पोळी हा शब्द पल या मूळ शब्दधातूपासून आलेला असावा विस्तार संरक्षण पसरणे हे त्यचे आधार असावेत म्हणून पोळीचा म्हणजे ज्याचा विस्तार केला जावू शकतो पसरली जाते.....मग पुरणपोळीतील पुरण डाळ व गूळ यांचे सुंदर मिश्रण गोड सुमधुर चवीचा जिव्हाळा जपणारे आनंदाची अनुभूती देणारे उत्तम सारण त्याला विस्तारणारे वरील पोळीचे आवरण जे त्या पुरणाला पसरवते संरक्षण देते असेही म्हणता येईल.....
महाराष्ट्र संस्कृती त *पुरणपोळी* हा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण होतो "खंडोबा नवरात्र चंपाष्ष्ठीला" पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे .होळी ,श्रावण शुक्रवार अशा अनेक कुलाचारात पुरणपोळी लागतेच.
पुरणपोळीचा इतिहास पेशवेकालिन असावा ...घरातील सहज उपलब्ध पदार्थात सहज गोडधोड करण्यास तत्पर पदार्थ ...चवीचा आनंद देवून भोजनाची रंगत वाढवणारा पदार्थ पुरणपोळी...मग ती करण्याची कला ही अवघड ..प्रत्येकाच्या हाताची चव उतरत असावी मऊसूत पुरणपोळी हा त्याचा परमोच्च बिंदू.....करणाऱ्या चे सूर छान जमले कि मधुरता पुरणपोळीत उतरते च....
पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !
पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.
डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !
गूळ म्हणजे यमन!
यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!
इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा
हां, आता ज्यांना जमत व गमत
('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.
जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.
नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं ....
आता महत्वाचा 'टप्पा' ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.
आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!
तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.
मग .. 'जो भजे हरिको सदा', 'चिन्मया सकल ह्रदया", "माई सावरे रंग राची" अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा. आणि मग "हेचि दान देगा देवा" अशा थाटात 'अन्नदाता सुखी भव' म्हणावं.
भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा ...... आयुष्य सार्थकी लागावं !!!
जनमानसात पुरणपोळी आवडत नसेल असा विरळाच..निदान ती करता आली कि उत्तम स्वयंपाकघरातील पदार्थातील पारंगतेचे प्रमाणपत्र हमखास मिळालेच असा विचार आजही असेलही ....आजकाल सहजच उपलब्ध होत असली तरी तिचे वैशिष्ट्ये व्यक्ती नुसार आजही ती टिकवून आहे ...परंपरा प्रथा रुढी ला सांभाळत महाराष्ट्रात अन् गुजरात कर्नाटक अगदी अफगाणिस्तानमधेही ही पुरणपोळी बघायला मिळते ..
पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळत भोजनाची मैफल कधी संपूच नये असे वाटत राहते....!!
©मधुरा धायगुडे