होते, आणखीन जंगलांत आंत राहायचे. पाटलांनी घर दिले म्हणून काम घेतले आणि आजूबाजूंच्या झाडांचे पीक, मध वगैरे काढून ते विकत असत आणि बदल्यांत मळ्याचे रक्षण. रात्री बिबटा, रानटी डुक्कर, दारुडे लोक इत्यादी मंडळी धोका होती. त्यांनीच आपल्या मुलीचा विषय काढला, घरांत कधीच कुणी शिकला नाही आणि बायको काही वर्षे मागेच मेली. हि एक मुलगी आहे म्हणून जगावे लागते अशी खंत त्यांनी प्रामाणिक पणे व्यक्त केली. लोकं सांगतात कि आज काळ शिकले तरच काही भविष्य आहे त्यामुळे शिकून सवरून मुलीने चांगला मुलगा पाहून लग्न करावे अशी इछा आहे वगैरे. मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटले. आमच्या दुर्ष्टीकोनातून किरकोळ वाटले तरी तिच्या खांद्यावरचे ओझे बरेच जड होते.

मी ती शाळा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले पण कधी ना कधी तिची आठवण आलीच.

टीप: २ वर्षे मागे म्हणजे २०१९ मध्ये मला हिची माहिती मिळाली. वडिलांना शेवटी दारूचे व्यसन लागले आणि ते त्यांतच रमू लागले पण तिने मळ्याची देखभाल आपल्या हाती घेतली. ज्या पार्टीने मळा घेतला होता त्यांनी आणखी जागा घेऊन मळा वाढवला, सरपंचांना पैसे खावऊन चांगला रस्ता करून घेतला आणि ट्रकने माल ये जा करू लागला. पैसे आले आणि हिला चांगले दिवस. शिक्षण नसले तरी ती बहुतेक कामे प्रामाणिक पणे करत असे, पैश्यांची विनाकारण हाव नव्हती त्यामुळे मळा मालकाने हिलाच तिथे ठेवले. मग हिचे लग्न एका ट्रक ड्रायव्हरशी झाले आणि एक मूल सुद्धा आहे. थोडक्यांत काय तर आम्ही विनाकारण चिंता करत होतो. मग शिक्षक भेटले, त्यांना हिची परिस्थिती ठाऊक होती. घरी कोणीच स्त्री नसल्याने तिला बिचारीला मार्गदर्शन देणारे कोणीच नव्हते. आम्हा मुलांना माहिती नसताना गांवातील काही महिलांनी आणि शिक्षिकांनी हिच्यावर बरीच मेहनत घेऊन तिला समाजांत राहण्यायोग्य बनवले होते आणि तिचे लग्न वगैरे करून देण्यात पुढाकार घेतला होता. ती मतिमंद नव्हती किंवा तिला शारीरिक काही बाधा नव्हती. फक्त बहुतेक बालपण एकटे गेल्याने समाजांत वावरण्याची क्षमता नव्हती. गांवातील जीवनाच्या कितीही वाईट बाजू असल्या तरी चांगली बाजूहीच असते कि सूर्याच्या सातव्या घोड्याप्रमाणे जरी कुणी मागे पडला असेल तर त्याला हात देणारे इतर अनेक हात येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel