आर्यावर्तात कुणा एके काळी एक गरीब शेतकरी होता. त्याची एक सर्वसाधारण मुलगी होती. आई लहानपणातच मेली आणि गावांत साथ येऊन असंख्य लोक मेले आणि शेतकऱ्याला आपल्या पोरीला घेऊन गांव सोडावा लागला. बरोबर एक बैल आणि मोजकेच सामान घेऊन बाप लेक लाचारीने आणि भुकेने सर्वत्र फिरत होते. मुलगी लग्नाची झाली होती, वयात आली होती त्यामुळे तिचे शिलरक्षण हि सुद्धा चिंता होतीच. अश्यांतच बापाला ताप आला. आपण आणखीन जास्त दिवस जगणार नाही हि जाणीव झाली. मुलीचे काय होईल ह्या चिंतेने त्या बापाची घालमेल आणखी वाढली. एका वृक्षाच्या खाली शेवटचे काही क्षण मोजत असताना आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी ती कन्या बापाची सेवा करताना अचानक एक पथक तिथे हजर झाले. कुणी तरी मोठा सिद्ध भैरवबाबाचा भक्त तांत्रिक भल्लूकनाथ आणि त्याचे काही शिष्य आणि शिष्या. अंगाला स्मशानातील भसम, मोजकेच कपडे, पिळदार शरीर आणि वाणी अशी कि जमीन सुद्धा थरथरावी. त्याने शेतकर्याला धीर दिला कि त्या पोरीचे लग्न तो स्वतः लावून देईल. शेतकऱ्याने त्या दिलास्यावर जीव सोडला.
भल्लूकनाथाचे पथक आणि ती कन्या आता गांव गांव फिरत राहिली. भल्लूकनाथाने त्या कन्येच्या लग्नाचा विषय कुठेच काढला नाही. काही ठिकाणी लोकांनी विषय काढला तरी त्या महातापट माणसाने त्यांना हाकलून लावले.
एक दोन वर्षांनी भल्लूकनाथांचे पथक मार्गक्रमण करत विंध्यकन्या नदीच्या किनाऱ्यावर पोचले. त्याकाळी त्या भागांत युद्ध चालले होते. महाराज रक्तमाल आणि त्यांचे भाऊ विरोचन ह्यांच्यांत विद्रोह माजला होता. नदीच्या पात्रातून मृत सैनिकांची शरीरे वाहत येणे कठीण नव्हते. दुसऱ्या बाजूला विंध्य पर्वतरांगा होती. अत्यंत कठीण असे कडे. त्यांच्यातून वाट काढताना भल्लूकनाथांना तो सापडला.
अंगावर रक्ताने माखलेले चामड्याचे चिलखत, तलवार मोडलेली, अन्न नसल्याने क्षीण झालेले शरीर. असंख्य जखमा आणि त्याहून जास्त व्रण सांगत होते कि ह्या योध्याने बरीच युद्धे पहिली आहेत. पण सैनिक कोणाचा असावा ? काहीही चिन्ह नव्हते.
भल्लूकनाथांचे शिष्य त्यःची मदत करण्यास पुढे सरसावले पण भल्लूकनाथानी मनाई केली. त्यांनी त्या कन्येकडे बोट दाखवले. "हा तुझा पती आज पासून" आज पासून तुझे राहिलेले दिवस ह्यांच्यासोबत. त्यांनी एक काळा दोरा आपल्या झोळीतून काढला. "मंगळसूत्र म्हणून हे तूच बांधून घे" त्यांनी सांगितले.
त्या सैनिकाच्या त्या जखमा पाहून तो जास्त दिवस टिकेल असे कुणालाच वाटले नव्हते. त्यामुळे भल्लूकनाथांच्या शिष्यानी आवंढा गिळला पण गुरूच्या आज्ञेवर बोलावे अशी हिम्मत कुणाचीच नव्हती. त्या कन्येने सुद्धा निमूटपणे तो काळा धागा घेऊन गळ्यांत बांधला आणि ती त्या सैनिकाच्या शुश्रूषेसाठी गेली.
भल्लूकनाथ पुढे गेले. त्यांची शिष्या निपुणिका अस्वस्थ होती. रात्री जेंव्हा भल्लूकनाथानी अंग टेकले तेंव्हा ती त्यांच्या पायाशी आली.
"गुरुदेव .. " तिने भीत भीत हात जोडून गुरुचे ध्यान आकर्षित केले.
"त्या कन्येला मी त्या सैनिकाकडे का सोडले हेच विचारायचे आहे ना ? आमच्या मार्गावर आसक्तीला थारा नाही. तू त्या कन्येसाठी आसक्त झालीस ? "
"नाही गुरुदेव. तुम्ही केले असेल तर बरोबरच केले असेल. मला अजिबात संशय नाही. पण भविष्याचे कुतूहल आहे. तो सैनिक कोण होता ? "
भल्लूकनाथ खदाखदा हसले. "अग तू त्याला ओळखली नाहीस ?"
"तो अवंती नरेश रक्तमाल ह्यांच्या सैन्यातुन हाकलून दिलेला, विंध्य पर्वतातील कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा हयग्रीव. अवंती शहराच्या बाहेर मागच्या वर्षी आम्ही त्याला पहिले होते तो. ज्याच्या कथा आम्ही अनेक ठिकाणी ऐकल्या होत्या तो होता हा."
"काय? " निपुणिका दचकली.
हयग्रीव सहा फुटापेक्षा लांब, अजस्त्रबाहू होता. अत्यंत हिंसक वृत्ती, त्याने शेकडो लोकांना ठार मारले होते. निपुनिकाने त्याला पहिले होते तेंव्हा सुद्धा त्याने एका गावांत एका सैनिकाचे दोन तुकडे केले होते. ते सुद्धा काही तरी शुल्लक वादावरून. त्यानंतर अनेक ठिकाणी त्याच्या हिंसक प्रकारच्या गोष्टी कानावर आल्या होत्या. शेवटी सैन्यातून सुद्धा त्याला हाकलून देण्यात आले होते असे ऐकले होते. आता कदाचित खूप काळ खायला प्यायला नसल्याने तो क्षीण झाला असावा म्हणून निपुणिका त्याला ओळखली नव्हती.
"गुरुदेव, आम्ही त्या बकरीसमान कन्येला ह्या लांडग्यांचा हातात सुपूर्द केले आहे ? "
"निपुणिका, बकरीला कमी लेखू नकोस आणि लांडग्या विषयी पूर्वग्रह बाळगू नकोस. आम्ही निमित्त मात्र झालो. त्यांचे मिलन विधिलिखित होते." असे म्हणून गुरुदेव भल्लूकानी डोळे बंद केले आणि विषय संपला.
एक तर ती कन्या काही दिवसांतच विधवा होईल आणि तो नराधम वाचला तर त्या कन्येलाच एक दिवस तो ठार मारेल. असेच निपुणिकाला वाटले.
पण काळ आणि स्त्री काहीही बदलू शकते. त्या स्त्रीच्या मेहनतीने हयग्रीव वाचला. तिचे पातिव्रत्य असो कि आणखीन काही, पण हयग्रीव ने सुद्धा हिंसा सोडून दिली. विंध्याच्या त्या कड्यांत एका ठिकाणी त्याने छोटेसे लाकडी घर बांधले. छोटीशी बाग आणि काही जनावरे पोसली. कालांतराने त्यांना दोन मुले सुद्धा झाली. मोठा मुलगा आणि छोटी मुलगी. आणि लोकांनी जे भाकीत केले होते कि हयग्रीव कधीतरी रंगाच्या भरांत आपल्या पत्नीला ठार मारेल ते खोटे ठरले नि ती एक दिवस कसल्या तरी तापाने मरण पावली. 6 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा मागे सोडून.
युद्धाचे सावट हळू हळू निघून गेले आणि राजा रक्तमाल आहे कि विरोचन हे सुद्धा लोक पोट भरायच्या नादांत विसरून गेले. हयग्रीवाची तलवार कुठे तरी गंज खात पडली. तलवार फिरवून पडलेले हात गाय, बैल आणि घोड्यांच्या दावणी ओढून सोलत गेले आणि राहिलेला वेळ मुला सोबत लाकडी छडीने लुटुपुटुची लढाई, आणि पोरीला पांढऱ्या घोड्यावरून दुष्टांचा संहार करणाऱ्या राजपुत्राची कथा सांगत जाऊ लागला.