हिंदी स्त्रिया थोडे फार शिकू लागल्या. अर्थात खालपर्यंत अजून शिक्षण गेलेच नव्हते. आजही नाही गेले, तर ३०-४० वर्षांपूर्वीची गोष्ट विचारायलाच नको. परंतु मुलींना शाळेत घातले पाहिजे याला फारसा विरोध आता राहिला नव्हता. स्त्रियांनीच स्त्रियांची उन्नती करायला पुढे यायला हवे होते. महर्षी कर्वे यांच्या संस्था वाढल्या. त्यांना चिपळूणकरांसारखे उत्साही सरकारी लाभले. चिपळूणकर अमेरिकेतून शिकून आलेले. अति उत्साही नि कळकळीचे. हिंगण्याचे प्रयत्‍न अविरत चालू होते. आणि पुण्यात सेवासदन निघाले. त्या वेळेस न्या. रानड्यांच्या पत्‍नी रमाबाई हय़ात होत्या. भारत सेवक समाजाचे थोर सेवक गोपाळ कृष्ण देवधर यांनी सेवासदनाचा पाया घातला. रमाबाईंनी त्या कामाला वाहून घेतले. सेवासदनाचा आज अपार पसारा आहे. अनेक ठिकाणी त्याच्या शाखा आहेत.

हिंदूस्थानातील मोठमोठया दवाखान्यांतून हिंदी परिचारिका नसत. गोर्‍या किंवा एतद्देशीय ख्रिश्चन किंवा ज्यू परिचारिका असत. या देशात शिक्षणच नव्हते. स्त्रियांनी निर्भयपणे काम करण्याची परंपरा नव्हती. संस्थांतून नोकरीचाकरी करण्याची रुढी नव्हती. दळण-कांडण, स्वयंपाक, भांडी घासणे हेच त्यांचे धंदे. परिचारिका होणे, डॉक्टर होणे, वकील होणे, शिक्षक होणे ; समाजातील अनेक क्षेत्रांत जाणे, स्वावलंबी होणे, स्वाभिमानाने भाकरी मिळवणे हे अजून नव्हते. सेवासदनाने ही कोंडी फोडली, सेवासदनाने परिचारिकांचा, सेविकांचा वर्ग काढला. विधवा हिंदी स्त्रियांना नवमार्ग दाखवला. त्यांच्या निराश, अंधारमय जीवनात प्रकाश आणला. हळूहळू हे वातावरण सर्वत्र. पसरले. दवाखान्यांत देशी परिचारिका नसत म्हणून आजारी स्त्रिया तेथे राहायला तयारच नसत. परंतु आता दवाखान्यांत रहायला त्या नाखूष नसतात.

अमेरिकेतील प्राथमिक शिक्षण स्त्रियांच्या हाती आहे. आपल्याकडे स्त्रिया शिक्षक होऊ लागल्या. सेवासदनाने स्त्रियांचे ट्रेनिंग कॉलेज काढले. पुढे आणखी निघाली. लहान मुलामुलींना स्त्रियांनीच शिकवावे. स्त्रियांचा स्वभाव प्रेमळ नि कोमल असतो. प्लेटो म्हणतो, “ज्याला मुलांविषयी प्रेम वाटत नाही, त्याने शिक्षक होऊ नये.” स्त्रिया उच्च शिक्षण घेऊ लागल्या. पदवीधर होऊ लागल्या. लेखन करु लागल्या. मुलींच्या शाळा चालवू लागल्या. कितीतरी प्रथितयश अशा साहित्यिक स्त्रिया डोळ्यांसमोर येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel