परंतु सेवानंद एकदम निघून गेले. कोठे गेले? त्यांचा पत्ता लागेना. लोकांना वाईट वाटले. कोठे गेला सेवानंद? मुक्ता दुःखी झाली. आपल्या बोलण्यामुळे तर विजयचे मन नाही ना दुखविले? तो घोर तपश्चर्या करण्यासाठी नाही ना गेला?

गावाजवळच्या एका डोंगरात एक गुहा होती. मुक्ताला ती माहीत होती. अगदी लहानपणी एकदा विजय त्या गुहेत जाऊन बसला होता. त्याने मुक्ताला ती गोष्ट प्रदर्शनाच्या प्रवासाच्या वेळेस रस्त्यात सांगितली होती. एके दिवशी रात्री ती गुहेजवळ आली. त्या गुहेत कोणी तरी होते.

'सेवानंद, असे निराश नका होऊ. गृही व्हायचे नसेल तर नका होऊ, परंतु जीवनाचा उपयोग करा. येथे या गुहेत राहून काय करणार? गरिबांना घरे नाहीत. तुम्ही प्रभावी वाणी वापरून श्रीमंतांची हृदये वितळवा. पैसे जमवा. द्या घरे बांधून. तुम्ही माझे विजय नसाल होणार, तर जनतेचे सेवानंद व्हा. त्यातही मी आनंद मानीन; परंतु असे अंधारात घुबडासारखे राहू नका. भिक्षा मागा. येथे पाखरांना दाणे टाका; पाखरे तुमच्याजवळ येतील. तुम्हाला दुवा देतील. तुमच्या जीवनात आनंद येऊ लागेल. नाव सेवानंद आहे मग दुःखी का? सेवेनेच आनंद लाभेल. अंधारात राहून नाही मिळणार.' असे मुक्ता बोलत होती. ती मुकी झाली. थोडा वेळ बसून निघून गेली.

आणि एके दिवशी अपरंपार पाऊस आला. गोरगरिबांची घरे वाहून जाऊ लागली. कोठे जाणार हे गरीब लोक? ते नवीन बांधलेल्या मंदिराकडे येऊ लागले; परंतु मठवाले येऊ देत ना. इतक्यात गुहेतून सेवानंद धावत आले. 'उघडा मंदिराची दारे! घ्या ते बंधू आत. मंदिर बंद कराल तर बुध्ददेवांना माराल. या, या सारीजण. आणा तुमची लेकरे.' सेवानंदने सर्वांना मंदिरात घेतले. त्याने गावता हिंडून त्यांना काही अंथरापांघरायला आणून दिले. मुक्ताही गोळा करून आणून देत होती. पती निराशा सोडून, गुहा सोडून खाली उतरला, सेवाक्षेत्रात उतरला, म्हणून तिला आनंद झाला.

परंतु तो अद्याप त्या गुहेतच राही. एके दिवशी रात्री स्वच्छ चांदणे पडले होते. मुक्ता शशिकांताला घेऊन निघाली. बाळ झोपलेला होता. मुक्ता त्या गुहेजवळ आली. सेवानंद बाहेर आला.

'विजय, हा तुझा बाळ. घे त्याला जवळ. त्याला आशीर्वाद दे. विजय, तू दुःखी नको होऊ. तुला जर दुःख वाटत असेल तर तू पुन्हा संसारात ये आणि सेवानंद म्हणून राहायचे असेल तर आनंदाने राहा! माझी आठवण जर तुला पदोपदी येत असेल, मला तू विसरू शकत नसशील, तर तू संसारात ये. तेच बरे.'

'मुक्ता, तूच माझी गुरू होत. मी संसारात कसा येऊ? मला महंतांनी दीक्षा दिली आहे.'

'त्या महंतांना आपण सारी सत्यकथा कळवू. त्यांनी जर अनुज्ञा दिली तर तू येशील पुन्हा संसारात?'
'येईन मुक्ता. तू जिवंत असताना मी तुझ्याशिवाय अलग राहू शकणार नाही. वंचना कशी करू?'

'खरे आहे. या बाळाला घे ना मांडीवर.'

'इतक्यात नाही. मी संसारात येईन तेव्हा घेईन. तोपर्यंत मला मर्यादा पाळू दे. यतिधर्माची प्रतिष्ठा मी सांभाळली पाहिजे. खरे ना?'

'होय हो राजा.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel