इन्द्राचा स्वभाव

सप्‍तसिंधूवर स्वामित्व स्थापन करणारा सेनापति इन्द्र मनुष्य होता याला पुरावा ॠग्वेदांत भरपूर सापडतो. त्याच्या स्वभावाचें थोडेंसें दिग्दर्शन कौषीतकि उपनिषदांत आढळतें, तें येणेंप्रमाणें,-

दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाड्यांत गेला. त्याला इन्द्र म्हणाला, 'हे प्रतर्दना, तुला मी वर देतों.' प्रतर्दन म्हणाला, 'जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे.' इन्द्र-'वर दुसर्‍याकरतां घेत नसतात. स्वतःसाठी वर मागून घे.' प्रतर्दन-'माझ्यासाठी मला वर नका' तेव्हा इन्द्राने सत्य गोष्ट होती ती सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे. तो म्हणाला, 'मला जाण. तेंच मनुष्याला हितकारक आहे, की जेणेंकरून मला तो जाणेल. त्वष्ट्याच्या मुलाला- त्रिशीर्षाला- मी ठार मारलें. अरुर्मग नांवाच्या यतींना कुत्र्यांकडून खाववलें. पुष्कळ तहांचें अतिक्रमण करून दिव्यलोकीं प्रल्हादाच्या अनुयायांना, अंतरिक्षांत पौलोमांना आणि पृथ्वीवर कालकाश्यांना मी ठार मारलें. त्या प्रसंगीं माझा एक लोम देखील वाकला नाही. अशा प्रकारें जो मला ओळखील, त्याने मातृवध, पितृवध, चौर्य, भ्रणहत्या इत्यादि पापें केलीं असतां किंवा तो करीत असतां त्याला दिक्कत वाटणार नाही, किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही.'

आपलें साम्राज्य स्थापण्याच्या वेळी इन्द्राने ह्या उतार्‍यांत दिलेले बरेच अत्याचार केल्याचा निर्देश खुद्द ऋग्वेदांतच आढळतो. पण इन्द्रच कां, कोणत्याही मनुष्याला साम्राज्य स्थापावयाचें असल्यास आपपरभाव, दयामाया ठेवतां येत नाही; तह मोडण्याचें भय बाळगतां येत नाही. शिवाजीने चन्द्रराव मोर्‍यांना ठार मारलें, तें न्याय्य होतें की अन्याय्य होतें, हे वाद निरर्थक आहेत. न्याया-न्यायाचा विचार करीत बसला असता, तर शिवाजी साम्राज्य स्थापूं शकला नसता. साम्राज्यान्तर्गत लोक देखील असल्या क्षुल्लक पापपुण्यांचा विचार करीत बसत नाहीत. ते एवढेंच पाहतात की, एकंदरींत या साम्राज्याच्या स्थापनेपासून सामान्य जनतेचा फायदा झाला आहे की काय ?

आर्यांच्या सत्तेपासून फायदे

ह्या दृष्टीने विचार केला असतां इन्द्राच्या किंवा आर्यांच्या साम्राज्यापासून सप्‍तसिंधूतील जनतेचा फार मोठा फायदा झाला असला पाहिजे. लहान लहान शहराशहरांमधून जीं वारंवार युद्धे होत असत, ती बंद पडल्यामुळे लोकांना एक प्रकारचें सुखस्वास्थ्य मिळालें. पेशव्यांच्याच नातलगांनी शनवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा लावला; आणि पेशवाई बुडाल्यावर इतर हिंदूंनी तर मोठाच उत्सव केला म्हणतात. त्याचप्रमाणें वृत्र जरी ब्राह्मण होता, तरी त्याला मारून सत्पसिंधूतील अंतःकलह बंद पाडल्याबद्दल इन्द्राचे देव्हारे तेथील प्रजेने माजविणें अगदी साहजिक होतें. तेव्हा दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षापासून जे कांही सुपरिणाम घडून आले, त्यांतला पहिला हा समजला पाहिजे की, सप्‍तसिंधूमध्ये एक प्रकारची शांतता नांदूं लागली. दुसरी गोष्ट, ब्राह्मणांचें जें वर्चस्व राजकारणांत होतें तें नष्ट झालें. इन्द्राने त्वष्ट्याच्या मुलाला- विश्वरूपाला- पुरोहितपद दिले आणि तो बंड करील या भयाने त्यालाही ठार मारलें, असा उल्लेख खुद्द ॠग्वेदांत आणि यजुर्वेदांत सापडतो.* तथापि पुरोहिताची पदवी कोणत्या ना कोणत्या ब्राह्मणाकडे राहिली. राजकारणापासून अलिप्‍त राहिल्यामुळे ब्राह्मणसमाजाला वाङ्‌मयाची अभिवृद्धि करतां आली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदी संस्कृति आणि अहिंसा, पृ. १९-२० पाहा.
न.भा. १६......२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वैदिक भाषा

दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने एक नवीन भाषा उत्पन्न झाली. हीच वैदिक भाषा होय. मुसलमानांच्या आणि हिंदूंच्या संघर्षाने जशी हिंदुस्थानांत उर्दू नांवाची नवीन भाषा उत्पन्न झाली, तशी ही भाषा होती. पण वैदिक भाषेइतकें उच्च स्थान उर्दूला कधीही मिळालें नाही आणि मिळण्याचा संभव नाही. वैदिक भाषा निव्वळ देववाणी होऊन बसली !

या वैदिक भाषेचा नीट अर्थ लावावयाचा असल्यास बाबिलोनियन भाषांच्या ज्ञानाची फार आवश्यकता आहे. कांही मूळच्या शब्दांचे अर्थ कसे उलटले आहेत हें दास आणि आर्य या दोन शब्दांवरूनच दिसून येतें. दास शब्दाचा मूळचा अर्थ दाता असून सध्या गुलाम असा होऊन बसला आहे; आणि आर्य शब्दाचा मूळचा अर्थ फिरस्ता असतां थोर, उदार, श्रेष्ठ असा झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel