पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा' ...! गीत ऐकत असताना सहजच सुचलेला हा विचार गीतरामायण मराठी संगीतातील एक अजरामर महाकाव्य त्यातील हे गीत म्हणजे मानवी जीवनाविषयक तत्त्वज्ञान सांगून विचार करण्यास भाग पाडणारे.. या गीतातील
'दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात?'
'जरामरण यातून सुटला कोण प्राणीजात?'
या ओळी अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात.
'वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा'
यासारख्या ओळी जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा योग्य स्वरुपात परिचय करून देणाऱ्या आहेत.
लेखक, ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांनी अनेक कथा, पटकथा कविता लिहिल्या. त्यांच्या या लेखनामुळे त्यांना लोकप्रियता लाभली आहे. परंतु, त्यांना अजरामर केले त्यांच्या 'गीतरामायणाने.'
ग. दि. माडगूळकर आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन कलाकारांच्या परिश्रमातून निर्माण झालेली 'गीतरामायण' ही कलाकृती म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव....साक्षात सरस्वतीचा लाभलेला आशिर्वाद .
अजून ही काही गीतरामायणातील ही गीते शब्दांची आर्तता उलगडत मनाला भावतात
'राम जन्मला ग सखे राम जन्मला' यातून व्यक्त झालेला रामजन्माचा आनंद. 'मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे' या गीतातील सीतेच्या मनातील आर्तता व असहायता
'सेतू बांधा रे सागरी' तसेच 'जय गंगे जय भागीरथी' या गीतातून व्यक्त झालेले सामूहिक मनाचे स्पंदन. या तरळ भावनांचे चित्रण माडगूळकरांनी समर्थपणे आपल्या काव्यातून चित्रित केले आहे.
मानवी जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारे मौलिक विचार सहजसुलभ भाषेत गीतरामायणातून व्यक्त झालेले आहेत. गीतरामायणात सरळ भाषेत बोध आहे. संभ्रमित मनाला जीवनमूल्यांची ओळख गीतरामायणाने करून दिली बागेत फुलांचा सडा पडलेला असताना ओंजळीत फक्त थोडीच फुले घेता येतात. त्याप्रमाणे गीतरामायणातील काही थोड्याच ओळींचा विशिष्ट दिशेने
शोध घेता येतो
गीतरामायणाला दुसरी कशाचीच उपमा देता येणार नाही. गीतरामायण म्हणजे मराठी भाषेचे वैभव. मराठी भाषारुपी मातेचा मौल्यवान असा अलंकार. मराठी भाषेला लाभलेले अमोल असे लेणे. मराठी भाषेचा हा अमोल असा सांस्कृतिक ठेवा. या शब्दांनी गीतरामायणाचे श्रेष्ठत्त्व सांगता
गीत रामायण चा प्रवास पाहिला तर त्यातील काव्य त्याचा प्रवास उलगडताना त्या काव्यातील शब्द ,सूर कानावर पडताना डोळ्यात नकळत अश्रू येतात खरच आत्ता या अशा परिस्थीत आपल्या हातात काही नाही हेच जाणवले अन् अशा रामायण आणि महाभारत महाकाव्यांनी जगाला काय दिले हे पटले लक्ष्मणरेषेचे महत्व कळले ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधार स्तंभ आहेत. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत, पडझडीत आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. रामायण, महाभारत या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान मिळाले. त्यातील महन्मंगल चारित्र्याच्या गुण संस्कारामुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतु हिमाचल पसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर ही संस्कृती अनेक भीषण आघात व इतिहासातील आक्रमणे पचवू शकली आणि आजच्या या परिस्थितीत ही तिच आधार ठरतील
भारतीय संस्कृतीची प्रसरणशीलता विलक्षण आहे. येथील पूर्वज जीवनाचे, संस्कृतीचे उच्च तत्त्वज्ञान घेऊन संपूर्ण जगात पसरले. कोणत्याही प्रकारची जुलूम-जबरदस्ती, हिसाचार न करता त्यांनी आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. त्याची साक्ष आज जे संशोधने होत आहेत, साहित्याचा अभ्यास होतो आहे, त्यातील भावधारा शोधण्याचा, तिचा उगम शोधण्याचा, संशोधक प्रयत्न करीत आहेत यावरून पटते आहे.
सध्याच्या या परिस्थितीत पुन्हा या महाकाव्यांचा आधार मानवी जीवनाला मनाला पुनर्जिवित करण्यास नकळत हातभार लावतील ...रामनवमीच्या दिवशी आपल्या आत्मरामाचे दर्शन नक्कीच घडेल शेवटी"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ."..हे च सत्य....!!!
©मधुरा धायगुडे