प्रचंड इमारत उभारण्यात येत असते तेव्हा आपल्याला काय दिसते ?  गवंडी दगडांना इकडेतिकडे कापीत, छाटीत असतो. मगच त्यांना त्या भव्य इमारतीत जागा मिळते. ज्याप्रमाणे दगड-विटा सारख्या करून, त्यांची पुढे आलेली टोके काढून छाटून घ्यावी लागतात, त्याचप्रमाणे दगडादगडांच्यामध्ये, विटाविटांमध्ये सिमेंटही भरावे लागते, चुना लागतो. प्राचीन इमारती अजून भक्कम आढळतात. म्हणतात की, चुन्यात गूळही घालीत असत.

आज स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारायची आहे. भाषावार प्रांतरचना पूर्वीच मंजूर झालेली आहे;  परंतु अशी रचना केली जात असता द्वेषमत्सर न फैलावोत. परस्पर प्रेम राहो, सहकार्य राहो. भारताचे एक हृदय आहे ही जाणीव सर्वांना असो. परमेश्वराला सहस्त्रशीर्ष. सहस्त्राक्ष अशी विशेषणे आपण देतो; परंतु सहस्त्र-हृदय असे विशेषण कधीच नाही आढळत. परमेश्वराला हृदय एकच, त्याप्रमाणे भारताचे प्रांत अनेक झाले तरी अंत:करण एक असो.

भारताची एक संस्कृती आहे. प्रत्येक प्रांताची विशिष्ट अशी संस्कृती कोठे आहे ? थोडेफार फरक असतील; परंतु तेवढयाने ती भिन्न नाही होत. भारतातील प्रत्येक प्रांताची का भिन्न संस्कृती आहे ?  भारतीय संस्कृतीची ध्येये आपल्या संस्कृत ग्रंथांतून आहेत. वेद, उप-निषदे,  रामायण,  महाभारत,  स्मृति,  पुराणे,  दर्शने, यातूनच आपणांस ध्येये मिळाली. संस्कृतातीलच हे ध्येयघोष प्रांतीय भाषांतून जनतेचे कैवारी जे संतकवी त्यांनी दुमदुमवले. कृत्तिदासांचे रामायण बंगालीत, श्रीधरांचा रामविजय मराठीत, कंबनचे रामायण तामिळमध्ये, परंतु त्या त्या प्रांतातील जनतेला त्यांच्या त्यांच्या भाषेतून रामसीता, भरत-लक्ष्मण, हनुमान यांचे जे आदर्श मिळाले ते का निरनिराळे आहेत ?  भगवान शंकराचार्य जन्मले केरळात;  परंतु तो ज्ञानसूर्य हिंदुस्थानभर गेला. द्वारका, जगन्नाथपुरी, बदरीकेदार, शृंगेरी चारी दिशांना चार पीठे स्थापून संस्कृतीचे ऐक्य निर्माण करता झाला.

शंकराचार्यांच्या अद्वैताचा सुगंधच सर्व भारतीय भाषा साहित्याला येत आहे. तुकारामाच्या अभंगात, नरसी मेहताच्या भजनात, रवींद्रनाथांच्या गीतांजलीत, श्री बसवांच्या वचनांत, एकाच संस्कृतीची ध्येये दिसून येतील. भारतीय संतांनी आणि आचार्यांनी भारतीय संस्कृती एकरूप केली. नामदेवांचे अभंग शीखांच्या ग्रंथसाहेबात जातात. कबीराची गाणी नि दोहे, मीराबाईची उचंबळवणारी गीते, गोपीचंदाची गाणी सर्व हिंदुस्थानभर गेली आहेत. दक्षिणेकडील यात्रेला उत्तरेकडील लोक येत. उत्तरेकडील यात्रेला दक्षिणेकडील. संस्कृतातून चर्चा चाले. तीच प्रांतीय भाषांतून मग जाई. अशाप्रकारे अखिल भारतीय संस्कृती जोपासली गेली. कमलाच्या अनेक पाकळया म्हणजे या प्रांतीय संस्कृती. त्या अलग नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel