केकेचा मुलगा पिके सुमन (पवन किशोर सुमन) हा पक्का पार्टीबहाद्दर आणि प्लेबॉय होता. तो चित्रपटांसाठी खूप चांगले नसले तरी बरे लिखाण करायचा आणि विशेष म्हणजे ते लिखाण कधीही चोरलेले नसायचे. पण केके आणि रत्नाकर मात्र ऑनलाइन आणि इकडे तिकडे छापल्या जाणाऱ्या असंख्य कादंबऱ्या आणि कथांतून कथेचा गाभा बिनधास्त चोरायचे आणि त्यात मीठ मसाला टाकून त्याचा चित्रपट बनवायचे आणि स्वतःच्या नावाखाली ते खपवायचे आणि त्याचे क्रेडिट स्वतः उकळायचे. पिकेला हे अर्थातच माहित नव्हते.
राजेश रत्नाकरला ज्या रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी बोलावणार होता त्याच्या काही दिवसापूर्वी…
पिके एका पार्टीत धूम नाचला. आता वडील सध्या भारतात नसल्याने आणि त्याची आई ही वडिलांपासून वेगळी राहत असल्याने त्याला रान मोकळे झाले होते. त्या रात्री पार्टीत तो बेफाम नाचला. रात्रीचे बारा वाजले आणि एक आकर्षक पोशाख घातलेली महिला त्याचेकडे आली.
"हॅलो, मी रविना! हाऊ आर यू मिस्टर पवनकुमार सुमन?", पिकेच्या डान्स स्टेप्ससारख्याच डान्स स्टेप्स करत तिने पिकेला शेकहॅन्ड साठी हात पुढे केला.
पिकेची डान्स पार्टनर साक्षी तिच्याकडे बघू लागली. ती आणि पिके या रविनाला प्रथमच बघत होते. या आधी रविना कधीही त्यांना कुठे दृष्टीला पडली नव्हती.
"आय एम फाईन! पण सॉरी मी आपणाला ओळखले नाही. म्हणजे तू रविना आहेस ते तू सांगितलंस पण मी तुला ओळखत नाही!" पिके म्हणाला.
"मी लेखकांची चाहती आहे. विशेषतः तुमच्या कथा मला फार आवडतात!", रविना त्याच्या आणखी जवळ येत म्हणाली.
पार्टी, सुंदर मुली आणि लेखन हे तीन विक पॉईंट असलेल्या पिकेला पार्टीत एक सुंदर मुलगी त्याच्या लेखनाचे कौतुक करतेय म्हटल्यावर तो पघळला, नरमला.
"अ हो! थँक्स! थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स!" नाचतांना तिच्याकडे सरकत रविनाला पिके म्हणाला.
"वुड यु माईंड मी डान्सिंग विथ यु?" रविना त्याचे अधिक जवळ जात म्हणाली.
पिकेला रविनाचा आग्रह मोडवेना म्हणून मग नाईलाजाने त्याने साक्षीला जायला सांगितले. थोड्या नाईलाजानेच साक्षी त्याच्यापासून दूर झाली आणि अंधुक प्रकाशात उघडझाप करणाऱ्या डिस्को लाईट्सच्या प्रकाशात बेधुंदपणे डान्स करणाऱ्या काही जोडप्यांतून मार्ग काढत ती एका सोफ्यावर जाऊन बसली.
काही वेळाने जेव्हा अगदी मंद प्रकाशात संथमधुर संगीत सुरु झाले तेव्हा नाचतांना हळूहळू रविना आणि पिके हे दोघे एकमेकांच्या कानामध्ये कुजबूजत संभाषण करत होते.
रविना- "तुमच्या सर्व कथा मला आवडतात. मनात जे आहे ते स्पष्ट आणि रोखठोकपणे तुम्ही तुमच्या कथेत मांडता, हे मला खूप आवडते!"
पिके- "हो! जीवनाच्या विविध पैलूंवर मला लिहायला आवडते! जीवनातील कोणत्याही विषयावरचा कोणताही प्रसंग लिहायचा असल्यास मी कोणतीही आडकाठी न ठेवता त्याबद्दल लिहितो आणि चित्रपटातही ते तसेच असावे असा माझा आग्रह असतो!"
रविना- "विशेषतः प्रेमाबद्दल आणि सेक्सबद्दल तुम्ही जे स्पष्ट आणि रोखठोक लिहिता ते मला आवडते! काही लेखक फक्त सेक्स हा भाग मुद्दाम वगळून लिहितात!"
पिकेला अशी धाडसी मत व्यक्त करणारी मुलगी प्रथमच भेटली आणि आवडली!
पिके- "हो! अनेक कादंबरीकार अनेक कादंबऱ्या लिहितात, एखाद्याची पूर्ण जीवनकथा लिहून काढतात पण त्या माणसाच्या सेक्स लाईफचा त्या कादंबरीत साधा उल्लेखही नसतो! मला सांग रविना, माणसाच्या जीवनातील प्रत्येक पैलू हा महत्वाचा असतो आणि असा प्रत्येक पैलू संपूर्ण जीवनावर कमी अधिक परिणाम करणारा असतो. मग फक्त सेक्स हाच एक महत्वाचा पैलू टाळून एखादी कादंबरी लिहिली तर त्या कादंबरीतल्या विविध पात्रांना आणि त्यांच्या जीवनप्रवासाला आपण संपूर्ण न्याय देऊ शकू का? अर्थातच नाही!"
"अगदी बरोबर बोललात! मला हेच म्हणायचे होते!" असे म्हणत रविना आणखीन त्याचेजवळ सरकली.
साक्षीला हे पाहवत नव्हते. ती सोफ्यावरून उठली आणि दुसरीकडे गेली. तसा साक्षीला पिकेचा सुंदर मुलींबाबतचा विक पॉईंट माहिती होता. त्यामुळे हे तिला अगदीच अनपेक्षित नव्हते पण पिके भेटून तिला फक्त काही महिनेच झाले होते, त्यामुळे थोडी जेलसी तिच्या मनाला स्पर्शून गेली इतकेच!
रविनाने पिकेला आपली अशी ओळख सांगितली की, ती या मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीत कलाकार बनण्यासाठी आली आहे. टीव्ही किंवा फिल्म्स यात तिला करियर करायचे आहे आणि ती मैत्रिणीच्या एका बंगलोमध्ये सध्या काही दिवस एकटी राहते आहे. मैत्रीण आणि तिचा नवरा परदेशातून परत आले की मग ती दुसरी रूम शोधेल.
* * *
त्या पार्टीनंतर रोज त्यांचे एकमेकांना फोन करणे सुरू झाले. मग चार पाच दिवसातच त्यांच्या प्रेमाचा असा काही अंकुर उगवला की त्याचे आठवड्याभरातच झाड होईल की काय असे एकंदरीत वाटत होते. सोबत बागेत फिरणे झाले, सिनेमा बघून झाले, हॉटेलिंग झाले, मॉल्स मध्ये फिरणे व्हायला लागले, एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना कळू लागल्या. तिने त्याच्या कथा वाचणे सुरु केले.
* * *
काही दिवसांनी एकमेकांना आलिंगन देणे तसेच परस्पर संमतीने किस घेणे वाढू लागले. बरेचदा किस घेताना पिके अनावर व्हायचा पण राविनाने त्याला हसवून अडवायची मग शेवटी एके दिवशी ती त्याला लाडिक हसत म्हणाली,
"पिके साहेब, तुम्ही प्रेमात बरेच फास्ट दिसता! कथेत लिहिता त्याप्रमाणे खऱ्या जीवनातही बिनधास्त दिसता! आज रात्री नक्की आपण प्रेमाच्या अत्युच्च आविष्कारात भ्रमण करूया! या लवकर संध्याकाळी सात वाजेपर्यंत! मी तयार राहते! माझ्या बंगलोमध्ये! मी वाट पाहाते! येताना लॅपटॉप पण घेऊन ये तुझा! तुझ्या कथा वाचायच्या आहेत, मोकळ्या वेळात! तुझ्या नव्या कथेतले सगळे प्रेम प्रसंग वाचायचे आहेत मला, म्हणजे आपण कदाचित त्या प्रसंगांसारखे प्रेम खरोखर अनुभवू शकू"
"व्हेरी नाईस आयडिया!" पिके म्हणाला.
त्या रात्री साडेसात वाजता-
त्याने अंगावरचे बहुतेक कपडे काढले होते. मग तिचे कपडे काढायची त्याला घाई झाली. त्याने तिला हात लावताच ती म्हणाली, "राजा, घाई करू नकोस! माझ्याकरता "रेड क्राऊन" चा पेग आण! आपण दोघे पिऊ! आजची रात्र मेमोरेबल झाली पाहिजे! कारण रेड क्राऊनशिवाय मजाच ती काय? पाच मिनिटांच्या अंतरावर शॉप आहे! जा, घेऊन ये ना प्लिज!"
पिके एका पायावर तयार झाला. त्याने पुन्हा कपडे घातले आणि म्हणाला, " बरंय मॅडम! आणतो! मी जनरली रेड क्राऊन घेत नाही. थोडी स्ट्रॉंग आहे पण हरकत नाही, तू म्हणतेस तर घेईन मी! पण त्यांनतर मात्र एकही जास्तीचा बहाणा चालणार नाही बरं का! एवढं तडपवू नका माझ्यासारख्या गरीब माणसाला! पाच मिनिटांच्या अंतरावर शॉप आहे, घेऊनच येतो स्वतः जाऊन!"
असे म्हणून तो जायला निघाला तेवढ्यात तिने त्याला थांबवले आणि म्हणाली, "तू येतोस तोपर्यंत मला तुझी नवी चित्रपटाची कथा दे ना वाचायला! तू मला वाचायला द्यायचे कबूल केले होतेस ना! प्लिज! बाकी सगळ्या कथा मी वाचल्या आहेत! विशेषतः त्यातील प्रेम प्रसंग मला वाचायचेत आणि तुझ्यासोबत ते जिवंत करायचेत!"
त्याने तिला त्याचे लॅपटॉप ऑन करून दिले आणि पासवर्ड टाकून दिला आणि वेगवेगळ्या फोल्डर्स मधून त्याच्या नव्या कथेच्या फाईल्स तिला वाचायला दिल्या आणि बाहेर निघून गेला. सेक्ससाठी अधीर झाल्याने त्याचे डोके चालणे जवळपास बंद झाले होते.
मग घाईघाईने लॅपटॉप मांडीवर घेत तिने दरवाजा बंद केला, तिच्या मोबाईलची मेमरी चिप बाहेर काढली, लॅपटॉपला कनेक्ट केली. पिकेच्या नवीन लिखाणाच्या सगळ्या फोल्डर्स आणि फाईल्स तिने कॉपी केल्या आणि मेमरी कार्ड पटकन मोबाईलमध्ये टाकले आणि मोबाईल परत जसाच्या तसा लावला. तिची पर्स आणि इतर साहित्य घेऊन ती पिके यायच्या आत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून परागंदा झाली.
तिने पिकेला फोन करून सांगितले की तिच्या एका मैत्रिणीच्या आईला अचानक छातीत त्रास सुरू झालाय आणि मैत्रीण एकटी असल्याने तिच्या आणि आईच्या मदतीला ती रिक्षेने तातडीने जात आहे आणि ती त्याला नंतर भेटेल... सॉरी!
रेड क्राऊनच्या बाटल्या बेडवर ठेऊन तो संतापाने चरफडत होता, पण इलाज नव्हता. आपले लॅपटॉप सोबत घेऊन त्याच्या कारने तो साक्षीकडे जायला निघाला. दरम्याने त्याने रविनाला फोन केला पण स्विच ऑफ येत होता.
"मी नसतं का सोडलं हिला कारने, पण मला न सांगता ही अशी कशी निघून गेली?" असा विचार करतांना त्याच्या मनात रविनाची प्रतिमा येत होती. ती रात्र त्याने शेवटी साक्षीकडे घालवली.
दरम्यान राजेश एका बारमध्ये रत्नाकर सोबत ड्रिंक्स घेत होता. राजेशकडून अनेक नवीन कथा ऐकून त्यावर आधारित आयते अनेक चित्रपट बनवता येतील अशी इच्छा बाळगून रत्नाकर राजेश सोबत वेळ घालवत होता. एक विशिष्ट पेय रत्नाकारच्या नकळत त्याच्या पेयात मिसळल्यानंतर रत्नाकर भडाभडा राजेशला त्याच्या आणि केकेच्या एकंदर फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल स्वत:च्या नकळत सगळे खरे खरे सांगू लागला. राजेश हा अशा काही लेखकांपैकी एक असेल ज्याची कथा आपण कधीतरी चोरली आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना रत्नाकरला नव्हती.
"केके आणि मी उनाडक्या करणारे बेरोजगार युवक होतो. त्याची आणि माझी चांगली मैत्री होती. केकेची आई आणि गावातील लोक आमच्या उपदव्यापांनी त्रासले होते. केकेचा (किशोर) चा भाऊ कुमार याच्यासारखे अभ्यासात हुशार होण्यासाठी आमच्यावर दबाव यायचा. कुमार चांगल्या मार्कांनी पास व्हायचा तर किशोर आणि मी कॉपी करून काठावर पास व्हायचो. स्वतः मेहेनत न करता लोकांच्या मेहनतीची नक्कल करणे आणि त्यावर यश मिळवणे हा आमचा लहानपणापासूनचा आवडीचा खेळ!!
आम्हाला अभ्यासवगैरेंचा जाम कंटाळा यायचा पण चित्रपट बघणे आम्हाला खूप आवडायचे. मी आणि किशोर तासनतास विचार करत बसायचो की ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे चमधमक आहे. येथे एकदा प्रवेश मिळवला की पुढे पैसाच पैसा आणि सुंदर सुंदर बायका. अभिनय कशाशी खातात किंवा चित्रपटासारखी कलाकृती बनवण्यासाठी काय मेहनत करावी लागते, सकस लिखाण करावे लागते हे आम्हाला माहिती नव्हते आणि कुणी सांगून ते आम्हाला पटलेही नसते.
त्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर मधले सकाळी दहा वाजता लागणारे खास ऍडल्ट बी ग्रेड चित्रपट खूप पैसा कमवायचे. त्यामानाने त्या चित्रपटांना बजेट कमी असायचे. त्यात सुंदर सुंदर मुलीही काम करायच्या. आपण जर का अशा चित्रपटात काम केले तर आपल्याला पैसेही मिळतील आणि सुंदर सुंदर स्त्रियांचा सहवासही लाभेल या विचाराने आम्ही पछाडलो आणि मग आम्ही दोघे शेवटी गावातून पळून गेलो आणि मुंबईत आलो. रस्त्यांवर राहिलो. पडेल ती कामे केली. आमचे चित्रपटाचे वेड पाहून जेथे आम्ही काम करत होतो तेथील एकाने आम्हाला एका बी ग्रेड सिनेमा बनवणाऱ्या डायरेक्टर प्रोड्युसरचा पत्ता दिला. त्याचे नाव होते- केवलजीत! मग त्याने आमची टेस्ट घेऊन त्याच्या बी ग्रेड सिनेमात काम दिले. पैसे थोडेफार मिळत होते आणि सुंदर मुलींबरोबर काम करायला मिळायचे. तशा सिनेमात सिरीयसली अभिनय वगैरे फारसा करावा लागायचा नाही. मग आम्ही परस्पर एक धंदा सुरु केला!"
"कसला धंदा रत्नाकर? सांग ना!", राजेश म्हणाला.
"तुला माहिती आहे राजेश की भारतात फिल्म इंडस्ट्रीचे किती आकर्षण आहे ते! पूर्वीही आणि आजही भारतातील अनेक खेडे आणि शहरांतून अनेक मुली मुलं नशीब आजमावण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत येतात. काही खरोखरीच अभिनयगुणसंपन्न असतात आणि त्यांना कालांतराने संघर्षानंतर यश जरूर मिळते. काहींमध्ये अभिनयगुण नसतात ते निराश होऊन परत जातात. पण काही जण विशेषतः त्यातील काही मुली ज्या घरून पळून वगैरे तर आलेल्या असतात पण त्यांच्यात अभिनयगुण नसतो पण सुंदर असतात आणि जीवनात खूप पैसे मिळवणे हेच यांचे ध्येय असते. रिच लाइफस्टाइल त्यांना जगायची असते. जीवनाची अनेक सुखे त्यांना भोगायची असतात. मग त्या स्वतःच्या शरीराचा उपभोग इतरांना घ्यायला देऊन येनकेन प्रकारे चित्रपटात विशेषतः बी ग्रेड चित्रपटात कामं मिळवतात.
मग आम्ही अशा प्रकारच्या मुलींना जाळ्यात ओढायचे सुरु केले. त्यांची शरीरं उपभोगली आणि त्यांना केवलजीतकडे पाठवायचो. काही मुली राजीखुषीने तर काहींना आम्ही बळजबरी करून आमच्याशी शरीरसंबंध ठेवायला भाग पडायचो आणि मग केवलजीतकडे पाठवायचो. त्यावेळी मुली आतासारख्या सजग नव्हत्या. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला घाबरायच्या. केवलजीत पण त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा. पण आम्हीही त्यांना उपभोगायचो हे केवलजीतला कळले आणि ते त्याला आवडले नाही. आम्हाला दोघांना त्याने कायमचे कामावरून काढले.
मग नंतर आम्ही स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढली कारण आमच्याकडे तोपर्यंत बराच पैसे आला होता आणि नेहमीप्रमाणे केवलकडे काम करून करून आम्ही जे काही फिल्म मेकिंग बद्दल शिकलो तेच आमच्या साठी आम्ही कामी आलं. कॉपी करायची आमची सवय कामी आली. इतरांच्या सृजनशीलतेवर जगण्याची आमची लहानपणापासूनची सवय होती तीच अंगावळणी पडली.
पण नंतर नंतर बी ग्रेडचे चित्रपट आणि मेनस्ट्रीम सिनेमा असा भेद जवळजवळ नष्ट झाला. मग आम्ही मेनस्ट्रीम सिनेमामध्ये नशीब आजमावून बघायचे ठरवले. तेव्हा आम्हाला चित्रपट बनवतांना अडचण आली ती सशक्त कथेची. आम्ही दोघे त्याबाबतीत मठ्ठ!!
काही दिवसानंतर एकदा मी रेल्वेत प्रवास करत होतो. बाजूच्या सीटवर कॉलेजचा एक मुलगा "डिटेक्टिव्ह कथा" नावाचा दिवाळी अंक वाचतांना दिसला. आपल्या आईला एका सस्पेन्स कथेबद्दल तो सांगत होता आणि म्हणत होता की अनेक हॉलिवूड आणि हिंदी, मराठी चित्रपटांना शोभतील अशा कितीतरी कथा दिवाळी अंकात छापून येत असतात, पण ते क्षेत्र कधीही या कथांची दखल घेत नाही असे दिसते.
झाले! माझ्या माझ्या मेंदूत 'कॉपी करण्याची सृजनशीलता' दाटून आली. मग दादरला मी तात्पुरते दिवाळी अंक कार्यालय उभारले आणि पेपरात जाहिरात देऊन महाराष्ट्रभरातून नवीन दिवाळी अंकासाठी कथा मागवल्या. हजारोंनी कथा आल्या आणि मग त्या कथा घेऊन आम्ही कार्यालयाला टाळा ठोकला. त्यातील एका कथेवर आम्ही “किस्मत का खेल” हा सिनेमा बनवला त्यात खुद्द अमितजींनी म्हणजे सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांनी काम केले आहे! मग काळ बदलला तसा इंटरनेटवर अनेक मराठी लेखक हजारो फ्री कथा लिहून टाकू लागले मग आम्हाला फुकटात खजिनाच सापडला! चोरून न्यायला!"
आताच त्याच्या कानाखाली चार पाच दणादण माराव्यात आणि त्याला रस्त्यावर फरफटत नेऊन दोनचार तगडे गुंड भाड्याने घेऊन त्याला धो धो बदडून काढावा असं राजेशला प्रकर्षानं जाणवलं पण त्याने स्वतःला सावरलं. शेवटी इतक्या उशिरा का होईना पण छडा लागला होता.
राजेश आणि रत्नाकर बसले होते त्या टेबलखाली एक माईक लावलेला होता आणि शेजारी असलेल्या एका टेबलवर वेष बदललेला सारंग सोमैया त्याच्या चष्म्याला लावलेल्या मायक्रोकॅमेरामधून ह्या सगळ्याची व्यवस्थित व्हीडिओ रेकॉर्डिंग करत होता. या सगळ्यांच्या बदल्यात राजेशने रत्नाकरला एक कथा फुकटात लिहून रत्नाकारच्या चित्रपटासाठी द्यायचे कबूल केले होते.
काही दिवसांनी –
वीणा वाटवे (जिला सारंगने गावाकडून मुंबईत टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवून देण्यासाठी आणले होते), राजेश आणि सारंग हे तिघे राजेशच्या फ्लॅटवर बसले होते.
सारंग म्हणाला, "तर मग रविनाजी उर्फ वीणाजी, ती पिकेकडून चोरलेली कथा मिष्टी मेहरानला दिली ना?"
वीणा, "होय! आपण ठरवल्याप्रमाणे मिष्टी लवकरच त्यावर एक तासांची शॉर्ट फिल्म बनवते आहे. लवकरच ती बनून पूर्ण होऊन "व्हीडिओ ट्यूब" वर अपलोड सुद्धा होईल. मग पिके, केके आणि रत्नाकर तिघांना जबर धक्का बसेल!"
राजेश, "ग्रेट! आता पिकेच्या इतरही काही कथांवर शॉर्ट फिल्म बनवा आणि जगभर जाहिरात करून त्यात लेखक म्हणून एक कुणाचेतरी काल्पनिक नाव टाका! त्या फिल्म्स रिलीज होताच बरोबर पिके आणि केके यांची मेहनत वाया जाईल आणि त्यांना कळेल कथाचोरीचे दुःख!"
सारंग, "आणि वीणा! त्या शॉर्ट फिल्म रिलीज होईपर्यंत तू अधूनमधून पिकेला भेटत राहा. हळूहळू त्यांचेपासून दूर निघून जा! असे की त्याला तुझ्यावर संशय येता कामा नये!"
वीणा, "होय! मी रविना बनताना खूप मेहनत घेतली, वेशभूषा बदलली, मेकप केला. इतकं की रविना म्हणून मी त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर जरी वीणा म्हणून पुन्हा त्याचे समोर गेले तरीही तो मला ओळखण्याची शक्यता कमी आहे!"
राजेश, "वा सारंग! माझा शिष्य शोभतोस! खऱ्या जीवनात जर ही मुलगी एखाद्या काल्पनिक पात्राची भूमिका बेमालूमपणे वठवते तर सिरियल्स आणि चित्रपटांत तर धमालच करेल! वीणा, तुला मी आताच माझ्या टेलिव्हिजन शोसाठी को-अँकर म्हणून घेतो!"
वीणा, "थँक्यू राजेश सर!"
मग पुढचे काही प्लॅन आखले गेले.
मध्यंतरी राजेशला आईकडून काही कॉल आले खरे पण त्याने काहीतरी जुजबी बोलून आईला थोपवून धरले. सुनंदाचा मुक्काम सध्या तिच्या फेवरीट काकूंकडे होता. खरे तर त्या काकूला सुनंदाकडून राजेश आणि त्याच्या आईला मिळालेली संपत्ती डोळ्यात खुपत होती. तसेच तिचा मुलगा आणि राजेश याची तुलना ती लहानपणापासूनच करायची आणि राजेशला मिळालेले प्रसिद्धीवलय तिच्या डोळ्यात खुपायला लागले. म्हणूनच ती राजेश-सुनंदाचा घटस्फोट करवण्याच्या मागे होती हे कालांतराने राजेशच्या आईला कळून चुकले होते आणि आता सुनंदाला हे कसे समजवायचे आणि त्या काकूच्या प्रभावातून बाहेर कसे काढायचे आणि मग राजेशला हे सगळे कसे समजावून सांगायचे या विवंचनेत राजेशची आई होती पण राजेश सध्या काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता! दरम्यान त्या काकूंच्या शेजारपाजारच्याकडून राजेशच्या आईला आणखी एक बातमी कळली...!!
* * *
मिष्टी मेहरानने पिकेकडून चोरलेल्या कथेवर एक तासाची सशक्त शॉर्ट फिल्म बनवली आणि व्हीडिओ ट्यूबवर रिलीज केली फक्त मुद्दाम शेवट थोडा बदलला. ती फिल्म पहिल्याच दिवशी चार लाख लोकांनी पहिली कारण त्या फिल्मला माऊथ पब्लिसिटी मिळाली.
दरम्यान वीणा रविना बनून पिकेला अधूनमधून भेटत राहिली. केके आणि रत्नाकरच्या चोरीचा भुर्दंड पिकेला भरावा लागला होता. खरं तर पिके काही कथाचोर नव्हता. काही पर्सनल गोष्टी सोडल्या तर प्रोफेशनली पिके खूप चांगला माणूस होता. विणाचे पिकेवर कालांतराने खरंच प्रेम बसले. तो तिला आवडू लागला.
नंतर केके परदेशातून परत आला. तोपर्यंत शॉर्ट फिल्मबद्दल पिके, केके आणि रत्नाकर या तिघांना कळले आणि त्यांना दुःखद आश्चर्याचा झटका बसला.
मिष्टी मेहरानकडे तिघांनी जाब विचारला आणि जवळची कथाही तिला दाखवली आणि चोरी मान्य कर नाहीतर कोर्टात केस दाखल करु अशी धमकी दिली.
पण मिष्टीने त्याला सांगितले, "एकच कल्पना दोन किंवा जास्त जणांना सुचू शकते मिस्टर केके! आणि लक्षात घ्या की तुमच्या आणि माझ्या कथेचा शेवट सारखा नाही. समजलं? त्यामुळे तुमचा दावा खोटा आहे. तुम्हाला कोर्टात जायचं तर खुशाल जा! मी निर्दोष सुटेन!"
हळूहळू विश्वासात घेऊन विणाने पिकेला त्याच्या कथांची चोरी तिने रवीना बनून कशी केली ते सांगितले आणि त्याच्या वडिलांच्या आणि रत्नाकारच्या भूतकाळातील चौर्यकृत्यांबद्दल सांगितले. त्यालाही आश्चर्य वाटले आणि त्याचा वडिलांबद्दल संताप झाला.
विणाने पिकेकडून वचन घेतले की जोपर्यंत राजेश केकेला योग्य धडा शिकवत नाही तोपर्यंत त्याने केकेला यातले काहीएक सांगू नये. कारण केकेला कोर्टात जाण्यापासून रोखणे, त्याची कथा चोरून जशास तसे बदला घेणे आणि केकेच्या आगामी चित्रपटाची कथा आधीच फोडून त्याचे जबर आर्थिक नुकसान करणे एवढाच फक्त राजेशचा उद्देश या सगळ्यामागे नव्हता तर केके आणि त्याच्यासारख्या इतर लोकांचा खरा चेहरा टीव्ही, बॉलिवूड इंडस्ट्रीसमोर आणणे हा उद्देश होता म्हणजे पुन्हा कुणी असे करायला धजावणार नाही.
नंतर पिके कडून चोरलेल्या आणखी दोन कथांवर मिष्टीकडून शॉर्ट फिल्म बनवून नेटवर फ्री अपलोड करण्यात राजेश यशस्वी झाला आणि समिरणला मराठीऐवजी हिंदी चित्रपट बनवायला सांगून बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून राजेशचा शिरकाव आधीच झाला होता. तो आता योग्य वेळ आणि योग्य व्यासपीठ मिळण्याची वाट बघत होता.