निबंध २
हें सारें कसें घडवून आणावयाचे.


नदी तोडते का जोडते ? आपण हा प्रदेश त्या प्रदेशापासून अलग केला असे नदीस वाटत असेल तर वाटू दे. परन्तु तिने न तोडता जोडलेच आहे. त्या दोन भागांत दळणवळण वाढवून, व्यापार चालवून तिने दोन्ही भाग जवळ आणले आहेत. ज्या राष्ट्रांत ऐक्य नसते, तेथे ऐक्य निर्मिण्यासाठी परकी सत्ता येत असते. हिंदुस्थानचे एकीकरण व्हावे म्हणून ईश्वरी इच्छेनेच ब्रिटिश सत्ता येथे आली आहे. इंग्लंडला आवडो वा न आवडो. त्यांच्या आवडीनावडी न जुमानता हिंदुस्थानच्या एकीकरणाचा प्रश्न सुटत जाणार, ऐक्य होत जाणार. ते तोडावयास आले असले तरी त्यांचे घाव आम्हाला जोडणार. नदीचा प्रवाह दोन प्रदेशांस न तोडतां दोन्ही भागांस समृद्ध व वैभवशाली करणार.

एका जातीच्या लोकांचे सारे वाटोळे करून दुस-या जातीचा कायमचा उत्कृष्ट झाला आहे असे इतिहास सांगत नाही. जेथे सर्वोच्च विकासास संधि व वाव आहे तेथेच ऐक्याची शक्ति असते. या ऐक्यशक्तिलाच धर्म असे आपण नाव देतो. जेथे परस्परांतील स्नेहभाव सुकून गेला आहे तेथे धर्महि मेलेला आहे, असे निःशंक समजावे. आणि असा हा थोर धर्म जेथे  मेलेला असेल तेथें लोक तरी कोठून जिवंत राहणार ?

धर्म एव हतो हन्ति

तुम्ही धर्माला मारलेत कीं तोहि तुम्हांला मारतो. धर्म एकटा मरत नाही. मरणा-यास बरोबर घेऊन तो मरतो. ब्रिटिश लोक साम्राज्यामुळे आज वैभवास चढले आहेत. परन्तु हिंदुस्थानला मान म्हणून वर करू द्यायची नाही असेच धोरण जर दुर्दैवाने ब्रिटिश चालवतील, तर त्यांचाहि मोठेपणा मातीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. हिंदुस्थानाला उपाशी, दीनदरिद्री, निःशस्त्र, दुबळा असा करणे यांत ब्रिटिशसाम्राज्याचाहि नाश आहे.

अंतःकणांत जेव्हा लोभाचे राज्य असते, स्वार्थापलीकडे जेव्हा काही दिसतच नाही, तेव्हा फारच थोड्यांना राजकारणाचा विशाल दृष्टि ठेऊन विचार करता येतो. जर एखाद्या लोभी सरकारने हिंदुस्थानाला कायमचे गुलाम करून ठेवण्याचे ठरविले तर ते ध्येय दूर राहून उलट हिंदुस्थान कायमचा त्यांच्या हातांतून निसटून जाण्याचाच संभव अधिक. कायमचा संबंध जोडणे ही गोष्ट निसर्गाचे विरुद्ध आहे. सक्तीचा संबंध कायमचा असू शकत नाही. बाह्य संबंध तात्कालिक असतात. वृक्षाला सुद्धा शेवटी फळाचा त्याग करावा लागतो. ते पिकलेले फळ झाडाला चिकटवून ठेवण्याचा जर कोणी कृत्रिम उपाय योजील तर ते फळ पडले असते त्या पेक्षाही  अधिक लौकर गळून पडेल.

ताब्यातील देश दुबळा करणे, त्या देशांतील लोकांत सदैव दुही ठेवणे, त्या देशांतील लोकांच्या नैसर्गिक शक्तींच्या विकासास अवकाश न देता, त्यांची वाढ होऊ न देता, त्या मारून टाकणे आणि अशा शेक़डो प्रकारांनी तो देश केवळ मृतवत व पंगू करून ठेवणे, परावलंबी करणें- ही इंग्लंडची आजची राज्यपद्धती आहे. आज इंगलंडच्या वाङमयांत जगाला डोलवील असे  वाङमय निर्माण होत नाही. तेथे काटेरी राजकारणाचे रान मात्र भरमसाट वाढत आहे. इंग्लंडच्या हृदयांत दुस-याच्या दुखःने कारुण्याचे झरे आज फुटत नाहीत. पददलित व अभागी लोकांसाठी त्यांच्या हृदयांत सहानुभूतीचा लवलेश नाही. दुस-यावर सत्ता गाजविणे हीच आज त्यांची मोठेपणाची कल्पना आहे. दुस-याला गुलाम करण्यांत त्यांना पुरुषार्थ वाटत आहे. साहसाच्या गोष्टी दूर राहून, स्वार्थाच्या व लुटालुटीच्या गोष्टींतच त्याचे सारे शौर्य, धैर्य काम करून राहिले आहे. धर्मास त्यांनी हद्दपार केले आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थाला देशभक्ति हे बडे नाव त्यांनी दिले आहे. आजचे इंग्लंड हे असे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel