क्वार्ट्ज हा शब्द पाहून मला आधी वाटायचं, की ते घड्याळ बनवणाऱ्या एका कंपनीचे नाव आहे. म्हणजे, घड्याळमध्ये असलेली यंत्रणा बनवण्याचे अधिकृत अधिकार फक्त त्याच कंपनीकडे आहेत, आणि ती कंपनी सर्व ब्रॅण्ड्सना आपली यंत्रणा पुरवते. म्हणून तुम्ही कोणत्याही ब्रॅण्डचे घड्याळ वापरा, तुम्हाला क्वार्ट्ज हे नाव हमखास दिसेल (दिसेलच)
नंतर त्या कंपनीबाबत माझी उत्सुकता वाढू लागली. कारण ही ती कंपनी आहे, जिच्या यंत्रणेवर आपण आपला दिवस ठरवतो आणि ती कंपनी आपला वेळ अचूक ठरवते. पण उत्सुकता जास्त ताणू नका, कारण ही कोणतीही कंपनी नसून ते टाइमिंग टेक्नॉलॉजीचे नाव आहे, जे घड्याळमध्ये वेळ दर्शवण्यासाठी वापरले जाते.
क्वार्ट्ज एक क्रिस्टल (स्फटिक) आहे, जो सेकंदात 32,768 वेळा कंपन करतो. एक काउंटर याची मोजणी करते आणि सेकंद काटा हलविण्यासाठी घड्याळाला सिग्नल पाठवते.
अपेक्षेप्रमाणे तुमचा थोडा गोंधळ झाला असेल. थोडं आणखी विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जे घड्याळ वापरतो, त्यात यंत्र बसवलेलं असतं आणि एक सेकंद म्हणजे किती काळ आहे, हे त्या यंत्राला माहित नसतं. एक सेकंद संपला आहे, हे त्या यंत्राला सांगण्यासाठी काहीतरी आत असले पाहिजे. आणि हा वेळ मोजण्यासाठी टाइमर यंत्राला एक सेकंदाचा वेळ देतो. यंत्राला ही वेळ मिळते आणि नंतर ती आतील चक्र हलवते. सेकंद, मिनिट आणि तास या सर्व गोष्टी सर्व घड्याळांमध्ये एकसारख्याच असतात, ते याच गोष्टीमुळे.
आपण पेन्डुलममध्ये नृत्य करणारे मोठे जुने घड्याळे पाहिले असतील. या प्रकारचे घड्याळ मॅकेनिकल क्लॉक होते. त्याच्या कार्यासाठी बॅटरीची आवश्यकता नव्हती. घड्याळाला आधी सांगितल्याप्रमाणे टाइमिंग देण्यासाठी बरेच गीअर्स आणि स्प्रिंस असायचे, आणि ते पूर्णपणे मेकॅनिकल असायचे.
आता क्वार्ट्ज यंत्रणेबद्दल सांगतो.
एका सेकंदाची टाइमिंग देण्यासाठी हे तंत्रज्ञान आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉच आणि सर्व प्रकारच्या घड्याळामध्ये वापरले जाते. क्वार्ट्ज हा एक क्रिस्टल आहे, जो आपण चालू करतो तेव्हा व्हायब्रेट होतो. याला एकदा व्हायब्रेट होण्यास लागणारा वेळ त्याच्या आकारावर अवलंबून असतो. याचा आकार जगभरात एकसमान ठेवण्यात आला आहे, जेणेकरून त्याची वारंवारता 32,768 हर्ट्जच्या बरोबरीची असेल. याचा अर्थ असा की, तो एका सेकंदात 32,768 वेळा कंपित होतो. घड्याळाच्या आत एक काउंटर असते. हे काउंटर ते क्रिस्टल 32,768 वेळा कंपित (vibrate) झाले का, हे मोजते आणि सेकंद काट्याला हलण्यास सिग्नल देते. सेकंद काटा हलल्यानंतर ते काउंटर न थांबता लगेचच पुन्हा क्रिस्टलचे कंपन मोजण्यास सुरुवात करते. ही प्रक्रिया अशीच चालूच राहते म्हणून आपला वेळ कधी चुकत नाही. अगदी सेकंदाला सुद्धा.
तुम्हाला ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची वाटली असेल. काहींना असेही वाटले असेल की, ते स्फटिक 32,768 वेळा कंपित नाही झाले तर? तर असे काही नाही, शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्नांनंतर आणि वेगवेगळ्या स्थितीत चाचणी करून या टाइमिंग टेक्नॉलॉजीची रचना केली आहे. गंमत म्हणजे घड्याळ बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना ही पद्धत सोपी आणि विश्वासार्ह वाटते. म्हणून तर सर्व कंपन्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे. आता पुन्हा तुमच्या मनगटातील घड्याळ बघा, तुमच्या डोळ्यासमोर 32,768 वेळा होणारे व्हायब्रेशन दिसेल.
rautpandurang2014
अप्रतिम लेख