चमत्कार हे फक्त अवकाशात भ्रमण करून किंवा पाण्यावर चालूनच नव्हे तर पृथ्वीवर भ्रमण करताना, चालताना फिरतानाही नजरेस पडतात; पण त्याची दखल घेतली जात नाही आणि हे सर्व आपण नकळत निसर्गाकडून घेत असतो. आयुष्याची वाटचाल वाटते तेवढी सोपी नसली तरी डोळसपणे आजूबाजूला पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आनंद मिळत असतो.
कितीतरी सुंदर घटना, दृष्ये आजूबाजूच्या निसर्गात सतत घडत असतात आपण आपल्या ताण-तणावाच्या आयुष्यात, स्वतःच्या सुख-दुःखात एवढे रममाण झालेले असतो की आपले लक्षच जात नाही खिडकीतून चिमण्या घरात येतात, फरशीवरचे दाणे टीपत घरात धीटपणे वावरतात किती विलोभनीय दृश्य असते ते जणू त्या दिवसांसाठी एक नवीन आत्मविश्वासच देवून जातात. पहाटेच्यावेळी त्यांचा होणारा चिवचिवाट आपल्याला जागे करतो आणि दिवसभराच्या कामासाठी हुरूप देवून जातो.
रंगीबेरंगी फुलांची सजलेली बाग पाहिली की मन सुखावून जाते. मनाला सुगंध देवून सतत दरवळत राहण्याचा संदेश देतात कुंडीतील फुले जशी निसर्गाची शोभा वाढवतात. तीच फुले फुल एखाद्या स्त्रीच्या डोक्यात माळले तर ते त्या सौंदर्यवतीचे सौंदर्य खुलवते, ईश्वराला अर्पण केलेली फुले मनातील आनंद, उत्साह व त्याचे भगवंताचरणी समर्पण दर्शवते. निर्माल्य झालेले ते फुलदेखील भूतकाळ विसरून वर्तमानाकडे सकारात्मक बघून भविष्याकडे बघण्याचा संदेश देते.
आपल्या घरातदेखील आपण पाहातो मूल वर्षाचे होत नाही, तोच आपण त्याला चिऊ, काऊच्या गोष्टी सांगत असतो. पाळण्यावर लावलेल्या त्या चिमण्याकडे बघून ते खेळत असते. मग राघू, मैना यांची चित्रे ती काढू लागतात
खिडकीबाहेर बसणारी कबुतरांची जोडपी धीटपणे माळ्यावर, कपाटावर घरमलकाच्या परवानगीची पर्वा न करता उडताना पाहिली की घर आपल्या एकट्याचे नाही याची खात्री पटते. प्रत्येक घरात डोकावणारे हे पक्षी निसर्गाची केवढी मोठी देणगी आहे. जगात खरे नि:स्वार्थी कुणी असेल तर हे पक्षी, स्वार्थापोटी आपण भांडत असतो मात्र स्वार्थापासून मुक्त हे पक्षी खरे निर्मोही असतात. त्यांना घरट्याचा, अन्नधान्याचा मोह नसतो. गरज संपली की ते त्या जाणिवेतून मुक्त होतात. निरपेक्ष वृत्तीने सतत आनंदित राहण्याची कला या पक्ष्यांकडून आपण शिकत असतो. ठराविक वेळेवर आरवणारा कोंबडा आपल्या दिवसाची सुरुवात करतो. न चुकता उगवणारा सूर्य आपल्या तेजाने आल्हाद देतो. तर प्रखरतेने जीवनातल्या खाचखळग्यांची आठवण देतो. सतत वाहणारा वारा आपल्याला वेगाचा संदेश देतो.
झुळझुळ वाहणारे झरे, नद्यांमधून वाहणारे पाणी निःशब्द, शांतता दर्शवते, पर्वतावरून कोसळणारे मोठे धबधबे रौद्रात्मक रूपाचे दर्शन घडवते तर खडकाच्या छोट्याश्या भेगेमधून देखील झिरपणारा तो पाण्याचा प्रवाह शांतता दर्शवतो. शांतता म्हणजे चिंता कष्ट नसलेली भयाण शांतता नाही तर या सर्वामध्ये राहूनही जगरहाटीचे नियम सांभाळून ही स्वतःच्या अंतरंगातील शांतता. मात्र त्याची किंमत दुष्काळ पडला पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले की प्रकर्षाने जाणवते तर आयुष्य खूप सुंदर बनेल. पाणी, सूर्यप्रकाश, हवा या जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि हीच खरी आपली संपत्ती आहे. त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पाणी म्हणजे जीवनच.
पाण्यासाठी खेड्यातील महिलांना मैलोनमैल लांब चालत जावे लागते अगदी तहान, भूक, स्वच्छता, निवारा, बांधकाम या प्रत्येक गोष्टीत पाणी मूलभूत घटक आहे. पाण्याची बचत करण्यासाठी जनजागृती आवश्यक ठरते. हे झुळझुळ वाहणारे पाणी देखील बचतीचे सूत्र सांगून जाते. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीची किमया आपले जीवन प्रगल्भ व सुंदर करत असते. जी शक्ती या निसर्गामध्ये विकास करेन तीच माणसाच्या बुद्धिमध्ये, दैनंदिन व्यवहारात प्रगती साधने म्हणूनच ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली असावी.
निसर्ग एक शिक्षक आहे. यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला तर आपले जीवन सुखमय होईल. निसर्गात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास केला गेला व वैज्ञानिक शोध लावणे सोपे गेले म्हणजे सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये अशी शक्ती आहे व त्याचा वापर आपल्या सुखासाठी केला गेला मात्र या सर्वांमध्ये देखील एक ज्ञात सुप्त शक्ती आहे तिचे अस्तित्व नाकारता येत नाही ती म्हणजे ईश्वरी शक्ती ती कळण्यासाठी अध्यात्माची जोड हवी, निसर्गाची पूजा म्हणजे ईश्वरी सेवा मानून या पंचमहाभूतांचा वापर संयमाने केला तर जीवन आनंदमय होईल अध्यात्म व विज्ञान याची योग्य सांगड घातली गेली तर सध्याच्या नैसर्गिक आपत्तीवर तोडगा निघेल आणि मग हा निसर्ग आपल्याला कुशीत घेईल. आपला मित्र बनेल. निसर्गातील या देणग्यांनी आयुष्य सुखकर समृद्ध करता येईल. तेव्हा वेळीच निसर्गाची साद ऐकणे योग्य ठरेल.
©मधुरा धायगुडे