नचिकेत ला नुकतंच मिसरूड फुटू लागलं होतं. सहाजिकच शरीरात, मनात उत्साह नुसता सळसळत असायचा हल्ली!

आणि या वयात आई वडीलांमुळे जे irritation होतं तेही ओघानं आलंच!

' काय बोरिंग फॅमिली आहे यार!' हाच सूर असायचा मित्रांच्या टोळक्यात!

त्यातच आजूबाजूला इतकी'हिरवळ' दिसू लागली होती की फक्त तिकडेच लक्ष असायचं हल्ली!

घरी जाऊन करायचं काय?तेच सतत कामात असणारी ,स्वतः कडे जराही  लक्ष न देणारी आई आणि सतत महिन्याचा जमा खर्च मांडत असलेले बाबा!काय बोलणार ह्या दोघांशी? एकमेकांच्या जवळ बसून कधी गप्पा तरी मारल्यात की नाही कोण जाणे दोघांनी! 

हल्ली tv ,मोबाईल वर काय एक एक फॅमिली च असतात यार, किती एन्जॉय करतात! जी जाहिरातीतली 'संतूर मॉम' असो नाहीतर अजून काही, कसल्या 'maintain' राहतात आया! नाहीतर आपली,' राजा,हे खा, ते खा,अभ्यास कर,वेळेत झोप,करिअर वर लक्ष केंद्रित कर' एक ना दोन हजार सूचना देत असते !

साधं महिन्यात एकदा हॉटेल मध्ये जाऊ म्हटलं तरी 'नको रे ते बाहेरचं खाणं, त्यापेक्षा मी घरी करते काहीतरी छान' श्या life एन्जॉय करणं काही माहीतच नाही ह्यांना!नचिकेत च्या मनात हजार तक्रारी फेर धरत होत्या आई बाबांविषयी!

पण आज तसा खास दिवस होता , 'नीना ' नं तिच्या घरी बोलावलं आहे, ' स्टडी' साठी, तिचे घरचे कुठेतरी फॅमिली function साठी बाहेर जाणार आहेत! सही 'चान्स' आहे यार म्हणत हा जरा रोजच्या पेक्षा जास्तच उतावळा झाला होता! पटकन तय्यार होऊन केव्हा नीनाकडे पोहोचतो असं झालं होतं त्याला!

म्हणून च आज त्यानं झटकन घर गाठण्यासाठी  रिक्षा केली आणि घरी पोहोचला.'पटकन आवरू आणि घरी काहीतरी थाप मारून सटकू' असं मनाशी ठरवत त्यानं झपाझप जिना चढला. 

जिना चढतानाच त्याला थोडे हसण्याचे आवाज आले.' आपण पत्ता चुकलो का काय' अशी शंका आली त्याला!

त्यानं खिडकीतून डोकावलं तर बाबा चक्क आईच्या केसात गजरा माळत होते आणि आई चक्क लाजत होती.

नचिकेत थोडासा वरमला पण आत काय बोलणं होतंय तिकडे लक्ष होतं त्याचं!

"अहो,काय हे, शोभत का आपल्याला हे?मुलगा बरोबरीला येईल आता!"

" अग, मग काय झालं! आपला आपल्याला असा किती वेळ मिळतो आणि नचि बघेल ,त्याला काय वाटेल म्हणून अर्धा वेळ तर तू शेजारी येऊन बसायलाही टाळत असतेस! "

"अहो,मग काय, वयात येतोय लेक, उगाच वेडंवाकडं नको यायला त्याच्या मनात! शिवाय सतत त्याच्या करिअर विषयी काळजी वाटते,चांगलं पोर आहे हो, हे एवढं 'घाटातलं वळण' नीट ओलांडल की मग गाडी घसरायची नाही कुठे!"

" अग, किती विचार करतेस त्याचा !"

" मी काही एकटी नाही बरं! तुम्हीही सतत तेच तर विचार करत असता, पूर्वी नचि लहान असताना आपण सिनेमा, हॉटेलिंग काय काय धमाल करायचो ,हल्ली त्याच्या फी ला होतील म्हणून सतत saving सुरू असतं तुमचं!"

" अग, मग काय एकुलता एक लेक आपला , त्याला योग्य वाटेवर सोडलं की सुटलो आपण! मग मी आणि आमच्या राणी सरकार फक्त दोघेच!"

"इश्य, काय हे , नचि येईल एवढ्यात"

पण नचि च्या बाबांनी आईचं न ऐकता तिला जवळ बसवत तिच्या केसात गजरा माळला आणि बराच वेळ हातात हात घालून बसले दोघे!

नचि ला हे सगळं नवीन होतं. कोणीतरी सणसणीत ठेवून द्यावी अशी अवस्था झाली त्याची!

'प्रेम किती संयत असू शकतं हे आजच जाणवलं त्याला आणि नीना कडे 'स्टडी' ला जाण्यातली 'घाई' ही किती फोल आहे हेही जाणवलं त्याला!

' आपले आई बाबा बोरिंग नाहीयेत तर ते आपल्या मुळे बोरिंग झालेत हे  त्याला लक्ख दिसलं डोळ्यासमोर!

आणि एका क्षणात नदीच्या उथळ पात्राला गहरी खोली मिळावी तसं नचिचं मन शांत शांत झालं! 

दारावर knock करत दारातूनच त्यानं" आई, खूप भूक लागलीये ग,मस्त थालीपीठ कर" अशी हाक दिली.

त्याचा आजचा उत्साह सुखावणारा होता रोजच्या चिडचिडी पेक्षा त्यामुळे सहाजिकच "क्या बात है नचि!" म्हणत  बाबांनी त्याच्या  पाठीवर थाप मारली; 

पण त्यांना कुठे माहीत होतं की आता त्यांच्या  नचिची गाडी ' घाटातल्या अवघड वळणावर' अडखळणार नव्हती, उलट समोरचा रस्ता स्वच्छ दिसू लागल्यानं ती अगदी  सुखरूप पोहोचणार होती आपल्या मुक्कामी!

सौ बीना समीर बाचल
7डिसेंबर 2020

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
கருத்துக்கள்
buddhadab hudait

buddhadab Hudait

இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to मराठी कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
कल्पनारम्य कथा भाग १
पैलतीराच्या गोष्टी
श्यामची आई
कौटुंबिक प्रेमकथा भाग १
गांवाकडच्या गोष्टी
वाड्याचे रहस्य
अजरामर कथा