दसर्‍यापासून             
दिवाळी विसा दिशी
मज माघारा कधी नेशी         
भाईराया ॥१॥

माझ्या दारावरनं             
रंगीत गाडया गेल्या
भावांनी बहिणी नेल्या         
दिवाळीला ॥२॥

भाऊबिजेच्या रे दिवशी         
लोकांचे भाऊ येती
वाट तुझी पाहू किती         
भाईराया ॥३॥    

मुले पुसताती             
केव्हा मामा गं येईल
काय उत्तर देईल             
बहिण तुझे ॥४॥

मुले पुसताती             
येईना का गं मामा
गुंतला काही मामा             
माय बोले ॥५॥

कोणत्या कामांत             
भाईराया गुंतलासी
बहिणीची कासावीशी         
होत आहे ॥६॥

शेजी मला पुसे             
येऊन घडीघडी
कधी माहेराची गाडी             
येणारसे ॥७॥

पूर ओसरले                
नदीनाले शांत झाले
अजून का न भाई आले         
बहिणीसाठी ॥८॥

नवरात्र गेले                 
दसरा दूर गेला
नेण्याला का न आला         
भाईराया ॥९॥

असेल आजारी             
काय माझा भाऊ
आयुष्य त्याला देऊ             
देवराया ॥१०॥

दूरच्या देशीचा             
शीतळ वारा आला
सुखी मी अईकीला             
भाऊराया ॥११॥

दूरच्या देशीचा
सुगंधी येतो वात
असेल सुखात             
भाईराया ॥१२॥

लागेल घालावी             
फार मोठी ओवाळणी
चिंता काय अशी मनी         
भाईराया ॥१३॥

पान फूल पुरे                 
पुरे अक्षता सुपारी
नको शेला जरतारी             
भाईराया ॥१४॥

नको धन नको मुद्रा             
नको मोतियांचे हार
देई प्रेमाश्रूंचीधार             
भाईराया ॥१५॥

दादा बाळपणी             
तुला चावा मी घेतला
त्याचा काय राग आला         
आज तुला ॥१६॥

दाणे भातुकलीचे             
खाशी म्हणून बोलल्ये
तेच काय मनी धरिले         
आज दादा ॥१७॥

अपराध पोटी                 
प्रेम थोरांचे घालीत
येई धावत धावत             
भाईराया ॥१८॥

पाठच्या बहिणीवरी             
भाऊ कसा रागावेल
चंद्र आग का ओकेल         
काही केल्या ॥१९॥

पाठच्या बहिणीवरी             
भाऊ का संतापेल
कस्तुरी का सोडील             
निज वास ॥२०॥

पाठच्या बहिणीवरी             
भाऊ कसा हो रुसेल
कधी सोने का कुसेल         
काही केल्या ॥२१॥

पाठच्या बहिणीवरी             
भाऊ का रागावेल
रंग का बदलेल             
आकाशाचा ॥२२॥

पाठच्या बहिणीवरी             
जरी रागावेल भाऊ
तरी म्हणेल कोण राहू         
संसारात ॥२३॥

सोड सारा राग             
रुसवा टाक सारा
पुसाव्या माझ्या धारा         
लोचनीच्या ॥२४॥

सोड सारा राग             
तुला राग ना शोभत
येई धावत धावत             
भाईराया ॥२५॥

सोड सारा राग             
रागाचे होवो हसू
डोळयांचे माझे असू             
दादा पूस ॥२६॥

ताईच्या बाळांचे            
येऊन घेई मुके
खेळव कौतुके             
भाचेयांना ॥२७॥

येरे येरे माझ्या             
बाळे बोलती अंगणी
डोळयांना माझ्या पाणी         
येते बघ ॥२८॥

येईल आता मामा             
आणील आम्हा खाऊ
मुले सांगती मुलांना         
रडे येते मला भाऊ ॥२९॥

येरे येरे मामा             
मुले बोलती नाचत
प्रेमे भरे माझे चित्त             
कोणा सांगू ॥३०॥

मागे त्यांनी तुला             
रागे कागद लिहिला
त्याचा काय राग आला         
भाईराया ॥३१॥

न्यावया आलास             
नाही पाठविली त्यांनी
अढी काय त्याची मनी         
धरिलीस ॥३२॥

आपलेच ओठ             
दादा आपलेच दात
थोर सारे विसरत             
मागील रे ॥३३॥

नको काही मनी ठेवू             
भाऊ येईल लगबग
मायबापांची ती बघ             
आण तुला ॥३४॥

मायबाप मेल्यावरी             
मग कोठले माहेर
काय खरे हे होणार             
शब्द दादा ॥३५॥

शेवटील शब्द             
आई तुला जे बोलली
काय विस्मृती पडली         
त्यांची दादा     ॥३६॥

ताईला प्रेम देई             
तिला रे तूच आता
माय बोले मरता मरता         
दादा तुला ॥३७॥

ताईला प्रेम देई             
तुला ती तिला दूच
नको कधी विसंबूस             
माय बोले ॥३८॥

नको ताईला विसरु             
बाबा बोलले आठव
मला गाडी तू पाठव             
भाऊबीजे ॥३९॥

कोणापुढे रडू                 
कोणापाशी बोलू
कधी येईल मायाळू             
भाईराया ॥४०॥

येरे येरे भाऊ                 
किती झाले दडपण
कधी ह्रदय उघडनी             
तुझ्यापुढे ॥४१॥

येरे येरे भाऊ                 
किती पाहावी रे वाट
पाण्याचा चाले पाट             
डोळयांतून ॥४२॥

येरे येरे भाऊ                 
भेटीला वर्षे चार
पाहू नये अंत फार             
बहिणीचा ॥४३॥

येरे येरे भाऊ                 
किती वरसं नाही भेटी
कधी पडशील दृष्टी             
भाईराया ॥४४॥

जिव्याच्या जिवलगा         
प्रेमाच्या सागरा
सुखाच्या माहेरा             
येई भाई ॥४५॥

जिवाच्या जीवना             
अमृताच्या सिंधू
येई गा तू बंधू             
उठाउठी ॥४६॥

पावलोपावली                
किती करु आठवण
डोळे येतात भरुन             
भाईराया ॥४७॥

वार्‍या वार्‍या सांग             
भाईरायाची खुशाली
धार संतत लागली             
माझ्या डोळा ॥४८॥

अरे वार्‍या वार्‍या             
करिशी भिरीभिरी
भावाच्या कानावरी             
हाक घाली ॥४९॥

अरे वार्‍या वार्‍या             
धावशी लांबलांब
बहिणीचा निरोप सांग         
भाईरायाला ॥५०॥

का रे सकाळीच             
कावळ्या का का करिशी
काय न्याया येतो मशी         
भाईराया ॥५१॥

कावळया कावळया             
लांब जाई रे उडून
देई निरोप सांगून             
भाईरायाला ॥५२॥

दाणे मी घालीते             
नित्य तुम्हा अंगणात
भावाची आणा मात             
चिमण्यानो ॥५३॥

नाही हाकलीले             
कधी अंगणामधून
यावे निरोप सांगून             
भाईरायाला ॥५४॥

डोळे फडफडे                 
घास गळे तोंडातून
काय येतसे दुरुन             
भाईराया ॥५५॥

उचकी लागली            
मला सकाळपासून
काय येतसे दुरुन             
भाईराया ॥५६॥

काय वयनीने             
भूल फार रे पाडली
म्हणून नाही झाली             
आठवण ॥५७॥

वाट मी पाहात्ये             
डाक रे मार्गाची
सख्या तुझ्या रे पत्राची         
दादाराया ॥५८॥

दुपारचे ऊन                 
घाटीडोंगर कोण घेतो
बहिणीसाठी भाऊ येतो         
भाऊबीजे ॥५९॥

दुपारचे ऊन                 
लागते सणसण
शेला घेतो पांघरुन             
भाईराया ॥६०॥

दुपारचे उन                 
लागते शेल्यांतून
घोडी काढी बागेतून             
भाईराया ॥६१॥

सूर्यनारायणा             
तापू नको फार
येतसे सुकुमार             
भाईराया ॥६२॥

तांबडे पागोटे                 
उन्हाने भडक्या मारी
सुरुच्या झाडाखाली             
भाईराया ॥६३॥

तांबडे पागोटे                 
सोडीतो बांधतो
चाल पुण्याची काढीतो         
भाईराया ॥६४॥

कावळा का का करी             
दहीभात मागे
पाहुणा येतो सांगे             
भाईराया ॥६५॥

कावळा कोकावे             
घराच्या आढ्यावरी
पाहुणा येतो घरी             
भाईराया ॥६६॥

दिवस मावळला             
केळीच्या कोक्यात
मला माघारा सोप्यात         
भाईराया ॥६७॥

दिवस मावळला             
कण्हेरी आड गेला
मला माघार काल आला         
भाईराया ॥६८॥

आई आली आली             
मामाची गाडी आली
मुलांची हाक झाली         
अंगणात ॥६९॥

मामाची गाडी आली         
बहीण आनंदली
आनंदे वोसंडली             
चित्तवृत्ती ॥७०॥

भावाला पाहून             
बहीण गहीवरे
डोळियांचे झरे             
वाहताती ॥७१॥

पूर ओसरतो             
बहिणीच्या डोळियांचा
बोलते गोड वाचा             
बहीण भावा ॥७२॥

तुला आळवीत             
बैसल्ये होत्ये दादा
काय वयनीच्या             
नादा गुंतलास ॥७३॥

तुल आठवीत             
बैसल्ये दादा देख
काय ऐकलीस हाक         
भाईराया ॥७४॥

आहेस खुशाल             
खुशाल वैनीबाई
सांग सांग सारे भाई         
भूकेलेली ॥७५॥

काय होतासे आजारी         
डोळे तुझे गेले खोल
बोल रे सख्या बोल         
भाईराया ॥७६॥

किती दिवसांनी             
भेटशी तू रे मला
अमृताचा रस             
भाईराया चाखवीला ॥७७॥

प्रकृतीची दादा             
नको करु हेळसांड
बहिणीशी बोल             
मनीचे दुःख सांड ॥७८॥

प्रवासाचा शीणे             
नाही ताई मी आजारी
हळूवार चित्तभारी             
ताई तुझे ॥७९॥

ताईला पाहून             
पळाला सारा शीण
भावाला बहीण             
अमृताची ॥८०॥

पाहूण बहीण             
सारी दुःखे दुरावती
ह्रदयी भरती             
प्रेमपूर ॥८१॥

दिवाळीच्या सणा
दादा सासुरवाडी जावे
भाऊबीजे भाई यावे
बहिणीकडे ॥८२॥

बहिणीची मुले
भाऊ खेळवू लागला
जरी थकला भागला
प्रवासाने ॥८३॥

शेजारिणी बाई
उसने द्यावे गहू
पाहुणे आले भाऊ
फारां दिशी ॥८४॥

शेजारिणी बाई
उसने द्यावे लोणी
भाऊ माझा गं पाहुणा
त्याला शिरा मेजवानी ॥८५॥

जिरेसाळी गहू
खिरीला किती घेऊ
जेवणार माझे भाऊ
पाचजण ॥८६॥

सोनसळे गहू
रवा येतो दाणेदार
फेण्यांचे जेवणार
भाईराया ॥८७॥

सोनसळे गहू
त्यांत तुपाचे मोहन
भाऊबीजेचे जेवण
भाईरायाला ॥८८॥

माझ्या घरी पाहुणा
भाजीभाकरीचा
जेवणार साखरेचा
भाईराया ॥८९॥

चंदनाचे पाट
मांडीले हारोहारी
आज आहे माझ्या घरी
भाऊबीज ॥९०॥

भाऊबीज केली
बहिणीने काल
भाईराया हिरवी शाल
पांघुरला ॥९१॥

भाऊबीज केली
बहिणीने रातोराती
भाईराये चंद्रज्योती
उजळील्या ॥९२॥

भाऊबीजेच्या रे दिवशी
का रे भाई रुसलासी
तुझा शेला माझ्यापाशी
आठवण ॥९३॥

सोन्याची साखळी
देत्ये मी बजावून
तू भाऊ मी बहीण
भाईराया ॥९४॥

भाऊबीजेच्या दिवशी
करीन कवतूक
ओवाळीन पालखीत
भाईराया ॥९५॥

भाऊबीज करु
आपण दोघीतीघी
शाल घेऊन मनोजागी
भाईरायाला ॥९६॥

भाऊबीजेच्या दिवशी
भाऊ बसला न्हाऊन
चल सखे ओवाळून
ताईबाई ॥९७॥

भाऊबीजेच्या दिवशी
ओवाळीन तुला
जरीचा खण मला
भाईराया ॥९८॥

भाऊबीजेच्या दिवशी
ओवाळीत जाते
ताटी घाला मोत्ये
भाईराया ॥९९॥

हात भरला कांकणाने
कान भरला चाफाने
केले माहेर भावाने
बहिणीला ॥१००॥

माझ्या दारावरुन
हरदासी मेळा गेला
त्यात मी ओळखीला
भाईराया ॥१०१॥

हजाराचा घोडा
बाजारांत उठे बसे
बहिणीचे घर पुसे
भाईराया ॥१०२॥

माझ्या दारावरुन
कोण गेला गं सुरंगी
हाती रुमाल पंचरंगी
भाईराया ॥१०३॥

अंबारीचा हत्ती
रस्त्याने उठे बसे
माझा भाईराया
बहिणीचे घर पुसे ॥१०४॥

मुंबई शहरात
गल्लोगल्ली चिरे
त्यांतून सखा फिरे
भाईराया ॥१०५॥

भाऊबीजेकारणे
तुम्ही यावे भाई
संगे आणा वैनीबाई
उषाताई ॥१०६॥

माझ्या दारावरुन
टपालवाला येतो
माझ्या गं भाईरायाचे
खुशालीचे पत्र देतो ॥१०७॥

निरोप धाडित्ये
निरोपासरशी चिठ्ठी
सत्वर याचे भेटी
भाईराया ॥१०८॥

दळण मी दळी
काढीते रवापीठी
धाडित्ये तुम्हा भेटी
भाईराया ॥१०९॥

निरोप धाडित्ये
निरोपासरसे यावे
भेटून मला जावे
भाईराया ॥११०॥

वाईट हा रस्ता
टाकी लावून फोडावा
छकडा रंगीत पाठवावा
भाईरायाला ॥१११॥

नदीच्या पलीकडे
कोणाचे शेले भाले
मातृभक्त माझे आले
भाईराज ॥११२॥

चांदीच्या घंगाळात
चंद्र सूर्य डोले
सखा कचेरीत बोले
भाईराया ॥११३॥

काशीतले कागद
आले डब्यातून
वाचले सभेतून
भाईरायाने ॥११४॥

माझा आहे भाऊ
शहाणा सुरता
त्याच्या लौकिकाची वार्ता
चोहीकडे ॥११५॥

मोठेमोठे डोळे
हरीण पाडसाचे
तसे माझ्या राजसाचे
भाईरायाचे ॥११६॥

गोड गोड बोले
हसणे किती गोड
जगत्री नाही जोड
भाईरायाला ॥११७॥

हाताचा उदार
तसा मनाचा खंबीर
गुणाने गंभीर
भाईराया ॥११८॥

कुणा ना दुखवील
हसून हासवील
सार्‍यांना सुखवील
भाईराया ॥११९॥

माझा भाईराया
सर्वांना हवा हवा
आहे मथुरेचा खवा
भाईराया ॥१२०॥

दांडपट्टा खेळे
करी तरवारीचे हात
घोडा नेई दौडवीत
भाईराया ॥१२१॥

हत्तीच्या सोंडेवरी
मोहनमाळा लोळे
तालीमपट्टा खेळे
भाईराया ॥१२२॥

हत्तीच्या सोंडेवरी
ठेवील सुपारी
स्वारी निघाली दुपारी
भाईरायाची ॥१२३॥

माझे दोघे भाऊ
देवळाचे खांब
अभंग प्रेमरंग
मला ठावे ॥१२४॥
 
माझे दोघे भाऊ
बिल्लोरी आरसे
देवळी सरीसे
लावीयेले ॥१२५॥

माझे पाच भाऊ
ते गं मला बहू
ईश्वरावरी गहू
वाहियेले ॥१२६॥

माझे पांच भाऊ
देवळाच्या भिंती
गिलावा देऊ किती
आयुष्याचा ॥१२७॥

माझे दोघे भाऊ
मला ते वाणीचे
देवाच्या दारीचे
कडुलिंब ॥१२८॥

अंगणात उभा
जन म्हणे राजा
मी म्हणे भाऊ माझा
आला भेटी ॥१२९॥

माझा भाईराया
कसा का असेना
त्याच्यासाठी प्राणा
टाकीन मी ॥१३०॥

माझा भाईराया
मनी मी आठवीन
पोटात साठवीन
निरंतर ॥१३१॥

माझा भाईराया
ओव्यांत गायीन
ह्रदयी स्मरेन
रात्रंदिस ॥१३२॥

ध्यानी मी पाहीन
स्वप्नी मी पाहीन
प्रेमाची मी बहीण
भाईरायाची ॥१३३॥

बहीणीला भाऊ
एक तरी गं असावा
पावल्याचा खण
एका रात्रीचा विसावा ॥१३४॥

आवड मला बहू
लुगडे नको घेऊ
अंतर नको देऊ
भाईराया ॥१३५॥

माझे दारावरुन
नको जाऊ मुक्यामुकी
नको घेऊ साडीचोळी
मी रे शब्दाची हो भुकी ॥१३६॥

भाऊ चोळी शिवी
शिवी आपुल्या रुमालाची
धन्य तुझ्या इमानाची
भाईराया ॥१३७॥

माझ्या आयुष्याचा
भाईराजा तुला शेला
उरल्याची चोळी तुला
वयनीबाई ॥१३८॥

माझ्या आयुष्याची
भाईराया तुला कंठी
उरल्याची तुला अंगठी
वयनीबाई ॥१३९॥

माझे की आयुष्य
कमी करुन मारुती
घाल शंभर पुरती
भाईरायाला ॥१४०॥

जीवाला देत्ये जीवन
जीवन देईन आपुला
चाफा कशाने सुकला
भाईराया ॥१४१॥

पिकला अननस
हिरवी त्याची छाया
बहिणीवर करी माया
भाईराया ॥१४२॥

पाऊसपाण्याचे
कोणी येईना जाईना
माझा निरोप जाईना
भाईराजाला ॥१४३॥

ओळी ओळी घर
मोजीत मी गेल्ये
एक घर विसरल्ये
भाईरायाचे ॥१४४॥

दूरदेशी पेण
कोणी येईना जाईना
माझा निरोप सांगेना
भाईरायाला ॥१४५॥

दूरदेशी पेण
महिन्याची वाट
कागदी तुझी भेट
भाईराया ॥१४६॥

चोळी माझी ग फाटली
चिंता नाही ग वाटली
दुसरी पाठवीली
भाईरायांनी ॥१४७॥

चोळी माझी गं फाटली
फाटली फाट जाऊ
घेणाराचे मन पाहू
भाईरायाचे ॥१४८॥

चोळीयेची घडी
कुंकवावीण धाडी
असे नाही पडली
पुडी कोठेतरी ॥१४९॥

चोळीयेची घडी
कुंकवाची पुडी
निरोपावीण धाडी
भाईराया ॥१५०॥

शब्दांचे निरोप
बोलले संपताती
मुके निरोप धाडीती
भाईराया ॥१५१॥

चोळीयेची घडी
कुंकवाची पुडी
त्यातून भाऊ धाडी
अंतरंग ॥१५२॥

चोळीयेची घडी
कुंकवाचा मासा
चोळी जाते दूरदेशा
बहिणीला ॥१५३॥

चोळी शिव रे शिंप्या
चोळी शीव पाटावरी
चोळी जाते घाटावरी
बहिणीला ॥१५४॥

चोळी शिव रे शिंप्या
मोती लाव शिवणीला
चोळी जाते बहिणीला
दूरदेशा ॥१५५॥

एकापुढे एक
माझ्या माउलीबाईचे
भाऊ चालती सोयीचे
चौघेजण ॥१५६॥

एकापुढे एक
चालती शिवूमिवू
नको पापिणी दृष्ट लावू
भाईरायांना ॥१५७॥

माझ्या अंगणात
चिमण्या पाणी पीती
बहिणी तोंडे धुती
भाईरायाच्या ॥१५८॥

सरले दळण
उरले पाच गहूं
आम्ही बहिणी ओव्या गाऊ
भावंडांना ॥१५९॥

माझ्या दारावरुन
गाडया गं धावती
वर रुमाल उडती
भाईरायांचे ॥१६०॥

दादाराया अप्पाराया
तुम्ही बसा एकीकडे
दिवाळीचे वाकी तोडे
मला द्यावे ॥१६१॥

दादाराया अप्पाराया
तुम्ही बसा एके ओळी
दिवाळीची साडी चोळी
मला द्यावी ॥१६२॥

दिवाळीचा सण
भाऊबीज आनंदाची
करु सख्या गोविंदाची
भाईरायाची ॥१६३॥

बीजेच्या दिवशी
माझ्या ताटामध्ये मोती
ओवाळीन तुझा पति
वयनीबाई ॥१६४॥

शेजी ती पुसते
तुला भाऊ गं कितीक
पृथ्वीचा चंद्र एक
भाईराज ॥१६५॥

शेजी गं पुसते
तुला भाऊ कोण कोण
चंद्रसूर्य दोघेजण
भाईराज ॥१६६॥

पड रे पावसा
पिकू दे दाणापाणी
भाईरायाला बहीणी
आठवीती ॥१६७॥

पाऊस की पडे
मृगाआधी रोहिणीचा
भावा आधी बहिणीचा
संवार ॥१६८॥

माझ्या दारावरनं गेला
माझ्या घरी नाही आला
काय अपमान झाला
भाईरायाचा ॥१६९॥

हाका मी मारीत्ये
उभी राहून गल्लीला
मशी अबोला धरीला
भाईरायाने ॥१७०॥

माझे दारावरुन
कोण गेला पगडीचा
कळा माझ्या बुगडीचा
भाईराया ॥१७१॥

तांबडे पागोट्याचा
पदर लोंबे पाठीवरी
कंठी शोभे छातीवरी
भाईरायाचे ॥१७२॥

सासुरवाडी गेला
सासू पाहे तोंडाकडे
तुझ्या विडयाला रंग चढे
भाईराया ॥१७३॥

माझ्या दारावरनं
मुलांचा मेळा गेला
त्यांत मी ओळखीला
भाईराजा ॥१७४॥

माझ्या दारावरनं
हळदीकुंकवाचा नंदी गेला
खडा मारुन उभा केला
भाईरायांनी ॥१७५॥

दसर्‍याचा खण
दिवाळीचा रस्ता
ओवाळीन तुझ्या कंथा
वैनीबाई ॥१७६॥

मानीयला भाऊ
जातीचा मुसलमान
दिवाळीची चोळी
त्याचा कागदी सलाम ॥१७७॥

मानीयला भाऊ
जातीचा मुसलमान
दिवाळीची चोळी
घरी आलासे घेऊन ॥१७८॥

मानीयला भाऊ
जातीचा मुसलमान
हस्तीदंती चुडे
मला आलासे घेऊन ॥१७९॥

मानीयला भाऊ
जातीचा मुसलमान
सख्खा भावा गं परीस
त्याचे आहे गं इमान ॥१८०॥

मानीयला भाऊ
जातीचा मुसलमान
नका गं त्याला हसू
दुःखे जाईल त्याचा प्राण ॥१८१॥

दरसाल येई
बहिणीला आठवून
जातीचा मुसलमान
प्रेमासाठी ॥१८२॥

तुझा माझा भाऊपणा
जगजाहीर नसावा
लोभ अंतरी वसावा
भाईराया ॥१८३॥

आपण गूज बोलू
डाळिंबीसमान
तू भाऊ मी बहीण
जडे नाते ॥१८४॥

मानीयला भाऊ
तुला तो काय देतो
दिवाळीची चोळी
घेऊनीया घरी येतो ॥१८५॥

माय तो माहेर
बाप तो येऊ जाऊ
पुढे आणीतील भाऊ
लोकलाजे ॥१८६॥

माय तो माहेर
बाप तो माझी सत्ता
नको बोलू भाग्यवंता
भाईराया ॥१८७॥

गोर्‍ये भावजयी
नको करु फुणफुण
सांगेन तुझे गुण
भाईरायांना ॥१८८॥

गोर्‍ये भावजयी
नको बोलू रागे फार
आल्ये मी दिवस चार
माहेराला ॥१८९॥

वयनीबाई भावजयी
नको बोलू ये गं जा गं
माज्या पेटार्‍याचा नाग
भाईराया ॥१९०॥

वयनीबाई भावजयी
नको बोलू इडीतिडी
माझी पाटावाची घडी
भाईराया ॥१९१॥

वयनीबाई भावजयी
तुझा भांग गं सरसा
माझा कल्याणी आरसा
भाईराया ॥१९२॥

भावजयांमध्ये
वयनीबाई गोरी
कपाळी शोभे चिरी
कुंकवाची ॥१९३॥

गोरी भावजय
गर्विष्ठ बोलाची
मला गरज लालाची
भाईरायाची ॥१९४॥

वैनीबाई भावजयी
नको उभ्याने कुंकू लावू
नवसाचा माझा भाऊ
किती सांगू ॥१९५॥

भाऊ गं आपला
वैनीबाई ती लोकांची
मने राखावी दोघांची
ताईबाई ॥१९६॥

दादाराया बाजारात
वैनीबाई मारी हाका
उंची खण घेऊ नका
वन्संबाईंना ॥१९७॥

गोर्‍ये भावजयी
किती उर्मट बोलणे
मन दुखवीशी
भाईरायाचे कोवळे ॥१९८॥

गोर्‍ये भावजयी
किती बोल अहंतेचे
फुल कोमेजले
भाईराय ममतेचे ॥१९९॥

गोर्‍ये भावजयी
कितीबोल गं रागाचे
फूल कोमेजले
देवा शिवा शंकराचे ॥२००॥

गोर्‍ये भावजयी
नको बोलू टाकामेकी
हळुवार भाईराया
चंद्र गं कोमेजे एकाकी ॥२०१॥

भाऊ गं म्हणती
आल्या बहीणी भेटाया
भावजया गं म्हणती
आल्या नणंदा लुटाया ॥२०२॥

भाऊ गं म्हणती
बहिणीला द्यावा पाट
भावजया गं म्हणती
धरा नणंदा अपुली वाट ॥२०३॥

भाऊ गं म्हणती
बहिणीची घाल वेणी
भावजया गं म्हणती
उंदराने नेली फणी ॥२०४॥

भाऊ म्हणे गं बहिणी
बहिणी येई गं घरात
भावजय रागे म्हणे
बर्‍या आहेत उंबर्‍यात ॥२०५॥

भाऊ गं म्हणती
बहिणीची भरा ओटी
भावजया गं म्हणती
उंदराने नेली वाटी ॥२०६॥

भाऊ गं म्हणती
बहिणीची भरा ओटी
भावजया गं म्हणती
गहू जमिनीच्या पोटी ॥२०७॥

भाऊ म्हणे चोळी शिवी
भावजय दे ना दोरा
नको हो वैनीबाई
चोळीचा तो काय तोरा ॥२०८॥

भाऊ चोळी शिवी
भावजय डोळे मोडी
नको हो वैनीबाई
चोळीची ती काय गोडी ॥२०९॥

पिकलेले लिंबू
झाडाला तोलेना
गर्व झालेली बोलेना
वैनीबाई ॥२१०॥

माउलीची माया
काय करील भावजयी
पावण्यावीण जाईजुई
सुकवील ॥२११॥

आईबापांच्या राज्यांत
खाल्ल्या दुधावरच्या सायी
भावजयांच्या राज्यांत
ताक घेण्या सत्ता नाही ॥२१२॥

अति प्रीत बहु
प्रीतीची दोघेजण
विडा रंगे कातावीण
भाईरायाचा ॥२१३॥

कपाळीचे कुंकू
करिते ढळढळा
तुला लक्षुमीची कळा
वैनीबाई ॥२१४॥

कपाळीचे कुंकू
घामाने भिजले
तुझे दैव ग चांगले
वैनीबाई ॥२१५॥

वडील भावजय
आईच्या समान
पित्याचा तुला मान
भाईराया ॥२१६॥

दसरा दिवाळी
वरसाचे दोन सण
नको करु माझ्यावीण
वैनीबाई ॥२१७॥

भाईरायाच्या शेजारी
नये राहू गं वयनी
कोपतील सार्‍या मनी
भावजया ॥२१८॥

वैनीबाई भावजयी
तुझी रात्र गे सोयरी
कोंबडा परी वैरी
आरवला ॥२१९॥

आमच्या वैनीबाई
गंगाबाई कोठे गेल्या
उन्हाने कोमेजल्या
जाईजुई ॥२२०॥

भावजयांमध्ये
वैनीबाई रंभा
सोन्याचा तुळंबा
भाईराया ॥२२१॥

नाकीची गं नथ
खाली बस गं पाहू दे
वज्रटीक गं लावू दे
वैनीबाई ॥२२२॥

भाऊ माझे गोरे
आम्ही बहिणी सावळया
मखमाली त्या पीवळया
भावजया ॥२२३॥

भावजयांमध्ये
वैनीबाई शांत
भाऊ माझे सूर्यकांत
उगवले ॥२२४॥

चैत्रमासीच्या
रांगोळया प्रकाराच्या
नणंदा झणकार्‍याच्या
वन्सबाई ॥२२५॥

नणंदा वन्संबाई
आपुला मान घ्यावा
आशीर्वाद मला द्यावा
चुडेयांचा ॥२२६॥

भावा गं परीस
भावजय फार भली
कोणा अशीलाची केली
वैनीबाई ॥२२७॥

भावा गं परीस
भावजय गं रतन
सोन्याच्या कारणे
चिंधी करावी जतन ॥२२८॥

वळवाचा पाऊस             
पडून ओसरला
भावाला झाल्या लेकी         
मग बहीण विसरला ॥२२९॥

आम्ही चारी बहिणी         
चार डोंगरांच्या आड
माझ्या भाईराय             
खुशालीचे पत्र धाड ॥२३०॥

आम्ही चौघी बहिणी         
चारी गावीच्या चिमण्या
सख्या भाईराया             
आम्ही घटकेच्या पाहुण्या ॥२३१॥

आम्ही तीघी बहिणी         
आम्ही आपुल्या आईच्या
कळया फुलती             
जाईच्या बागेमध्ये ॥२३२॥

चांदांत चांदणी             
मृंगांत रोहिणी
तशा तुझ्या रे बहिणी         
भाईराया ॥२३३॥

अहेवा मरण                 
सोमवारी आले         
भाऊ म्हणती सोने झाले         
बहिणीचे ॥२३४॥

अहेवा मरणाचा             
आहे मला वाटा
चोळी पातळ कर साठा         
भाईराया ॥२३५॥

जीव जरी गेला             
कुडी ठेवावी झाकून
येईल सर्वही टाकून         
भाईराया ॥२३६॥

जीव माझा गेला             
जर काळोख्या रे रात्री
सख्या लाव चंद्रज्योती         
भाईराया ॥२३७॥

संसारी असती             
उदंड नातीगोती
निराळी पडती             
बहीणभाऊ ॥२३८॥

संसारी कितीक             
असती नातीगोती
मोलाची माणिकमोती         
बहीणभाऊ ॥२३९॥

जन्मून जन्मून             
संसारात यावे
प्रेम ते चाखावे             
बहीण भावांचे ॥२४०॥

बहीण भावंडांचे प्रेम         
निर्मळ अनुपम
अमृताहून उत्तम             
संसारात ॥२४१॥

भावा ग बहिणीच्या         
प्रेमाला नाही सरी
गंगेच्या पाण्यापरी             
पवित्रता ॥२४२॥

भावा ग बहिणीच्या         
प्रेमाला नाही तोड
लाभेल ज्याला तोड         
धन्य धन्य ॥२४३॥

भावा ग बहिणीचे             
किती गोड असे नाते
कळे एका ह्रदयाते             
ज्याच्या त्याच्या ॥२४४॥

बहिणभावांच्या             
प्रेमाला नाही सीमा
द्यावी कोणती उपमा         
जगनत्रयी ॥२४५॥

बहीणभावांचे                 
प्रेम ते शुद्धबुद्ध
अपुरे होती शब्द             
वर्णनाला ॥२४६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to ओवी गीते : स्त्रीजीवन


देवी आरती संग्रह
कविता संग्रह
महाराष्ट्राचे शिल्पकार
ओवी गीते : इतर
ओवी गीते : मुलगी
Indian Agriculture
ओवी गीते : भाविकता
ओवी गीते : बंधुराय
ओवी गीते : ऋणानुबंध
ओवी गीते : समाजदर्शन
ओवी गीते : सोहाळे
ओवी गीते : बाळराजा
ओवी गीते : घरधनी
ओवी गीते : सासरचे आप्तेष्ट
ओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट