अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे.
समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होईल...? कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे. आत येणारा झरा नाही. बाहेर जाणारा मार्ग नाही. तर काय होईल. आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल. वास येऊ लागेल. दुर्गंधी येऊ लागेल.
मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही. भावनांना वाट मिळाली नाही. की मनात विकृती निर्माण होते. अन यासाठी गरज असते संवादाची!!!
व्यक्त होता आलं पाहिजे असं म्हणत म्हणत स्वतः संवाद साधता यायला हवा तेवढा विश्वास ही निर्माण करता यायला हवा हे ही खरेच....!
संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊबहीण, पतीपत्नी, पितापुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो. !
मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो. संवादच संपला की उरतो तो वाद...
संवाद म्हणजे नुसतं केवळ बोलणं नव्हे तर एकमेकांला समाजून घेत विचाराची देवाणघेवाण....
दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो. आपल्या सृजनशीलतेला नवे पैलू पडतात. आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य उत्तम रहातं.मन प्रसन्न तर आरोग्य उत्तम .... थॊडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे.
हे झालं उत्तम संवादी माणसांच ...हा पण कमी किंवा मितभाषी अबोल माणसं उत्तम संवाद साधू शकत नसली तरी माणसं उत्तम ओळखण्याची कला त्यांच्या कडे असलेली दैवी देणगी आणि अहो सगळ्यांनीच बडबड करुन कसे चालेल न ऐकणारे ही हवेतच ना.!
संवाद फक्त बोलकी माणसंच साधू शकतात आसे नाही उलट मितभाषी कमी बोलणारी व्यक्ती एखाद्या ला जास्त समजून घेवू शकते . खूप कमी बोलत असणाऱ्या व्यक्ती त खूप साऱ्या विशेषता दडल्या असतात.
जे लोकं कमी बोलतात ते समोरच्या व्यक्तीला खुप चांगल्या पद्धतीने ओळखून घेतात, चांगल्या पद्धतीने समजून घेतात, समोरच्या व्यक्तीचे वागणे कसे आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे फक्त ते त्याच्या बोलण्यावरून आणि हवभावावरून ओळखून घेतात.
तुम्ही फक्त एकदा त्यांच्याजवळ जाऊन तर बघा, त्यांच्याशी बोलून तर बघा, त्यांचा सल्ला घेऊन तर बघा, जर आयुष्यात तुम्हाला कोणाशी घट्ट मैत्री करायची असेल, प्रेम करायचं असेल तर या लोकांपेक्षा चांगला व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. वर वर बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की हे लोक किती कमी बोलतात, किती आपल्या च भाषेत बोअर करतात पण जर तुम्ही भविष्यकाळाचा विचार कराल ना तर हेच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम समजून त्यांना दूर करतील. तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील. आणि असही प्रत्येक व्यक्तीला आपली बडबड ऐकणारा कोणीतरी असावा असं वाटत असतं.मी मगाशी बोलल्यानुसार तर या कमी बोलणाऱ्या आणि फक्त ऐकणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला व्यक्ती तुम्हाला कोण मिळेल ना...हा देखील संवादाचाच भाग असतो फक्त आपल्याला समजून घेता यायला हवं ....
बडबड म्हणजे समजून घेण नव्हे बोलावं तर विचारपूर्वक तरच संवाद निरोगी मन प्रसन्न यात मग कौतुक प्रोत्साहन करुन संवाद साधत व्यक्ती शी जोडत जाणं असे बरेच पैलु मानवी स्वभावाचे सांगता येतील अन् खरचं माणसाला संवादाची गरज आहे का ?? हे तुम्हांला च ठरवता येते.
कधी कधी बडबड करणारे मोकळे उत्तम स्वभावाचे मनाने चांगले वैगेरे पदव्या लावतो तर मितभाषी अबोल व्यक्तींना आपण अहंकारी शिष्ट वैगेरे दूषणं न समजून घेताच लावतो हे चुकीचेच ना ...संवाद हा दोन्ही प्रकारे होवू शकतो हे खरे ना...!
हा देखील सहजच जमलेला तुमच्या माझ्या मनातील एक संवादच कि....!!
वाचाळ व्यक्तता अन् अबोल मुग्धता दोन्ही ही संवादासाठी उत्तम हेच फलित
मात्र अतिव्यक्ततेत अधीरता तर अबोलतेत नम्रता ही विविधता दिसून येते....कमी बोलणारे आतल्या गाठीचे असतात अशी दूषणे लावणेही अमान्यच करावे लागेल उलट हा त्यांचा संयमी स्वभावाचा स्थायीभाव च ...विश्वासपूर्ण संवाद अशाच व्यक्ती शी होवू शकतो हेच फलित...
संवाद एक कला .!!. ..बोलू यात!! अबोलतेतही संवाद असतो मानूयात.!!
व्यक्ती सापेक्षता असेलच हा माझ्या मनातील संवाद...तुमच्याशी केलेला...!!
© मधुरा धायगुडे