शाळेतून माझा मुलगा आल्यानंतर सहज बोलता बोलता त्याने  मेटकर नावाचे एक नवीन  सर आले आहेत म्हणून सांगितले.बरेच वर्षांनी मी मेटकर हे आडनाव ऐकत होतो .मला माझ्या लहानपणीची आठवण आली आणि हसू आवरेना.मला राहून राहून पुन्हा पुन्हा हसू येत होते. सौ.व मुले माझ्याकडे कुतूहलाने पाहत होती .मुले त्याचे मित्र व सौ.यांना मी थांबून थांबून पुन्हा पुन्हा का हसतो ते मुळीच कळेना .शेवटी त्यांनी खोदून खोदून विचारल्यानंतर मी त्यांना माझ्या लहानपणीची गोष्ट सांगितली .

मी तेव्हां दहा बारा वर्षांचा असेन त्यावेळची ही गोष्ट आहे .

सुटी लागली की दरवर्षी आम्ही कोकणात आमच्या आजोळी जात असू .तिथे गेल्यावर खाणे पिणे खेळणे उंडारणे याशिवाय काहीही दुसरे काम नसे.माझ्या आजोळच्या गावाजवळच माझे चुलत चुलत काका राहत असत .नाते जरी लांबचे असले तरी येणे जाणे असल्यामुळे ते जवळचे वाटत असत. स्वाभाविक आम्ही सगळी मुले  त्यांच्याकडे जाऊन चार आठ दिवस राहात असू .

कोकणातील घरांचा पॅटर्न एक विशिष्ट प्रकारचा असतो. सड्यापासून(डोंगरावरील सपाट खडकाळ भागाला सडा असे म्हणतात) नदी किनाऱ्यापर्यंत पट्टाच्या पट्टा एकाच्या मालकीचा असतो. सड्यावर असल्यास चराऊ गवत, त्याखाली डागवळ(डोंगर उतार) जिथे आंब्याची व इतर झाडे असतात .त्यानंतर तुलनात्मक सपाटीवर घर,परसू परडे, अंगण, माडाची पोफळीची बाग, किंवा भातशेती जमीन व नंतर नदी किंवा साधारणपणे समुद्र अशी रचना असते .गडगा घालून आपली जागा संरक्षित केलेली असते .घराजवळ गोठा असतो .गोठ्यामध्ये पाच दहा जनावरे ही नेहमी असतात. साधारण दोन म्हशी  दोन गायी तीन चार बैल एवढी जनावरे बऱ्याच वेळा असतात .घरातील माणसाप्रमाणे जनावरांची संख्याही कमी जास्त होत असते .

आमच्या काकांकडे घरातील माणसांची संख्या एकत्र कुटुंबामुळे दहापंधरा सहज होती.शेतीभाती भरपूर असल्यामुळे गुरांची संख्याही चांगल्यापैकी होती .घर,घराच्या  जवळ गोठा, नंतर गडगा, त्याच्या पलीकडे घर, नंतर गोठा अशी साधारण रचना असे .काकांच्या शेजारी अण्णांचे घर होते.काकांकडील मुले अण्णांकडील मुले व आम्ही असे सर्व एकत्र दंगामस्ती  करीत असू.अण्णांकडील माडी आम्हाला खूपच आवडत असे कारण तिथे आवाज का कोण जाणे प्रचंड घुमत असे .त्यांच्या माडीवर जरी साधे बोलले तरी सुद्धा आवाज घुमल्यामुळे घागरीत बोलल्यासारखे वाटे.अर्थात त्यासाठी माडीच्या खिडक्या बंद असाव्या लागत.अण्णा बाहेर गेलेले असतील त्यावेळी माडीवर जाऊन खिडक्या बंद करून दंगा करणे , घुमणाऱ्या आवाजाची मजा लुटणे ,हा आमचा नेहमीचा एक खेळ असे.आवाज माडीवर ऐकू येई त्यापेक्षा फारच मोठा बाहेर ऐकू येत असे .त्या आवाजाने घरातील काकू आजी वगैरे मंडळी ओरडत चिडत रागवत परंतु आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नसू. उगीचच ओरडणे, शिट्ट्या मारणे,गाणी म्हणणे, भेंड्या लावणे,फळ्यांवरून पाय आपटीत चालणे,धावा धावी खेळणे, वगैरे आमचा दंगा चालत असे.खिडक्या बंद करून घुमणार्‍या प्रचंड आवाजाची मजा आम्ही घेत असू.हा आवाज आत असणाऱ्या माणसांना जेवढा मोठा वाटे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो बाहेर व शेजारी काकांच्या घरी  लाऊडस्पीकरमधून मोठा व्हावा त्याप्रमाणे का कोण जाणे  परंतु मोठा होऊन ऐकू येत असे.अण्णा आल्याचे कळले की आमचा आवाज व दंगा बंद होत असे.

नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व काकांकडे गेलो होतो .त्या वर्षी थंडी जरा जास्तच पडली होती .माड पोफळी केळी कलमे इत्यादि घरांच्या भोवती असल्यामुळे .त्यांना रोज पाणी देत असल्यामुळे गारठा दिवसासुद्धा चांगला वाटत असे.रात्री तर सर्व पांघरूणात गुरफटून चिडीचूप होत असत .सर्वत्र एक भयाण शांतता पसरलेली असे.रात्रीच्या शांततेमध्ये कुठे एखादी झाडाची काटकी पडली तरी तो आवाज मोठा वाटत असे.

त्या दिवशी म्हणजे रात्री जेवून खाऊन  दंगा करून आम्ही सर्व मुले गाढ झोपी गेलो होतो .रात्री किती वाजले होते माहित नाही परंतु  केव्हा तरी रात्री एकदम मोठा ठो ठो ठो ठो म्हणून आवाज ऐकू आला .त्यानंतर मध्येच बंदुकीच्या फैरी झाडल्या सारखा आवाज पुन्हा शांतता नंतर पुन्हा उखळी बंदुकीतून काढल्यासारखा एक मोठा आवाज .असे काहीतरी विचित्र आवाज ऐकू येऊ लागले .आम्ही मुले जागी झालो म्हणजे आवाज केवढा मोठा असेल त्याची कल्पना येईल .मोठी माणसे जागी तर लगेच झाली.परंतु गोठ्यातील गुरेही घाबरून एकदम उभी राहिली .गुरांचा धडपडण्याचा आवाज ,त्यांच्या चळाचळा मुतण्याचा आवाज,म्हशींच्या रेकण्याचा आवाज,गायींच्या हंबरण्याचा आवाज, सर्वानीं एकच दंगल उडवून दिली.

गाढ झोपेतून जागे झाल्यामुळे कुणाला काय चालले आहे तेच प्रथम कळेना .चोर दरोडेखोर आहेत, शिकारी आहेत, का आणखी काही आहे, काहीच कळेना .पिस्तूल बंदूक रायफल तोफ यांचे आवाज मधून मधून चालूच होते .दरवाजा उघडून बाहेर येऊन  काय होत आहे ते पाहावे याचेही कुणाला धाडस होईना .त्याकाळी विजचे दिवे गावात आलेले नव्हते . टॉर्च व काठ्या घेउन  दोन्हीही काका घराबाहेर पडले .आवाज अण्णांच्या घराकडून येत होते .गोठ्यातील गुरांनीही बहुधा कान टवकारलेले असावेत .थंडी मी म्हणत होती .चांदणी रात्र नव्हती .जिकडे तिकडे दाट काळोख पसरलेला होता .आम्ही खिडकीतून हळूच मान वर करून डोळे ताणून बाहेर पाहत होतो .टॉर्चचा  प्रकाश काठी आपटण्याचा आवाज व वाहणांची करकर हळुहळू कमी होत गेली .आता काय होते कोण आहे काही कळेना.बेड्यातून आमचे काका अण्णांना हाका मारीत पलीकडे त्यांच्या कंपाउंडमध्ये गेले असे वाटले.जरा वेळाने अण्णा त्यांची मुले गडी माणसे व आमचे काका या सगळ्यांचा एकच मोठय़ाने हसण्याचा आवाज अण्णांच्या घराकडून आला.नंतर मोठमोठय़ाने बोलण्याचे आवाज येत होते.सुमारे अर्ध्यातासाने आमचे काका अण्णांकडून परत  आपल्या घरी आले. आल्यावर अण्णांनी घरातल्या सर्वांना काय झाले त्याची हकीकत सांगितली .आम्ही मुलेही कोंडाळे करून पांघरूणात गुरफटून घेऊन उत्सुकतेने सर्व काही ऐकत होतो .

त्या सगळ्याचा मतितार्थ पुढीलप्रमाणे होता .अण्णांकडे मेटकर नावाचे एक पाहुणे आले होते .त्यांचे वय पंचेचाळीस पन्नासच्या आसपास असावे .ते ठार बेहरे होते . त्यांची वात प्रकृती होती .पोटामध्ये प्रचंड वात धरत असे .वात सोडताना अपानवायू सुटतांना फार मोठा आवाज ते करीत असत.ते बेहरे असल्यामुळे आपण केवढा आवाज करीत आहोत त्याची त्यांना कल्पना नसे.ते माडीवर झोपलेले होते. थंडीमुळे खिडक्या बंद होत्या .रात्री उशिरा जेवण झाले होते. त्यात वातुळ पदार्थ  जास्त होते .रात्री मेटकर काकानी दंगल उडवून दिली .गुरे सुद्धा घाबरली. आपल्यामुळे काय झाले याची मेटकर काकांना काहीच कल्पना नव्हती !!!

तेव्हापासून मेटकर नावाचे कुणी भेटले की मला हसू आवरत नसे .मेटकर नाव आल्याबरोबर मी का हसलो ते अाले का लक्षात, मी मुलांना विचारले.सर्वांची हसता हसता पुरेवाट झाली . हसतहसत मुले खेळण्यासाठी निघून गेली.

२३/११/२०१८ ©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel