प्रेमाच्या राज्यात बंध व मोक्ष विरोधी नाही प्रेम अत्यंत स्वतंत्र, तर अत्यंत बांधलेली. ईश्वर स्वतंत्र असता तर सृष्टी दिसती ना. त्या अनंताने सान्ताची माया पत्करली. प्रेमरूप परमेश्वराच्या ठिकाणी मर्यादित-अमर्यादित एकरूप आहेत.

आपणास केवळ स्वातंत्र्याची इच्छा असत नाही, गुलामगिरीचीही आपणास इच्छा असते. सर्व बंधने स्वीकारून पुन्हा त्याच्यापलीकडे जाणे हे तर प्रेमात परम थोर कार्य. प्रेमात जितकी स्वतंत्रता तितकी कोठे आहे? त्याचबरोबर प्रेमात जितके परावलंबन आहे, तसे अन्यत्र कोठे? प्रेमाच्या सृष्टीत स्वातंत्र्याइतकीच गुलामगिरीही शोभादायक नि सुखदायक असते.

भागवत धर्म घोषणा करतो की, ईश्वराने स्वतःला जीवाशी बांधून घेतले आहे. या सान्त सृष्टीच्या तालबध्द नाचात तोही सामील आहे. सृष्टीत अपार सुंदरता प्रकटवून तो जीवाच्या अंतःकरणाला वश करू पाहतो. सृष्टीतील सौंदर्याचा दुसरा काय अर्थ? हे सौंदर्य पदोपदी सांगत आहे की, सामर्थ्याचे प्रदर्शन हा सृष्टीचा हेतू नाही. जेथे जेथे रंगच्छटा असेल, मधुर स्वर असेल, सुंदर आकार असेल, तेथे तेथे हृदयातील प्रेमाला कोणी तरी हाक मारीत असते. मानवाला तहान-भूक आहे. परंतु तहानभूक भागवणे एवढेच जीवनाचे साध्य नाही. तहान-भूक झुगारणारे, दुःखांनी वा गरजांनी न दबणारे थोर पुरुष अनेक झाले आहेत. खरे जीवन जगणार्‍याला पावलोपावली तहान-भूक दूर ठेवावी लागते.

या जगातील सौंदर्याची ही गंमत की, ते तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणीत नाही. त्याची सत्ता मानली जावी म्हणून ते बोटही वर उचलीत नाही. या सौंदर्याची उपेक्षा केलीत तर सजा नाही मिळणार. हे सौंदर्य हाक मारते; दरडावीत नाही. प्रेम बळजबरीने मिळत नसते. धाकदपटशाने मनुष्य ऐकणार नाही. परंतु आनंद व प्रेम याने वळेल. सृष्टीत अपार आनंद आहे. सृष्टीला पांघरूण घालणारा हा हिरवा शालू-यात तो आनंद आहे. आकाशाच्या नील गंभीरतेत तो आनंद आहे. वसंतऋतूतील बहर वा हिवाळयातील प्रखर वैराग्य यात तो आनंद आहे. आपल्या शरीरात आनंद आहे. जीवनात आनंद आहे. आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करण्यात आनंद आहे. ज्ञानार्जनात आनंद आहे. जगातील असत्यता नि दुष्टता यांच्याशी झुंजण्यात आनंद आहे. दुर्लभ ध्येयासाठी मरण्यात आनंद आहे. आनंद इतका आहे की-जरुरीहून तो अधिक आहे. त्याची वाण तर नाहीच नाही.

का हा आनंद? का हा आपल्यासमोर अनंत रुपांनी येतो नि नाचतो? कायद्याची जी बंधने आहेत त्यांचा अर्थ प्रेमदृष्टीने पाहा, असे सांगण्यासाठी आनंद उभा आहे. प्रेम व कायदा हे आत्मा व शरीर याप्रमाणे आहेत. सर्वत्र अद्वैत आहे-याचा साक्षात्कार म्हणजे आनंद. जीवात्म्याची सृष्टीशी एकता आहे, व सृष्टीची परमात्म्याशी, त्या परम प्रियकराशी एकरूपता आहे, हे अनुभवास येणे म्हणजे आनंद होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel