सासूबाई, सासूबाई मला आलं मूळ
जाऊ का मी आपुल्या माहेरा माहेरा ॥ ध्रु.॥
कार्ल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥
कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥
कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥
कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥
आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥