राजप्रासादात पोहोचून मोरयाशास्त्री सरळ सम्राट सेतूपती याला जाऊन भेटले आणि त्यांनी राजपुत्राला भेटण्याची ईच्छा व्यक्त केली. सेतूपती म्हणाला,

“ चला गुरुशिरोमणी, मी स्वत: आपल्याला त्यांच्याकडे घेऊन जातो.”

“ नाही महाराज, मला वाटते ती आपण स्वत: न येता वज्रसेन याला माझ्याबरोबर पाठवून द्यावे.”

मोरयाशास्त्री यांच्या आदेशाचा अपमान करणे सेतुपातीला शक्यच नव्हते म्हणून ईच्छा असून देखील सेतूपती सोबत गेला नाही. त्याने वज्रसेन याला मोरयाशास्त्री यांच्याबरोबर पाठवून दिले.

त्या कारागृहामध्ये संपूर्ण आयुष्य राहणे म्हणजे भयंकर अशा नरकात राहण्यासारखेच होते. तिकडे प्रकाश आत येण्यासाठी एकही खिडकी नव्हती. प्रचंड कोंदट वातावरण होते. एका कोपऱ्यात मोरी होती आणि त्यातच शौचकूप होता. ज्याची दुर्गंधी संपूर्ण खोलीत भरून राहिली होती.

राजपुत्रासारख्या ऐश्वर्य संपन्न माणसाला तेथे राहणे फारच दुर्लभ होते. त्यामुळे वज्रसेन आणि सेतूपती यांची अशी ईच्छा होती कि तेथे राजपुत्राच्या शयनकक्षातील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. परंतु राजकुमार नंदीतेज याने हा प्रस्ताव अमान्य केला होता. त्यांनी स्वत: निवड केलेल्या शिक्षेमध्ये त्यांना तसूभरही लबाडी करण्याची ईच्छा नव्हती.

मोरयाशास्त्री यांना त्या अंधार कोठडीपर्यंत  नेण्यासाठी वज्रसेन एक मशाल सोबत घेऊन आले होते. त्या मशालीच्या उजेडात मोरयाशास्त्री यांनी राजकुमाराला एका कोपऱ्यात ध्यानस्थ बसलेले पहिले.

कारागृहात प्रकाशाची चाहूल लागताच नंदीतेज उठून उभा राहिला. मोरयाशास्त्री स्वत: आलेले पाहून त्याने त्यांना दोन्ही हात जोडून वंदन केले.

“ हे गुरुशिरोमणी, आपण खूपच दयाळू आहात. अशा कलुषित स्थानी आपण येण्याचे काय प्रयोजन आहे? निश्चितच आपल्या मनात माझ्याबद्दल पराकोटीची अनुकंपा आहे. मी आपली क्षमा मागतो आपल्याला येथे बसण्यासाठी कोणतेही आसन नाही किंवा आपणास भेट देता येईल अशी योग्य वस्तूदेखील माझ्यापाशी नाही.”

“ नंदीतेज, वत्सा मी माझे आसन माझ्या सोबत घेऊन आलो आहे आणि राहिला प्रश्न या स्थानाच्या कलुषित असण्याचा माझ्यासाठी ते प्रत्येक स्थान कलुषित आहे जेथे माझ्या गणपतीबाप्पाचा वास नाही. त्यामुळे  त्रस्त होऊ नकोस. मी तुला उच्छिष्ट गणेशाच्या आज्ञेने घेऊन जाण्यासाठी आलो आहे. राजकुमार तू स्वत:साठी आजीवन कारावासाची शिक्षा मागून घेतलीस त्या शिक्षेचा अवधी आता समाप्त होत आला आहे.” मोरयाशास्त्री स्मितहास्य करत म्हणाले.

“ मला समजले नाही, गुरुवर्य!” नंदीतेज.

“अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तुझ्या मृत्यूचा समय समीप आला आहे. आजच रात्री तुला या देहाचा त्याग करावा लागेल.” मोरयाशास्त्री

“ हे आपण काय सांगत आहात गुरुदेव? आपण राजपुत्राला कोठे घेऊन जाणार आहात? मी आपणास असे करू देणार नाही.”

मोरयाशास्त्री यांच्या कथनामुळे व्याकूळ झालेला वज्रसेन हतबलपणे रडत रडत बोलत होता. नंदीतेजावर असलेल्या प्रेमापोटी तो राजकुमार आणि मोरयाशास्त्री यांच्या मध्ये एखाद्या भक्कम भिंतीप्रमाणे उभा ठाकला. त्याचा हात तलवारीच्या म्यानावर होता.

“ आपण मला शाप दिला तरी चालेल गुरुदेव. परंतु मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला मी राजपुत्राला येथून घेऊन जाऊ देणार नाही.” वज्रसेन

“माझी आज्ञा असेल तरीही नाही?” नंदीतेज विचारपूर्वक म्हणाला.

“असे करू नका राजकुमार. असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सम्राट सेतूपती यांची आज्ञा घेणे आवश्यक आहे.” वज्रसेन हात जोडून म्हणाला.

“ हि शिक्षा जेव्हा मी निवडली तेव्हा मी सम्राट सेतूपती यांची आज्ञा घेतली नव्हती. त्यामुळे आताही आज्ञा घेणे मला आवश्यक वाटत नाही. मी तुला अनुरोध करतो, वज्रसेन. मी राजप्रासादाबाहेर पडल्यानंतरच माझ्या जाण्याची सूचना तू पिताश्रींना देशील. तू माझ्यासाठी वडीलधारा आहेस माझी विनंती आहे हीच माझी अखेरची ईच्छा आहे असे समज.” नंदीतेज.

राजकुमाराच्या या बोलण्याने वज्रसेन जागच्याजागीच थिजला जणू कोणी त्याच्या छातीवर परशूने प्रहर केला असावा. तो राजपुत्राच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. परंतु नंदीतेजाचा निश्चय अढळ होता.

“ तुम्ही जर असे केले तर मी देखील आपणा सोबत जीव देईन.” वज्रसेन.

परंतु राजकुमाराने त्यासाठी त्याला अनुमती दिली नाही. आपल्या कलंकीत जीवनाचा अंत करण्यासाठी तो मोरयाशास्त्री यांच्यासोबत त्या अंधार कोठडीच्या बाहेर पडला.

क्रमशः

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel