वासुदेवराव : अहो, कसल्या तपस्विनी नि काय? डाकिणी असतात डाकिणी. या माझ्या तीन बायका आहेत. त्या जणु मला खायला येतात. मला धरून गदगदा हलवतात. खोकला उसळला तरी कधी डुंकूनही माझ्याकडे बघत नाहीत. एवढेच नव्हे तर 'झोपही येऊ देत नाही मेला; सारखे ठसकठसक चालले आहे भुताचे' असे म्हणतात?
गणेशपंत : का नाही म्हणणार? त्यांना तुम्ही फसविलेत. त्यांच्या सर्व सौख्यावर पाणी ओतलेत. वासना असूनही त्यांना तुम्ही संन्यासिनी बनविलेत. त्या का बरे संतापणार नाहीत? त्या तुमची बेअब्रू चव्हाटयावर मांडीत नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. बायका झाल्या, तरी माणसेच ना? किती वेळ संताप टिकेल मनात? तो थोडा तरी बाहेर पडणारच!
वासुदेवराव : परंतु आता माघार घेणे कठीण, मुहूर्तही ठरला.
गणेशपंत : पाप करण्याचा निश्चय का बदलता येत नाही? गरीब गाईला कोंडवाडयात कोंडू नका.
इतक्यात दिवाणजी तेथे आले, त्यांना पाहाताच गणेशपंत 'औषध देतो,' असे सांगून निघून गेले.
दिवाणजी : पैशाची व्यवस्था केली. दागिन्यांचीही होत आहे. गाडयाघोडी सर्व पहात आहे.
इतक्यात घरातून मोठमोठया कडाक्याने चाललेल्या भांडणाचा आवाज दिवाणखान्यात आला - 'माहेर करा. पाच हजार रुपये पाठवलेत. बापाचाच माल की नाही?' आणि तुम्ही तुमच्या भावाच्या लग्नाच्या वेळेस नाही पाठविलेत दागिने? ते तुमच्या बापाचे वाटते?' असे बापबीप काढू नका तुम्ही खायला नाही घातलेत त्यांना त्या दिवसापासून तीनदा बाप काढता माझा.' 'मग काढीनच. भिईन की काय काढायला? अशी दाबू नका मला. तुम्हाला भिणारी नाही मी'.....
दिवाणजी : तुम्ही तरी जाऊन थांबवा भांडण.
वासुदेवराव : त्या चवताळलेल्या वाघिणी मलाच मग फाडून खातील. एकमेकीतील भांडण विसरून माझ्यावर तुटून पडतील. मी पलीकडील खोलीत जाऊन पडतो. आतून कडी लावून घेतो. नाही तर यायच्या माझ्याजवळ. डाकिणी आहेत ह्या!
वासुदेवराव उठले. दिवाणजींनी त्यांना आधार दिला. ते गेल्यावर दिवाणीस हसू आले. ते म्हणाले, 'तीन आहेत, तरी म्हाता-याने चौथी आणायचे ठरविले. आणा म्हणावे. दहा का आणा ना. प्रत्येक लग्नात कमीत कमी दोन हजार मला मारता येतात. माझ्या चार मुलींची लग्ने एरव्ही मी तरी कशी पार पाडणार?'
सारंग गावाला शेगावकर वासुदेवरावांची मंडळी येऊ लागली. दिवाणजी, राधेगोविंद महाराज येऊन दाखल झाले. मैनेचे लग्न हाच एक विषय ज्याच्या त्याच्या तोंडी झाला होता. मोरशास्त्री निराश होऊन निघून गेले.
मैना सारखी रडत बसली होती. घरदार सोडून जाण्याचे तिला धैर्य होईना. ती स्वतःला निर्भय समजे, परंतु एकंदरीत तीही भित्रीच होती. सर्व रुढी तूडवून निघून जाण्याचे धारिष्ट तिच्यात नव्हते. फार केविलवाणी झाली होती तिची मनःस्थिती. तिच्या मनातील विचार, भावना, यांचे कल्लोळ कोणाला समजणार? मधूनमधून ती काही तरी स्वतःशी बोले ---'काय करू मी ? कोठे जाऊ मी? मरावे असेही वाटत नाही, पळून जावे असेही वाटत नाही. रडण्यापलीकडे काय करणार मी? गोपाळ, माझा प्रेमळ उदार निर्मळ गोपाळ! तो माझा असून मला माझा म्हणता येत नाही. गोड गोपाळा, तुझ्याजवळ जन्माची गाठ पडावी, असे नाही रे भाग्य माझे. नाही माझी पुण्याई, दुष्ट दुष्ट जग, परंतु जगाला तरी नावे ठेवण्यात काय अर्थ? या जगाला वठणीवर आणले पाहिजे, परंतु कोण आणणार वठणीवर? कोण करणार थंड, कोण करणार या रूढीशी लढाई?'
मैना असे स्फुंदत स्वतःजवळ बोलत होती, तो तिची आई तिच्याजवळ आली.