आता तर ब्रिटिशहि आले आहेत. त्यांनीही भारतीय इतिहासांत महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. त्यांचे येथे येणे आगंतुक नव्हते. जर पाश्चिमात्याशी भारताचा संबंध न येता, तर जे परिपूर्णतेचे ध्येय त्याला गाठावयाचे आहे, त्यात मोठीच उणीव राहिली असती. युरोपीयन संस्कृतीचा दिवा आज तेजाने उंच तळपत आहे. काळाच्या या विशाल व प्रदीर्घ रस्त्यावर त्या दिव्यावरती आपल्याहि मशाली पेटवून घेऊन आपणांस जोराने पुन्हा पुढे निघाले पाहिजे. आमच्या पूर्वजांनी जे मिळवायचे होते ते सारे ३ हजार वर्षांपूर्वीच मिळवून ठेवले आहे असे म्हणणे आपणांस शोभत नाही. विश्वाजवळ नवीन देण्यासारखे काही नाही, इतके का ते दीन व दरिद्री आहे ? विश्व अनंत आहे व ज्ञानहि अनन्त आहे. जाणण्यासारखे व मिळवण्यासारखे जे जे काही होते, ते ते सारे जर आपण जाणलेले असेल व मिळविलेले असेल तर आपल्या जगण्यात तरी काय अर्थ ? ज्यांच्या आजोबापणजोबांनी सारे ज्ञान इस्तगत केले, त्यांच्या लेकरांना आज कर्तव्य तरी कोणते उरले ? भविष्यकाळाबद्दलची कोणती आशा व उत्कटता त्यांच्याजवळ असणार  ? जुन्या मरतुकड्या रुढी व जुने विचार यांच्या आड लपून बसणा-यांना कर्तव्यक्षेत्र तरी कोणते उरले ? अर्वाचीन विचारांपासून दूर राहणा-यांना व जुन्यालाच मिठी मारणा-यांना जगावयासाठी आशा तरी कोणती, ध्येय तरी कोणते ? आपले जगणे मग केवळ अर्थहीन व भूमीला भारभूतच होईल. जर आपल्या जगण्यांत नवीन पुरुषार्थ संपादण्याची शक्यता नसती तर आपले अस्तित्वच शक्य झाले नसते.

आपल्या सभोवताच्या भिंतींना पडलेल्या भगदाडांतून इंग्रजहि आत आले. जगातील महोत्सवाला तुम्हीहि चला, जगाच्या कारभारात तुम्हीहि भाग घ्या, असे आपणांस आमंत्रण देण्यासाठी त्यांना पाठविण्यांत आले आहे. ईश्वराचे ते जणु दूत आहेत. आपली काही लेकरे एकलकीडेपणाने जगावर रुसून बाजूला बसली आहेत हे परमेश्वरास पहावले नाही. जगाच्या संसारात आपण सामील झाले पाहिजे. आपल्याजवळ जे काही चांगले असते ते तेथे घेऊन जाऊ या. आपणास जो आनंद, जे सहाय्य जगाला देता येईल ते देऊ या. आपण आपले विचार, आपली ध्येये घेऊन तेथे जाऊ या. आपला संसार दुस-यांना दाखवू, दुस-यांचा संसार आपण पाहू. आपण जगाची दृष्टी वाढवू व स्वतःचीहि वाढवून घेऊ. हे सर्व आपण केले पाहिजे. त्याशिवाय सुटका नाही. इंग्रजहि एक संदेश घेऊन आला आहे. तो संदेश नीट ऐकून पश्चिमेला भेटण्यासाठी जोपर्यंत आपण निघणार नाही, तोपर्यंत इंग्रज आपणांस टोचित रहाणार, बोचित रहाणार, तो आपणांस शांत बसू देणार नाही. सुखाने खाऊ देणार नाही, स्वस्थपणे झोप घेऊ देणार नाही. इंग्रज मनुष्य येथे पाठविण्यांत जो ईश्वराचा हेतु होता, तो हेतु ओळखून जोपर्यंत आपण तत्सिद्धयर्थ खटपट करणार नाही, तोपर्यंत इंग्रजांच्या पकडीतून सुटण्याची आपणांस बिलकूल आशा नको.

इंग्रज संदेश घेऊन आला आहे. परन्तु तो संदेश कोणत्या भारतासाठी ? खरेच, कोणत्या बरे भारतासाठी ? भूतकाळाच्या बीजांतून भविष्यकाळाच्या सुंदर अंकुराकडे जाणारा हा जो नवभारत, तरुणभारत, त्या भारताला इंग्रज संदेश घेऊन आला आहे. सर्व विश्वास मिठी मारण्यासाठी उत्सुक आहे. या नवभारतांत अमक्याला स्थान आहे, तमक्याला नाही, अमक्याला प्रवेश आहे, तमक्याला नाही, असे म्हणणारे जे आम्ही ते आम्ही कोण ? बंगाली, पंजाबी, सिंधी मराठी, हिंदु, मुस्लीम यापैकी या आम्हीत कोणाचा अंतर्भाव होतो ? आम्ही म्हणजे अमुक एक असे काही नाही. आमचा जो मोठा आम्ही, त्या आम्हीमध्ये हिंदु, मुसलमान, इंग्रज, सारे येणार. सर्वांचा अतर्भाव होणार. सर्व मिळून जो सर्व संग्राहक बलवान् “आम्ही” होईल, त्या आम्हीलाच येथे कोणी रहावे व कोणी राहू नये हे सांगण्यचा हक्क आहे. संकुचित व क्षुद्र आम्हीस तो हक्क नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel