त्याने दरवाजा वाजवण्या आधी त्यावर स्पष्ट अक्षरात लिहिलेली पाटी वाचली

“श्वान (कुत्रे) तथा कमी बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीना प्रवेश निषिद्ध!”

त्याचा पाय क्षणभर थांबला. त्याचा बुद्ध्यांक तर चांगला होता पण याची खात्री नव्हती कि आत बसलेल्या व्यक्तीला नक्की किती बुद्ध्यांक असलेला व्यक्ती अपेक्षित आहे.

आत बसले होते, प्रोफेसर नेथन  ब्रिज , जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ!

शेवटी धीर एकवटून त्याने दरवाजावर टकटक केली.

‘‘कम इन।’’ आतून घोगरा आवाज आला. दरवाजा ढकलून तो आत शिरला. समोर एका खुर्चीत प्रोफेसर नेथन  ब्रिज  बसले होते त्यांच्या समोर टेबलावर कागद आणि पुस्तके यांचा ढीग रचलेला होता. तो टेबलाच्या या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसायला गेला इतक्यात प्रोफेसर ब्रिज  यांनी त्याला अडवले ते म्हणाले,

“ बसण्याआधी मला तुझ्या बुद्धिमत्तेची एक लहानशी परीक्षा घ्यायची आहे. बघू तरी तू माझ्याशी संभाषण करण्याच्या किमान कुवतीचा आहेस कि नाही?”   

काही समजायच्या आतच प्रोफेसर ब्रिज  यांनी पहिल्या प्रश्नाची तोफ डागली.

“ एका उंच मीनारावरून दोन चेंडू खाली सोडले, एक हलका आणि दुसरा जड. जमिनीवर सर्वात अगोदर कोणता चेंडू पोहोचेल?”

“न्यूटन आणि गैलीलियो यांच्या नियमानुसार दोन्ही चेंडू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतील.” त्याने उत्तर दिले.

“चूक!” प्रोफेसर ब्रिज  यांनी टेबलावर हात आपटला. “ हवेचा दबाव हलक्या चेंडूवर अधिक असल्यामुळे जड चेंडू अगोदर जमिनीवर पोहोचेल.”

‘‘ओह!’’

‘‘दूसरा प्रश्न... एका मीनाराच्या माथ्यावरून दोन चेंडू खाली टाकले. एक जड दुसरा हलका...जमिनीवर कोणता चेंडू आधी पोहोचेल?”

“ हा प्रश्न तर झाला ना....”

“ तू प्रश्नाचे उत्तर देरे मुर्खा...”

“ हवेचा दबाव हलक्या चेंडूवर जास्त असेल त्यामुळे जड चेंडू.....”

“ परत चूक! हवेचा दबाव आडव्या दिशेने जास्त असल्यामुळे दोन्ही चेंडू एकाच वेळी जमिनीवर पोहोचतील.”

हे ऐकून त्याने दीर्घ श्वास घेतला.

“प्रश्न तिसरा...एका मीनाराच्या उंच टोकावरून दोन चेंडू....”

“ हा प्रश्न पहिलाच आहे...”

“मध्ये मध्ये बोलू नको रे...अर्धवट कुठला..”

“ हवेचा दबाव आडव्या दिशेने जास्त अस्य कारणाने दोन्ही चेंडू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतील.

“ तुझी माझ्याशी बोलायची लायकीच नाहीये. अरे मूर्ख माणसा, चेंडूच्या प्रारंभिक वेगावर देखील बरंच काही अवलंबून असेल कि नाही? माझा वेळ वाया घालवू नकोस प्लीज. गेट आउट!”

आलेला मनुष्य हताशपणे दरवाजाकडे वळला, पण जाता जाता तो अचानक थांबला आणि प्रोफेसर ब्रिज  यांना म्हणाला.

“ प्रोफेसर साहेब, जाण्यापूर्वी मी देखील आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो.”

“ होय ? मला खात्री आहे नक्कीच एखादा बिनडोक प्रश्न असेल... तुझ्यासारखा...पण असो विचार विचार...”

“ आपल्या गळ्यात जो टाय लावला आहे त्याच्या मागचा शर्ट कुठे आहे?

“ हं? “ प्रोफेसर ब्रिज  चमकून स्वत:च्या शरीराकडे पाहू लागले. आणि खरोखरच त्यांच्या अंगावर टाय व्यतिरिक्त एकही कपडा नव्हता. त्यांनी केवळ हातात घड्याळ, गळ्यात टाय आणि डोळ्यावर चष्मा इतकेच काय ते अंगावर घातले होते. तो टाय त्यांच्या तुंदीलतनु वर एखाद्या लंगोटीप्रमाणे दिसत होता.

“ अरे देवा, आज मी माझे कपडे घालायला कसा काय विसरलो?” प्रोफेसर ब्रिज  पुरते खजील झाले होते.

“ बर सर, मी निघतो..”

“ नाही...थांब एक मिनिट. तुझं नाव काय आहे?”

“ सर, माझे नाव डॉ. आनंद वैशम्पायन फ्रॉम इंडिया... म्हणजे भारत..”

“  काम काय होतं तुझं माझ्याकडे?” ब्रिज  

“ मी माझ्या एका प्रोजेक्टमध्ये तुमची मदत मिळावी म्हणून भेटायला आलो होतो. कारण आम्हाला त्यात फिजिक्स संबंधित एक समस्या आली आहे.”

“मी मदत करायला तयार आहे पण माझी एक अट आहे.” ब्रिज  

डॉ. वैशंपायन यांनी होकारार्थी मान हलवली आणि आपल्या प्रोजेक्ट बद्दल ते थोडक्यात सांगू लागले. संपूर्ण माहिती प्रोफेसर ब्रिज  यांना सांगून डॉ. वैशंपायन तिथून बाहेर पडले.

त्यांच्या चेहेऱ्यावर समाधानाचे भाव होते परंतु ते उघडे बंब होते. प्रोफेसर ब्रिज  यांनी त्यांची विनंती मान्य केली होती परंतु त्यांच्या अटीनुसार ब्रिज  यांनी वैशंपायन यांचा शर्ट मागून घेतला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel