‘हे काँग्रसचे ठराव?’

‘आणि हे कसले पुस्तक? हेच आता वाचीत होतास?’

‘त्यातील एक गोष्ट पुन्हा वाचली.’

‘कसली आहे गोष्ट! मला तरी सांग मी ऐकते.’

‘खरेच सांगू? का थट्टा करतेस?’

‘खरेच सांग.’

‘ऐक तर. एका शहरात यात्रा भरली होती. ती यात्रा पाहायला एक लहान मुलगा आपल्या आईबापांबरोबर जात होता. यात्रेत किती तरी दुकाने होती. लहान मुलांना आवडणारी खाऊची नि खेळण्यांचीही दुकाने होती. खाऊच्या एका दुकानाजवळ तो लहान मुलगा थांबला.

‘का रे थांबलास?’ आईने विचारले.

‘आई, खाऊ देतेस घेऊन? ती बघ बर्फी; ते जरदाळू आहेत, वडया आहेत. दे ना काही तरी घेऊन.’

‘तुला कधी कोठे नेण्याची सोय नाही. हे पाहिजे, ते पाहिजे. घरी जसा खाऊ मिळतच नसेल. चल हो पुढे!’

असे म्हणून त्याची बकोटी धरुन आई त्याला  नेऊ लागली आणि पुढे सुंदर खेळण्यांची दुकाने लागली. बाळ पुन्हा थांबला.
‘का रे थांबलास का?’ आईने विचारले.

‘आई, एखादे खेळणे देतेस का घेऊन? तो बघ चेंडू, तो फुगा, ती आगगाडी, ते विमान दे ना काही तरी!’

‘मेल्या, तुला कधी बरोबर नेण्याची सोय नाही! सदान्कदा हे पाहिजे, ते पाहिजे. घरी ती मोडकी आगबोट नाही का? चिंध्यांचा चेंडू आहे. चल हो पुढे. का देऊ धपाटा?’ असे म्हणून त्याची बकोटी धरुन आई त्याला ओढीत नेत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel