विनितने युद्धपातळीवर त्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा फडशा पाडला. इकडे तिकडे वर्तमानपत्रात तपासले. नवीन प्रकाशित झालेल्या कादंबऱ्याचा आढावा घेतला. तोपर्यंत राजेश कथा लिहिण्यात गुंतला. रात्रंदिवस मेहनत करून त्याने त्याची कथा पुन्हा लिहून काढली.

स्वत:च्याच कथेचे जसेच्या तसे प्रसंग, वाक्य आणि शब्द जरी त्याला आठवले नसले तरी शेवटी कथा त्याने लिहून काढली. विनीतला जमेल तेवढे त्याने संशोधन केले. इतर मित्रानाही त्याने मदतीला घेतले. कुठेच त्याच्या कथेसारखी कथा छापून आलेली नव्हती.

मग आता त्याने पुन्हा नव्याने लिहिलेली ही कथा छापायला द्यायची का?
याचे एखादे पुस्तकच छापायचे का?
कुणी प्रकाशक तयार होईल का?
की स्वत:च प्रकाशित करायची ती कथा?
पुस्तक स्वत: प्रकाशित करण्याइतके भांडवल नव्हते राजेशजवळ!
पुन्हा काही चौर्यकर्म घडले तर?
आणि आता परिक्षा जवळ आल्या आहेत, तेव्हा कथेचे काय करायचे ते नंतर पाहू!
असे म्हणून ती कथा त्याने नंतर कोणालाच आणि कुठेच पाठवली नाही!!

परिक्षा संपल्यानंतर कुणा प्रकाशकाला भेटून बघूया असा त्याने विचार केला.

मग परीक्षा आली.

कथा असलेली लाल रंगाची फाईल त्याने कपाटात ठेवून दिली....

कालांतराने तो हळूहळू त्या विचारांतून बाहेर पडला. अभ्यासाला लागला.

परीक्षा झाली!!

अनेक महिने उलटले...

अधून मधून राजेश वर्तमानपत्रात लिखाण करत होता. लेख लिहित होता. वाचकांचे प्रतसाद येत होते.

त्याचे बहुदा सगळे लेखन संवादात्मक असायचे. एखाद्या विषयावर भाष्य करतांना सरळ लेख न लिहिता तो दोन तीन जण त्या विषयावर चर्चा करा आहेत असे संवाद लिहायचा. एकजण त्या विषयाच्या बाजूने तर दुसरा विरोधात वगैरे असे त्याचे लिखाण लोकाना आवडून जायचे. आता लिखाण पाठवताना योग्य ती खबरदारी तो घेत होता. झेरॉक्स काढून ठेवत होता!!!

या कालावधीत एक गोष्ट चांगली झाली होती की त्याची कथा कोणत्याही दिवाळी अंकात छापून आली नाही आणि ती इतर कुठेसुद्धा पुस्तकरूपाने किंवा इतर कसल्याही प्रकारे छापून आल्याचे त्याला समजले नव्हते.

अधून मधून त्याच्या आईचा सुनंदाबद्दलचा रेटा सुरूच होता.

त्याला कसेतरी हो नाही म्हणत तो तोंड देतच होता.

आई सुनंदाच्या नावाचे अनेक फुल टॉस बॉल टाकायची आणि दर वेळेस तो सुनंदाचा चेंडू सिक्स मारून सीमापार करायचा आणि आई आणखी दुसरा चेंडू लगेच तयार ठेवायची.

दरम्यान वेळ मिळेल तसे राजेशचे वाचन आणि लिखाण सुरूच होते...

जुन्या काळातले राजे आणि राजांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पुस्तकांचा तो अभ्यास करायचा. चाणक्यबद्दल अनेक पुस्तके त्याने वाचून काढली. त्या कपाटातील त्याने पुन्हा लिहून काढलेल्या कादंबरीबद्दल का कोण जाणे त्याच्या मनात एक उदासीनता निर्माण झाली. कदाचित त्याला त्याद्वारे स्वत:च्या असहायतेची आणि विश्वासघात झाल्याची सतत आठवण होत असावी. त्याने ती कथा पुन्हा बाहेर काढली नाही.

***

एका वर्षांनंतर -

फायनल ईयरला नव्वदच्या वर मार्क पडून तो पास झाला.

तोपर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आले होते.

कॉलेज संपले होते. सुट्ट्या लागल्या!!

विनीत आणि त्याचे दोन मित्र राजेशकडे आले. तालुक्याच्या गावाला एका मित्राची मोठी गाडी घेऊन जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी त्यांचे जायचे ठरले. दोन तीन दिवस मुक्काम करून मजा करायची, फिरायचे असे त्यांनी ठरवले. सगळयांच्या परीक्षा संपल्या होत्या त्यामुळे आनंदाचे भरते ओसंडून वाहात होते. ते अगदी सक्काळीच म्हणजे पाच वाजता निघाले. सगळी तयारी आणि समान बरोबर घेतला होता.

चार मित्र आणि फिरायला एक गाडी - अजून काय पाहिजे? अगदी स्वर्गीय सुख! नाही का?

दुपारी बाराला ते अलकापूर या तालुक्याच्या गावी पोहोचले.

तेथून चार तासांचा रस्ता होता – "सावरीमाळ" या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा!

त्यांनी ब्रेक घेतला आणि एका खाणावळीत ते जेवणासाठी गेले.

विनीत, राजेश, बंडू आणि सोमा असे ते चौघं चार वेगवेगळे पदार्थ मागवून त्यावर ताव मारत होते - झुणका भाकर त्या हॉटेलची खासियत होती. त्यासोबत मिरचीचा कोल्हापूरी झटका, वांग्याचं भरीत, पनीर मटर आणि तवा पुलाव!

बंडू म्हणाला, "अरे यार विनीत, एक आयडीया आहे. ‘मंडोला सिनेमा’ मध्ये ‘किस्मत का खेल’ पिक्चर लागलाय! जाउया का? त्यात दोन सुपरस्टार एकत्र आलेत! - रोहन कुमार आणि अमित श्रीवास्तव. अमितजींनी यात वडिलांची भूमिका केली आहे! आणि रोहन कुमार मुलगा आहे."

सगळ्यांना आयडीया पसंत पडली. अजून त्यावेळेस दूरदर्शन हे एकमेव लोकप्रिय टीव्ही चॅनेल होते. अजून एक प्रायव्हेट चॅनेल होते पण दिवसातून चार तासच त्याचे प्रक्षेपण होते. व्हीसीआरचे सुद्धा प्रस्थ बरेच होते आणि इंटरनेटची अजून सुरुवात होती. पण तरीही मनोरंजनासाठी थिएटर मध्ये जाऊनच लोक सिनेमा बघत.

सोमा म्हणाला, "त्यात विनीतच्या आवडीची मस्त मस्त हिरीईन पण आहे ना यार! सुनीती पराडकर. काय झकास नाचते ती! मी पण फिदा आहे यार तिच्यावर!"

राजेश म्हणाला, "अरे असे फालतू सिनेमे काय बघतोस? किस्मत का खेल? ह्या! काय असणार आहे त्यात? हाणामारी, नाचगाणे अजून काय?"

विनीत म्हणाला, " हा रे! मला पण वाटतंय जाऊ आणि बघू हा पिक्चर! मी ऐकलंय लय वेगळी स्टोरी आहे. परदेशात पण शूटिंग केली आहे. आणि खूप गर्दी आहे पिक्चरला! पिक्चर पाह्यलं की मग जाऊ सावरीमाळला!"

राजेश म्हणाला, "ठीक आहे! अमितजी आहेत म्हणून एकदा बघायला हरकत नाही. मसाला चित्रपट आहे पण वेगळा आहे तर मग चला! आटपा मग लवकर! ढकला पोटात अन्न पटापट अन सुटा!"

चौघेजण तिकीट काढून थिएटरमध्ये बसले...

लाईट बंद झाले. पिक्चर सुरु झाला....

पिक्चरची कथा थोडक्यात अशी होती-

"एका शहरातला १५ वर्षांचा मुलगा (रोहन कुमार) एका कार्यक्रमांचं तिकीट मोफत जिंकल्यामुळे कंपनीमार्फत त्याच्या वडिलांसह (अमित श्रीवास्तव) परदेशात जातो. तो कार्यक्रम बघून आणि फिरून झाल्यानंतर मुलगा वडिलांचे लक्ष नसतांना त्याच्या धुंदीत एका ट्रेन स्टेशन वरच राहून जातो.

वडील सहज फेरफटका मारायला पुढे जाऊन परत येतात तर तो मुलगा तिथे नसतो.

तो मुलगा एका आंतरराष्ट्रीय स्मगलर्स च्या टोळीच्या तावडीत योगायोगाने सापडतो. त्यानंतर त्याचा एक चित्तथरारक प्रवास सुरु होतो - अचानक एका अशा जगाशी त्याची ओळख होते ज्या जगाचा त्याने आपल्या आयुष्यात कधी विचार सुद्धा केला नसता.

मग आणखी एका योगायोगाच्या घटनेत त्याचेकडून टोळीतल्या एकाचा खून होतो आणि तो तेथून निसटतो. मग गुंड त्याचे मागे लागतात..

इकडे त्याचे वडील घाबरून जातात. पोलिसांत तक्रार करतात. योगायोगाने पोलीस अधिकारी भारतीय असतो, अनेक दिवस जाऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने ते शेवटी स्वत:च जीव धोक्यात घालून मुलाला शोधायचे ठरवतात.

त्यासाठी लागणारी विसा पासपोर्टची सगळी मदत तो पिलीस अधिकारी करतो. मुलगा सापडत नाही!

भारतात परत आल्यानंतर दोन वर्षांनी एका विचित्र प्रसंगात त्यांची आपल्या मुलाशी भारतात भेट होते पण तो पार बदललेला असतो…."

बंडू आणि सोमा चित्रपट बघण्यात गुंतले असताना मध्येच विनीत आणि राजेश उठून निघून गेले होते....

त्याना प्रथम वाटलं की गाणे बिणे आवडले नसेल म्हणून बाहेर गेले असतील पण बराच वेळ ते बाहेर होते मग पुन्हा मध्ये आले.

चित्रपट सुटल्यावर -

"अरे काय चाललं होतं तुमचं दोघांचं आत बाहेर आत बाहेर? सुनीती पराडकर चा डान्स आवडला नाही का ह्या खेपेला??"

"आरे! त्या फटाकडी सुनीतीची ऐसी की तैसी रे! अरे इथे चोरी झालीय मोठी चोरी!"

"चोरी, कसली चोरी?"

"आपल्या राजेशच्या कादंबरीची चोरी झालीय. या पिक्चरची स्टोरी राजेशची आहे! एक वर्षांपूर्वी लिहिलेली. दिवाळी अंकात पाठवली होती पण दिवाळी अंकवाले गायब झाले आणि आता अचानक ह्या पिक्चरची कथा सेम टू सेम तीच! फक्त देश आणि परदेश एवढा फरक आहे बास!"

"अरे? असे कसे शक्य आहे?"

"शक्य झाले आहे. राजेश घरी जाऊन त्याची कथा दाखवेल आपल्याला! चला!"

राजेश आश्चर्य, संताप आणि निराशा अशा तिन्ही भावनांनी भारला गेला होता आणि नीट बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

"आपण आपली ट्रिप कॅन्सल करूया. घरी जाऊया!", विनितने सल्ला दिला.

पण राजेशने झाले ते गेले असे समजून आणि ट्रिप एन्जॉय करूया असे सांगून त्यावर जास्त चर्चा टाळली.

ते अचानक परत घरी आले असते तर सगळीकडे गवगवा झाला असता. राजेशला ह्या गोष्टीची जास्त वाच्यता नको होती. त्याला आता स्वतःची लेखनाची पत कळली होती. त्याचे लेखन चित्रपट बनवण्यासाठी सहज योग्य होते आणि विशेष म्हणजे त्याच्या पहिल्याच कथेवर पिक्चर हिट होत होता.

चित्रपटाच्या सुरुवातीला नावे येत असताना पटकथा, संवाद, कथा लेखक कोण कोण आहे हे दिले नव्हते.

त्याऐवजी स्टोरी, स्क्रीनप्ले, डायलॉग अँड डिरेक्शन बाय – "के. के. सुमन" असे लिहिले होते.

के. के. सुमन हा सुमार माणूस इतक्या सगळ्या आघाड्या सांभाळण्याएवढा हुशार नक्कीच नव्हता.
पण मग करायचे काय?
ती कथा राजेशची आहे हे सिद्ध कसे होणार होते?
जे घडले ते सगळे अकल्पित होते. अनाकलनीय होते.
के. के. सुमन सारख्या प्रथितयश डायरेक्टवर आरोप केले असते तर लोकांनी राजेशला वेड्यात काढले असते.
मुळात ती कथा त्यांचेपर्यंत पोहोचलीच कशी?
विचार करून करून त्याचे डोके भणाणून गेले होते...

पण आता माघार नाही. जोपर्यंत के. के. सुमनचा छडा लागत नाही, त्याचा बदला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत राजेशच्या मनाला शांती लाभणार नव्हती.

ह्या घटनेने त्याला ती कथा कपाटातून बाहेर काढायला भाग पाडली...

त्या कथेच्या फाईलचा रंग लालसर होता....

फाईलकडे बघतांना राजेश म्हणाला, "खारकातेला माफ केले, आता के के सुमनला माफी नाही! नक्कीच नाही! आणि फक्त केके ला पकडून मी थांबणार नाही तर अशा अनेक कथा चोऱ्या उघडकीस आणणार!"

त्यानंतर राजेश एका ध्येयाने पछाडल्यासारखा फिल्म जर्नालिझमचा डिप्लोमा कोर्स केला ज्याद्वारे त्याला फिल्म क्षेत्राशी जोडलेले राहाता येईल.

आईचेही त्याने काहीएक ऐकले नाही!

नंतर मग स्क्रिप्ट लेखनाचा डिप्लोमा केला.

जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला आता त्याची चोरालेली कथा आठवू लागली आणि मनात एकाच ध्यास होता – चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात लेखनाचे करियर!!

आता मागे वळून बघायचे नाही! प्रथम जिथे ब्रेक मिळेल तेथे! टीव्ही किंवा चित्रपट कुठेही! पण जायचे म्हणजे जायचे! मला कुणीही रोखू शकणार नाही! हळूहळू त्याला मार्ग सापडू लागले. दिशा मिळू लागली.

एके दिवशी त्याला विनितकडून एक आनंदाची बातमी कळली. विनितच्या एका दूरच्या काकांच्या ओळखीने त्याला टीव्ही वरच्या एका सिरियलच्या काही एपिसोड्सचे स्क्रिप्ट लिहिण्याचा चान्स मिळाला. त्या संधीचे त्याने सोने केले आणि त्या काकांच्या हाताखाली त्यांना स्क्रिप्ट लिहायला मदत केली. त्यांचेकडून खूप काही त्याला शिकायला मिळाले...

सोबतच तो वर्तमानपत्रांत चित्रपटविषयक लिहू लागला.

चित्रपटविषयक मासिकांकडून त्याला मराठी टीव्ही जगतातील कलाकारांचे इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळू लागली. त्याद्वारे थोडी प्रसिद्धी मिळाल्यानंतर मग काही प्रकाशन संस्थांनी त्याच्या काही कथा छापल्या.

सुरुवातीला त्याच्या आईने त्याच्या या करियरला विरोध करायचा प्रयत्न केला खरा पण त्याच्या भयंकर ध्यासाकडे आणि त्याने एकदाच तिच्याकडे रोखून बघितलेल्या नजरेकडे बघून तिने त्याला नंतर विरोध केला नाही.

दरम्यान त्याने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत काही कथा आणि लघू कादंबऱ्या लिहिल्या. त्या चांगल्या खपल्या.

काळ पुढे सरकत गेला. इंटरनेटवर लोक वाचन करू लागले. न्यूजपेपर ऑनलाइन झाले. ब्लॉग्ज आले...

राजेशने स्वतःचा ब्लॉग लाँच केला. त्याची वाचकसंख्या वाढली. मग तो बोरीवलीला येऊन राहू लागला कारण तो आता बऱ्यापैकी स्क्रिप्ट लेखन क्षेत्रात स्थिरावला होता. त्याला हवे तसे करियर मिळाले आणि बऱ्यापैकी प्रसिद्धी सुद्धा मिळाली...

पण त्याच्या लिखाणाची चोरी करणाऱ्यांचा सूड घायची भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पण अजून तरी त्याला टीव्हीवरील एखाद्या चर्चेत किंवा एखाद्या कार्यक्रमात किंवा हिंदी चित्रपटांची संबंधित कुठेही रत्नाकर रोमदाडे नावाचा माणूस वाचनात किंवा बघण्यात येत नव्हता!

आणि तो केके सुमन?

त्याचा आणि त्या दिवाळी अंक कार्यालयातील रत्नाकर रोमदाडे चा काही संबंध असेल का?

असलाच पाहिजे!

त्याबद्दल राजेश विचार करू लागला:

"आता मी मुंबईत आहेच! तर मग विनीतच्या काकांच्या मदतीने के के सुमनचा माग काढावा का? पण त्याने काय होईल? त्याला शोधले तरी मी सरळ त्याचेवर माझ्या कथा चोरीचा आरोप केला तर कोण विश्वास ठेवेल माझ्यावर?

आणि त्यानेच माझ्यावर उलटा चोरीचा आरोप केला तर? कारण चित्रपट पाहून मग मी त्याप्रमाणे थोडा बदल करून कथा लिहिली असा आरोप त्याने केला तर? के के प्रसिद्ध आहे आणि मी? दिवाळी अंक कार्यालय आणि के के सुमन यांच्यात नेमके काय आणि कसे कनेक्शन आहे?

आणि ते मी सिद्ध कसे करणार? माझ्याकड ठोस पुरावा आहे का?"

"माझी कादंबरी आणि चित्रपटाची कथा यात बराच फरक आहे, आणि शेवट पण थोडा बदललेला आहे! मी तर अजून फक्त या इंडस्ट्रीत सुरुवात करतोय. ते पण लेखक म्हणून! कलाकार म्हणून नाही! आणि लेखकांची स्थिती आणि महत्व काय आहे आज बॉलीवूड मध्ये? शून्य! माझ्यावर कोण विश्वास ठेवेल?"

"मी तर अजून कुठे मराठीत सुरुवात करतोय! ती पण कलाकार नाही तर लेखक म्हणून!
असे हजारो मराठी ऑनलाईन आणि ऑफलाईन लेखक कार्यरत आहेत. लिहित आहेत!
अनेक लेखक असे दिग्दर्शकांवर कथाचोरीचे आरोप करतात. त्यापैकी काही खरे आणि काही खोटे असू शकतात!
त्यापैकीच मी एक खोटा म्हणून गणलो गेलो तर?
शेवटी ही सगळी बॉलीवूडमधील मंडळी प्रतिष्ठित आणि प्रस्थापित आहेत.
आणि करीयरच्या सुरुवातीलाच मी नाहक कोणत्या वादात अडकून बदनाम झालो तर? त्या
मुळे बदला घेण्याची ही वेळ मला योग्य वाटत नाही!
आणि पूर्वी माझ्या दोन कथांची चोरी झाली असली तरी मला इतर ठिकाणी चांगली संधी मिळतेय आणि माझी लेखक म्हणून हळूहळू ओळख निर्माण होते आहेच!
तेव्हा मला घाई करायला नको. याचा अर्थ असा नाही की मी स्वस्थ बसून राहीन. नाही!
मी फक्त योग्य संधीची मी वाट बघेन आणि संधी मिळेलच. नाही मिळाली तर मी निर्माण करेल. पण आता ती वेळ नाही!" असे म्हणून त्याने एकदा त्या लाल फाईलकडे पाहिले.

दरम्यान आईने सुनंदासाठी त्याचेकडे फिल्डिंग लावणे सुरू केले होते...

गोडंबे काकांकडून दबाव वाढत होता. त्याच्या लेखनाच्या ध्यासापायी त्याचे लग्नाबाबतीतले विचार मागे पडले. अशातच "चार थापडा सासूच्या" च्या निमित्ताने सुप्रियाशी ओळख झाली. तिच्याबरोबर फिरणे हिरणे सुरु झाले. काहीवेळेस राजेशला वाटून जायचे ही सुप्रिया हीच आपल्यासाठी आयुष्याची योग्य जोडीदार आहे पण तो स्वतःला सावरायचा कारण त्याच्या जीवनाचे ध्येय वेगळे होते आणि विशेष म्हणजे आईचा सुनंदा सुनंदा असा सततचा जयघोष त्याला व्यथित आणि चिंतीत करत होता.

दरम्यान के. के. सुमन चे फारसे चित्रपट आले नाहीत. नंतर तो प्रोड्युसर बनला….!!!

(क्रमश:)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel