उत्कटतेशिवाय काही नाही. साहस, मोठमोठया गोष्टी, विशाल ध्येये, अपार अभ्यास, भरपूर अनुभव, असे करून जीवन सर्व बाजूंनी समृध्द नि उदात्त करा. तेजस्वी, निर्भय आणि सहानुभूतीचे असे बना. निर्भयतेशिवाय ना जगाचे ज्ञान, ना स्वत:चेही ज्ञान. तुम्ही जीवन निर्भय नि समृध्द केलेत म्हणजे मग तुम्हाला कशाची उणीव भासणार नाही. कल्पना, उपमा, दृष्टांत सारे भराभरा सुचेल. तो कवी मोठा, ज्याला एक गोष्ट सांगतांना तत्सदृश्य हजारो स्फुरतात. संसार क्षणिक असे म्हणायचे असेल तर बुडबुडयाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे, काचेप्रमाणे, स्वप्नाप्रमाणे, छायेप्रमाणे असे भराभरा त्याला जे जे भंगूर ते ते आठवते. ज्ञानेश्वरांसमोर अशा वेळेस सारा निसर्ग, सारी सृष्टी उभी राही. कारण सारा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला होता. बृहन्महाराष्ट्राचे त्यांनी दर्शन घेतले होते. बृहन्महाराष्ट्रातील शब्द ज्ञानेश्वरीत आहेत. शेक्सपिअरला, व्हिक्टर ह्यूगोला शब्दांचा तुटवडा नसे भासत. सारे धंदेवाले त्याना माहीत. सर्वांशी त्यांची दोस्ती.

आणि सर्व ठिकाणांहून शब्द घ्या. जुने घ्या, नवे घ्या. बहिष्कार घालीत नका बसू. क्षुद्र, दरिद्री अहंकार नको. मराठी भाषेचा ठसा प्रत्येक शब्दावर आपण मारीतच असतो. इंग्रजीतील बोट (नाव) शब्द घेऊ. तो स्त्रीलिंगी करू. फार काथ्याकूट करीत नका बसू. अस्मान, आकाश दोन्ही शब्द राहू देत, जमीन म्हटले की अस्मान आठवते. राहू देत जमिनअस्मान शब्द. पचवा सारे नि पुष्ट व्हा. शेकडो उर्दू शब्दही संस्कृत धातूपासून आलेले आहेत. मराठीची स्वत:ची अनंत शब्दसंपत्ती आहे. तिच्यात आले इतर शब्द म्हणून घाबरत नका बसू. सा-यांचा त्या त्या विवक्षित ठिकाणी उपयोग शोभतो. आपण मितुरडे झालो आहोत. पचनशक्तीच जणू मेली. इतरांवर अजिबात बहिष्कार नको. आज जग जवळ येत आहे. इतके द्वेष-मत्सर करून जाणार कोठे ?

मागे महाराष्ट्रात कोणी म्हणाले, 'किसान सभा असे का म्हणता? शेतकरी-सभा म्हणा. चरका शब्द नको, रहाट म्हणा. तकली शब्द नको, चाती म्हणा.'  परंतु त्या सदगृहस्थांना कळले नाही की, किसानांच्या संघटना आधी संयुक्तप्रांत, बिहार इकडे झाल्या. म्हणून तिकडचा किसान शब्द आला. त्या शब्दाभोवती तेजोवलय निर्माण झालेले होते. तकलीवर सूत काढू लागलो. हा नवसंदेश दुसरीकडून आला म्हणून तो शब्द रूढ झाला. ते ते शब्द उगीच येत नाहीत. ते स्वत:बरोबर चळवळ, चैतन्य, सामर्थ्य, संदेश घेऊन येतात. ते मृत नसतात. अहंकाराने काहीतरी पुटपुटण्यात अर्थ नसतो.

तुम्हाला मी तीनचार गोष्टी सांगितल्या. सभोवतीच्या मानवी, जीवनाशी एकरूप व्हा. प्राचीन इतिहास अभ्यासा, त्याप्रमाणे अर्वाचीनही, आजचाही. तिसरी गोष्ट निसर्गाशी एकरूप व्हा. आणि चौथी गोष्ट थोर थोर देशीविदेशी, प्राचीन अर्वाचीन ग्रंथकारांचा अभ्यास करा. आजच्याही थोर साहित्यिकांजवळ जात जा.

मी स्वत: दूर दूर राहणारा आहे. संकोची आहे. मी कधी कोणाकडे गेलो नाही. परंतु तुम्ही सवांना लुटा. नाशिकचे महाराष्ट्राचे आवडते कवी श्री. सोपानदेव चौधरी कधी भेटले तर थोर साहित्यिकांच्या संगतीतील अनंत अनुभव ते सांगतात. त्यांच्याजवळ ऐकत असता मी सद्गदित होतो. मी मनात म्हणतो, 'मी कधीच कोणाकडे गेलो नाही.'  परंतु माझा भिडस्त, बुजरा स्वभाव.

'थोरांपासून दूर दूर फिरतो लाजून वस्त्राविणे'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel